ओडिया साहित्य : ओडिया साहित्याच्या आद्य स्वरूपाचे तीन ठळक विशेष आढळतात : (१)कोरीवलेख, (२) भावगीते आणि (३) वीरगीते. ओडिया भाषिकांची वस्ती असलेल्या भौगोलिक प्रदेशात ओडिया भाषेतील कित्येक कोरीवलेख उपलब्ध झाले असून, त्यांवरून ओडिया साहित्याची सुरुवात अकराव्या शतकात झाली असावी, असे ठरते. तथापि ओडिया साहित्याच्या निर्मीतीचा पहिला टप्पा भावगीते आणि वीरगीते यांत आढळतो. ही गीते सर्वत्र प्रचारात होती आणि याचा पुरावा लोकसाहित्याच्या रूपाने आजही उपलब्ध आहे. या गीतांचे कवी अज्ञात आहेत. पंधराव्या-सोळाव्या शतकांत विकसित झालेल्या महाकाव्यांतही या गीतांचे निर्देश आढळतात.
भावगीतांपुरतेच बोलायचे, तर या गीतांचे जुन्यात जुने नमुने ⇨ बौद्ध गान ओ दोहा अथवा चर्यागीत या आठव्या-नवव्या शतकांतील ग्रंथात सापडतात. प्रसिद्ध बंगाली विद्वान ⇨हरप्रसाद शास्त्री यांना ही गीते नेपाळात या शतकाच्या सुरुवातीला सापडली. असमिया, बंगाली आणि ओडिया ह्या तिन्ही भाषांतील साहित्याचा आरंभ बौद्ध गान ओ दोहापासून झाल्याचे त्या त्या साहित्याचे विद्वान मानतात. यातील गीते अपभ्रंश भाषेत रचली आहेत आणि ओडिया भाषेचा अपभ्रंश भाषेशी अगदी निकटचा संबंध आहे. ओडिया भाषेच्या ज्ञानाशिवाय कुठल्याही पंडिताला या गीतांचा साधा अर्थही लावता येणार नाही. ओरिसाच्या डोंगराळ भागांत शेती करून राहणाऱ्या साध्यासुध्या लोकांचे जीवन, त्यांच्या आशा-आकांक्षा यांचे प्रतिबिंब या गीतांत पडले आहे. या लोकांची स्वतःची भाषा होती. त्यात देशज शब्दांचा भरणा खूप होता. हे शब्द कदाचित आसपासच्या वन्य जमातींच्या भाषेतून घेतले असण्याची शक्यता आहे. या कवींना बऱ्याच वेळा सिद्ध अथवा सिद्धाचार्य म्हटले जाते. ही गीते उच्च तत्त्वज्ञान व गूढमार्गी धर्म यांच्या उपदेशार्थ उपयोगात आणली जात. सातव्या शतकापर्यंत ओरिसातील ‘उड्डियान पीठ’ हे तंत्रमार्गी बौद्धांचे महत्त्वाचे पीठ म्हणून विख्यात होते. तथापि आजच्या वाचकांना विषयाच्या बाबतीत धर्माशी जवळजवळ काहीच संबंध नसलेली अशी ही साधी भावगीते वाटतात. आपल्याला झालेला उत्स्फूर्त आनंद व्यक्त करण्यासाठीच कवींनी ही गीते रचली असावीत, असे वरवर पाहू जाता वाटते.
ओडिया वीरगीतांचे तीन प्रकार आहेत : (१) मौखिक परंपरेने चालत आलेली, (२) धार्मिक आणि कर्मकांड यांच्या परंपरेतून चालत आलेली आणि (३) सारळा दास आणि बलराम दास यांच्या महाकाव्यांत आलेली ही वीरगीते ओडिया साहित्याच्या अमोल ठेवा आहे. त्यातील विपुल साधनसामग्रीवरून ओरिसाच्या भूमीने भटक्या टोळ्यांपासून तो सागरी व्यापार करणाऱ्या प्रगत मानवी संस्कृतीपर्यंतचे सर्व टप्पे पाहिले असल्याचे आढळते. त्यांत ओरिसाच्या दीर्घ इतिहासाचे प्रतिबिंब पडले आहे.
ओडिया साहित्याच्या इतिहासातील १००० ते १५०० हा पाचशे वर्षांचा कालखंड अज्ञात कालखंड आहे. त्यासंबंधीचे संशोधन सध्या केले जात आहे. ह्या अज्ञात काळातील काही गद्य-पद्य ग्रंथ तसेच कित्येक कोरीव लेखही संशोधकांनी शोधून काढले आहेत. त्यांच्या दीर्घकालीन प्रयत्नाने आणि संशोधनाने हा तुटलेला दुवा पुन्हा सांधला जाईल आणि ओडियातील उत्तरकालीन लेखकांनी आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेले, परंतु सध्या उपलब्ध नसलेले, अनेक ग्रंथ उपलब्ध होतील, अशी आशा वाटू लागली आहे.
ओडिया साहित्याच्या इतिहासातील पहिला कालखंड म्हणजे महाकाव्ये आणि पुराणे यांचा होय. तो पंधराव्या शतकात सुरू होऊन सतराव्या शतकाच्या अखेरीस समाप्त होतो. या काळात विपुल साहित्य निर्माण झाले. रामायण व महाभारत यांवर आधारित अनेक महाकाव्ये रचण्यात आली. त्याचप्रमाणे पुराणाच्या आधारेही असंख्य ग्रंथ रचले गेले. यांतील काही संस्कृत ग्रंथांची भाषांतरे-रूपांतरे होती, तर काही स्वतंत्र ग्रंथ होते. वेदान्त आणि उपनिषदे तसेच स्मृतिग्रंथ यांसारख्या मूळ संस्कृतच्या आधारे भाषांतरित व रूपांतरित केलेले, तात्त्विक स्वरूपाचेही ग्रंथ त्यांत होते. या कालखंडात निर्माण झालेल्या अनेक धार्मिक स्तोत्रांत आणि प्रार्थनापर गीतांत चांगले काव्यगुणही आढळतात.
यानंतर आलंकारिक काव्याचा कालखंड (१७०१ — १८००) सुरू होतो. धार्मिक तसेच लौकिक अशा दोन्ही प्रकारचे साहित्य ह्या कालखंडात निर्माण झाले. उपेंद्र भंज, अभिमन्यू सामंतसिंहार, दीनकृष्ण दास आणि इतरही अनेक लेखकांना याच काळात ललित साहित्यिक म्हणून कीर्ती लाभली. त्यांनी केवळ काव्यग्रंथच रचले नाहीत, तर त्यांच्यापैकी काहीजणांनी छंद, अलंकार यांवरही ग्रंथरचना केली, तसेच कोशरचनाही केली. ‘चौतिसा’, ‘कोइली’, ‘पदी’, ‘बोली’, ‘लीला’ यांसारख्या काव्यप्रकारांत त्यांनी रचना केली. यांतील काही प्रकार पूर्वी अस्तित्त्वात असलेले किंवा नव्याने निर्माण केलेले असून ते त्यांनी परिपूर्णतेस नेले.
यानंतरचा १८०१ ते १९०० हा कालखंड जुन्या आणि नव्या काव्यप्रवाहांच्या सरमिसळीचा कालखंड म्हणता येईल. या संक्रमण काळात जुन्या पठडीतील कवींनीही दीर्घकाव्ये लिहिण्याचा फारसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. उलट त्यांनी प्रामुख्याने गीतेच रचली असून त्यांतील बरीच शृगारिक आहेत. अर्थात कधी धार्मिक तर कधी लौकिक हेतूने ती लिहिलेली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि छापखाने सुरू झाल्यामुळे, गद्याचा विकास होणे शक्य झाले. इतिहासाची जाण, त्याचप्रमाणे मानवतावादी व राष्ट्रीय प्रेरणा, यांमुळे काव्याला या वेळी नवीन वळण प्राप्त झाले. विषय, भाषा आणि विचार यांबाबतीत काव्याचा चेहरामोहरा सर्वस्वी बदलला.
यानंतरचा कालखंड म्हणजे विसाव्या शतकाचा कालखंड होय. एकोणिसाव्या शतकाच्या भक्कम पायावरच, विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे साहित्य आधारलेले आहे. साहित्यात एक प्रकारचे नवजागरण अथवा प्रबोधन निर्माण होऊन गद्य व पद्य या दोन्ही क्षेत्रांतील सर्वच साहित्यप्रकारांत विपुल साहित्यनिर्मिती झाली. त्याचा उद्देश आम जनतेच्या मनातील सुप्त सर्जनशील वृत्ती जागृत करणे हा होता. आजच्या साहित्याने हळूहळू पण निर्धाराने प्रादेशिकतेची व राष्ट्रीयतेची बंधने व सीमा ओलांडल्या आहेत आणि अखिल मानवजातीचे विचार व कृती यांचा कलात्मक आविष्कार त्यात होऊ लागला आहे.
महत्त्वाचे साहित्यप्रकार : ओडिया साहित्याचा कालखंडानुसार संक्षिप्त आढावा घेतल्यानंतर त्यातील महत्त्वाच्या साहित्यप्रकारांचा इतिहास व विकास पाहणे उद्बोधक ठरेल.
महाकाव्य आणि अद्भुतरम्य काव्य : महाकाव्याचा आदर्श निर्माण करणारा पहिला महाकवी म्हणजे सारळा दास (सु. पंधरावे शतक) हा होय. त्यानेमहाभारत, विलंका रामायण आणि चंडीपुराण हे तीन काव्यग्रंथ लिहिले. महाभारत हा ओडिया साहित्यातील महान ग्रंथ असून ओरिसातील लोकजीवन, संस्कृती व साहित्य यांवर त्याचा सखोल ठसा उमटला आहे.
यानंतर सोळाव्या शतकात ⇨ पंचसखा (पंचशाखा) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाच वैष्णव कवींनी विपुल व दर्जेदार काव्यनिर्मिती केली. हे पाचहीजण सिद्धयोगी व प्रतिभाशाली कवी होते. त्यांनी चैतन्य महाप्रभू ओरिसात पुरी येथे असताना त्यांच्याशी सख्य करून त्यांचे अनुयायित्व पतकरले. हे पाच वैष्णव कवी पुढीलप्रमाणे होत : ⇨ बलराम दास (सु. १४७० — सु. १५४०), ⇨ जगन्नाथ दास (सु. १४८६ — ?), यशोवंत दास, अनंत दास आणि ⇨अच्युतानंद दास (सु. १४८९ — ? ) ह्या पाच कवींनी भक्तिमार्गास योग व तंत्र मार्गांची जोड देऊन आपला वैशिष्ट्यपूर्ण भक्तिमार्ग पुरस्कारिला. आजही ओरिसातील वैष्णव पंथात ह्या योग व तंत्रमिश्रित भक्तिमार्गाचा प्रवाह आढळतो. ह्या कवींनी ओडिया साहित्यात अत्यंत मोलाची भर घातली आहे. त्यांनी विपुल काव्यनिर्मिती केली असून त्यातील काही प्रकाशित, काही अप्रकाशित तर काही अनुपलब्ध आहे. बलराम दासाचे रामायण आणि जगन्नाथ दासचे भागवत हे ग्रंथ ओडिया साहित्यात महत्त्वाचे मानले जातात आणि ते लोकप्रियही आहेत. अच्युतानंद दास हा त्याच्या मालिकेसाठी व हरिवंशासाठी प्रख्यात आहे तसेच त्यानेकैवर्त गीता आणि गोपालांक उगाल ही महत्त्वपूर्ण काव्येही रचली आहेत. यशोवंत दास आणि अनंत दास यांनी तंत्र व योग यांवर तसेच भक्तीच्या चमत्कारांवर स्फुट काव्यलेखन केले आहे. यशोवंत दासाची काही गीते नाथपंथीय जोगी (योगी) आजही गातात. ह्या दोघांची रचना प्रामुख्याने सांप्रदायिक स्वरूपाची असल्यामुळे, ती साहित्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची नाही. बलराम दासांच्या रामायणाच्या धर्तीवर नंतरच्या कवींनी जवळजवळ तीस काव्ये लिहिली. या प्राचीन काळातील महाकवींच्या काव्यनिर्मितीमागील उद्देश केवळ धार्मिक नव्हता किंवा केवळ एखाद्या विशिष्ट धर्माचा वा पंथाचा प्रचार करण्याचाही नव्हता. त्यांनी आपल्या काळातील जीवनाचे चित्रण आपल्या काव्यातून केले आणि पूर्वीच्या महाकवींच्या पावलावर पाऊल टाकून काव्याची परंपरा चालू ठेवली. या महाकाव्यांतील जे महान नाट्य होते, त्याचे वातावरण हे सर्वस्वी पंधराव्या व सोळाव्या शतकांतील ओरिसाचे होते.
सारळा दासाचे चंडीपुराण हे ओडिया भाषेतील पहिले अद्भुतरम्य काव्य म्हणता येईल. मार्कंडेय पुराणातील ‘देवी माहात्म्या’ ची ही केवळ ओडिया आवृत्ती नव्हे. या काव्याला पार्श्वभूमी म्हणून कपिलसिंह व त्याची पत्नी नारखी यांची प्रेमकथा असून ओरिसाच्या किनाऱ्यापासून ते श्रीलंकेच्या अरण्यापर्यंतची त्यांची भ्रमंती त्यात वर्णन केली आहे.
असे असले तरी खऱ्या अर्थाने कलात्मक महाकाव्याचा उद्गाता कविसमर्थ ⇨ उपेंद्र भंज (सु. १६७० — सु. १७२०) हाच होय.त्याच्या काव्याचे विशेष म्हणजे प्रगल्भ भाषा, शृंगारिक भावना, काल्पनिक प्रसंगनिर्मिती आणि कलात्मक संवेदनशीलता हे होत. उपेंद्र भंजासारखे इतरही अनेक कवी त्याच्या आगेमागे होऊन गेले. ते एक तर स्वतः राजे होते किंवा एखाद्या राजाच्या दरबारात आश्रित तरी होते. तथापि उपेंद्र भंजाची सर त्यांतील कोणालाच आली नाही. त्यातल्या त्यात राजा कृष्णसिंह(अठरावे शतक) याने केलेला मूळ महाभारताचा ओडिया अनुवाद उल्लेखनीय असून, तो प्राचीन पंरपरेतील अनुवादांत विशेष प्रमाणभूत मानला जातो.
आधुनिक काळात काव्यातील आशय, अभिव्यक्ती व काव्यनिर्मितीच्या प्रेरणा यांत स्थित्यंतर घडून आले. ⇨राधानाथ राय (१८४८ — १९०८) हे या आधुनिक काव्याचे व साहित्याचे जनक होत. ओडिया काव्यात त्यांनी क्रांती घडवून आणली. ओडिया साहित्य, विशेषतः काव्य, हे शृंगार आणि भक्ती या दोन भावनांमध्ये फिरत होते. या स्थितीतून राधानाथांनी काव्याला बाहेर काढून त्याद्वारे जीवनाच्या विशालतेचे दर्शन वाचकाला घडविले. यासाठी त्यांनी पाश्चात्त्य मानवतावाद तसेच वैज्ञानिक आणि वास्तववादी दृष्टिकोन यांची मदत घेतली आणि सौंदर्यवादी दृष्टीने आपली कविता लिहिली. शेक्सपिअर, गटे, व्हर्जिल आणि दान्ते तसेच कालिदास, भवभूती, वाल्मीकी आणि व्यास यांसारखा पाश्चात्त्य आणि पौर्वात्त्य महाकवींच्या उत्तमोत्तम काव्याचे पडसाद त्यांच्या काव्यपंक्तींतून ऐकू येतात.ऐतिहासिक जाण आणि उदयोन्मुख राष्ट्रांतील प्रबुद्ध हृदयांची स्पंदने त्यांच्या काव्यानुभावात खोलवर रूजल्याचे दिसून येते. राधानाथांची महायात्रा (अपूर्ण) व चिलिका ही उत्कृष्ट खंडकाव्ये असून ती ओडिया साहित्यात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जातात. महायात्रा हे खंडकाव्य त्यांनी मुक्तच्छंदात रचिले आहे. यांशिवाय त्यांनी केदारगौरी, चंद्रभागा, नंदिकेश्वरी, ययाति–केशरी, उषा आणि पार्वती ही काव्ये लिहिली आहेत.
आधुनिक काळात अद्भुतरम्य काव्य आणि महाकाव्य यांचा पगडा नष्ट झालेला दिसत असला, तरीदेखील अधूनमधून एखादा कवी कलावैचित्र्याऱ्याची भूक भागविण्यासाठी याही साहित्यप्रकारांचा उपयोग करताना आढळतो. ⇨ मायाधर मानसिंह (१९०६ — ), कुंजबिहारी दास
(१९१४ — ) इत्यादींचा उल्लेख या संदर्भात करता येईल.
भावगीत : ओडिया साहित्यातील भावगीत हा सर्वांत जुना काव्यप्रकार होय. प्राचीन आणि मध्ययुगीन काळांत मनोरंजनाबरोबरच धार्मिक शिकवण देण्याचे कार्यही प्रामुख्याने ह्या भावगीतांमुळे साधले जाई. तथापि त्यांतील काही प्रकारच्या भावगीतांतून मानवी भावनांचा सूक्ष्म व तरल आविष्कार आढळतो. विशेषतः ‘कोइली’ व ‘चौतिसा’ या भावगीतप्रकारांत मातेच्या वात्सल्यभावनेचा सहजोत्कट आविष्कार आहे. असे असले, तरी आधुनिकांची तरल संवेदनशीलता या प्राचीन भावगीतांत आढळत नाही. भावगीतात कवीच्या वैयक्तिक भावभावनांचा आविष्कार असतो. परंतु या प्राचीन भावगीतांत विशिष्ट परिस्थितीतील जनसमुदायाच्या प्रातिनिधिक भावनांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. व्यक्तीच्या कर्तव्यभावनेची सखोल जाण आणि उत्कट ईश्वरभक्ती व्यक्त करणारी आध्यात्मिक भावकाव्ये रचणाऱ्या कवींत मार्कंड दास, भक्तचरण, बलराम दास, माधवी दास, ⇨दीनकृष्ण दास यांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. या भावगीतांतून अलौकिक प्रेम, लौकिक सुख त्याचप्रमाणे वैराग्य या भावनांचा आविष्कार करण्यात आला आहे. अलौकिक प्रेम आणि वैराग्य या दोन आत्यंतिक भावनांची उदाहरणे कविसूर्य ब्रह्म याच्या प्रेमचिंतामणी चौतिसा व भक्तचरण याच्या मनबोध चौतिसा यांत आढळतात. प्रेमाखातर सामाजिक आणि धार्मिक बंधने झुगारून देण्याची प्रेमिकांची बंडखोरी प्रेमचिंतामणी चौतिसामध्ये निर्भयपणे व्यक्त झाली आहे.
आधुनिक भावकवींत एकोणिसाव्या शतकातील राधानाथ राय हे अग्रगण्य होत. आधुनिक भावकाव्यात मानव आणि निसर्ग यांतील परस्परसंबंध अभिव्यक्त झाला आहे. सुख आणि दुःख, प्रेम आणि मत्सर इ. भावनांच्या विविध छटांचे उत्कृष्ट चित्रण या भावगीतांतून करण्यात आले आहे. सुनीत, ओड (उद्देशिका), विलापिका, गोपगीत, गुराख्यांची गाणी इ. काव्यप्रकार हाताळण्याचे व नवीन यमकरचनेचा वापर करण्याचेही बरेच प्रयोग करण्यात आले. ⇨ मधुसूदन राव (१८५३ — १९१२), ⇨ गंगाधर मेहेर (१८६२ — १९२४), ⇨नंदकिशोर बल (१८७५ — १९२८) व इतर अनेक कवींनी ओडिया भावकाव्यात मौलिक भर घातली. मधुसूदन राव यांनी परमेश्वर, विशुद्ध जीवन तसेच जीवात्मा व परमात्मा यांचे मीलन ह्यांची गाथा गायिली आहे. त्यांना परमात्म्याचे अस्तित्व सर्वत्र जाणवत असे. त्यांनी गीत, भावगीत, वीरगीत, सुनीत इ. प्रकारांत रचना केली. त्यांचे काव्य ओडिया साहित्यात एक प्रभावी व चैतन्यपूर्ण अशी नैतिक व आध्यात्मिक शक्ती म्हणून महत्त्वाचे मानले जाते. बसंत–गाथा हा त्यांच्या सुनीतांचा संग्रह आणि उत्कल–गाथा व कुसुमांजली हे त्यांच्या भावगीतांचे संग्रह होत. गंगाधर मेहेर व नंदकिशोर बल यांनी राधानाथ व मधुसूदन यांच्यापासून प्रेरणा घेऊन कविता लिहिली. गंगाधर मेहेर यांनी प्रामुख्याने पौराणिक विषयच आपल्या काव्यासाठी निवडले. तथापि त्यांची अभिव्यक्ती मात्र अभिनव आहे. गेयता, नव्या छंदांचा वापर, अभिनव दृष्टिकोन व वास्तवता हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. त्यांची अनेक गीते व श्लोक ओरिसातील लोकांच्या जिभेवर घोळत असतात. तपस्विनी हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय व प्रसिद्ध काव्य होय. नंदकिशोर बल यांनी प्रामुख्याने ओरिसातील ग्रामीण जीवनाचा आविष्कार केला. लोकगीतांच्या चालींवर त्यांनी आपली भावकविता लिहिली. त्यांच्या भावकाव्यातून लोकसंस्कृतीचे मनोहर दर्शन घडते. पल्लीचित्र हे त्यांचे दर्जेदार काव्य होय.
राधानाथ व मधुसूदन यांच्या परंपरेतील कवींनी ही परंपरा सु. १९३० पर्यंत कशीबशी चालू ठेवली. १९१० पासूनच बुद्धिवादी कवी व लेखकांची नवी पिढी उदयास येऊन जनमानसाची पकड घेऊ लागली होती. १९०३ मध्ये ‘उत्कल सम्मीलनी’ नावाच्या संस्थेची स्थापना झाली. ह्या संस्थेने ओडिया भाषिक लोकांच्या स्वतंत्र प्रदेशाची मागणी केली. ह्या चळवळीचे अध्वर्यू सुप्रसिद्ध देशसेवक पंडित ⇨ गोपबंधू दास (१८७७ — १९२८) हे होते. त्यांच्या काव्याने, गद्यलेखनाने आणि वक्तृत्त्वाने ओरिसातील जनमानसावर विलक्षण प्रभाव पाडला. ओरिसातील जनतेच्या आशा – आकांक्षांना त्यांनी वाचा फोडली. नीलकंठ दास, पंडित ⇨ गोदावरीश मिश्र (१८८६ — १९५६), कृपासिंधू मिश्र हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी निर्माण केलेले साहित्य सत्यवादी शाखेचे साहित्य म्हणून ओडिया साहित्यात ओळखले जाते. गोपबंधू दासांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिक्षण व साहित्याद्वारे राष्ट्रीय पुनरुत्थानाचे कार्य हाती घेतले. ही चळवळ प्रामुख्याने पुनरुज्जीवनवादी होती. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या आदर्शाकडे लोकांचे लक्ष वेधविणे व साधे जीवन व उच्च विचारसरणी यांचा आदर्श घालून देशासाठी तसेच मानवताधर्मासाठी स्वतःच्या जीवनाचा होम करणे, हा तिचा उद्देश होता. या संघटनेने आपल्या अल्पशा प्रभावकाळात थोडेसेच, परंतु उच्च प्रतीचे साहित्य निर्माण केले. गोपबंधू दास यांनी आपल्या संघटनेच्या प्रचारासाठी सत्यवादी मासिक व समाज नावाचे साप्ताहिक सुरू केले. संघटनेची ही मुखपत्रे होती. ह्या मुखपत्रांतून दर्जेदार ओडिया गद्य प्रसिद्ध झाले. त्यात भारदस्तपणा, सुबोधता, भाषेचा डौल, उदात्त विचार, काव्यात्मकता इ. गुण आहेत. पंडित ⇨ नीलकंठ दास (१८८४ — १९६७) यांनी आऱ्याच्या जीवनावर एक ग्रंथ लिहून ब्राह्मण्याच्या आदर्शाकडे लोकांचे लक्ष वेधविले. कोनारक येथील सूर्यमंदिरावरही त्यांनी एक उत्कृष्ट काव्य लिहिले. अलीकडेच त्यांनी उडियासाहित्यर क्रमपरिणाम नावाचा बृहद्ग्रंथ लिहिला असून तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ओरिसातील सामाजिक व वाङ्मयीन इतिहासाची मीमांसा त्यात आहे. कृपासिंधू मिश्र यांनी कोणार्क व बारबाटी नावाचे दोन ऐतिहासिक स्वरूपाचे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. गोदावरीश मिश्रांनी देशभक्तिपर नाटके, काव्ये व वीरगीते लिहिली.
नाटक: ओडिया नाट्यवाङ्मयाचा उगम निश्चितपणे कशातून व केव्हा झाला हे सांगणे कठीण आहे. अगदी जुन्या काळातील सारळा दास आणि बलराम दास यांच्या महाकाव्यांत उपाख्यानांचे कथन किंवा पात्रांचे स्वभावपरिपोष किंवा संवादरचना यांमधून नाट्यगुणांचे अस्तित्व जाणवते. विशिष्ट प्रकारचे नाट्यवाङ्मय लोककलेच्या व लोकसाहित्याच्या रूपाने विकसित होतच होते. सखी-नाच, गोटिपुआ-नाच, रास, लीला, तमाशा आणि जात्रा हे या लोककलेचे प्रमुख प्रकार होत. हे प्रकार हाताळणारे वैष्णव पाणी आणि मोहन गोस्वामी हे प्रमुख लेखक होत. जुन्या पठडीतील ⇨कविसूर्यबलदेवरथ (१७८९ – १८४५) याचेकिशोरचंद्रानंदचंपू हे नाट्यात्म काव्याचे उत्तम उदाहरण असून राधा, कृष्ण आणि ललिता या तीन पात्रांच्या द्वारा उत्कट मानवी भावभावना आणि जीवनातील कारुण्य यांचे मनोज्ञ दर्शन त्याने त्यात घडविले आहे.
आधुनिक काळात नाट्यवाङ्मयाचा विकासही हळूहळू होत होता. केवळ साहित्यातील एक प्रतिष्ठित प्रकार म्हणूनच नव्हे, तर ओरिसातील राष्ट्रीय जीवनाचा एक भाग म्हणूनही नाट्यवाङ्मयास मानाचे स्थान प्राप्त झाले. प्रादेशिक भावनेतूनच ओडिया नाट्याला प्रेरणा मिळाली कारण ओरिसात ज्या बंगाली नाटक मंडळ्या बंगाली नाटकांचे प्रयोग करीत होत्या, त्यांना आव्हान म्हणूनच ओडिया लेखकांनी आपली नाटके लिहिली.⇨ रामशंकरराय (१८५७ — १९३१), कामपाल मिश्र, भिखारीचरण पटनाइक आणि गोविंद सुरदेव या नाटककारांनी याबाबतीत पुढाकार घेऊन नाटके लिहिली आणि ती रंगभूमीवर आणून ओडिया रंगभूमीस प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी केवळ करमणुकीचे एक साधन म्हणूनच नव्हे, तर सामाजिक सुधारणेचे व राष्ट्रीय पुनरुत्थानाचे एक प्रभावी साधन म्हणून रंगभूमीचा उपयोग करून घेतला. ओरिसाच्या उज्ज्वल इतिहासातून विषय निवडून त्यांनी आपली नाटके लिहिली. त्यांतील इतिहासाच्या स्फूर्तिप्रद दर्शनाने ओरिसातील लोकांच्या भावना उचंबळून आल्या आणि ही नाटके अत्यंत लोकप्रिय झाली.
याच काळात वैष्णव पाणी यांनी ओरिसातील ग्रामीण नाट्यात क्रांती घडवून आणली. ‘जात्रा’ नावाच्या प्रचलित लोकनाट्यप्रकारास त्यांनी आधुनिक रूप दिले. त्यामुळे जात्रा नाट्यप्रकारात वर्तमान परिस्थितीचे प्रतिबिंब पडून तो प्रकार ओरिसातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरला. रामशंकर राय हे आधुनिक काळातील यशस्वी नाटककार असून राजकीय जागृती आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी बारा नाटके लिहिली.कांची–कावेरी (१८८०) हे सुरुवातीच्या काळातील त्यांचे पहिले नाटक. नाट्यगृहात किंवा जात्रा या प्रकाराप्रमाणेच खुल्या नाट्यगृहांत ही नाटके केली जात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक रंगमंदिरे स्थापन झाली. आता अनेक रंगमंदिरांत विविध नाटकांचे शेकडो प्रयोग होत आहेत. कटक, पुरी व बेऱ्हमपूर यांसारख्या शहरांत काही कायम रंगमंदिरे आहेत. इतर लहानमोठ्या शहरातून काही नाटक मंडळ्या तात्पुरते मुक्काम ठोकून नाट्यप्रयोग सादर करीत असतात. गेल्या काही वर्षांत या सर्व नाटक मंडळ्यांसाठी अनेक नाटके लिहिली गेली आहेत. काही वेळा धंदेवाईक नाटककार एखाद्या विशिष्ट नटासाठी किंवा आम जनतेला आवडेल असे गल्लाभरू नाटकही लिहितो. ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक इ. विविध प्रकारच्या विषयांवरही नाटके आढळतात. ह्या नाटककारांत कोणार्कचे (१९२७) लेखक ⇨ अश्विनीकुमार घोष (१८९२ — १९६२) तसेच ⇨ कालीचरण पटनाइक (१९०० — ) हे उल्लेखनीय नाटककार होत. यांशिवाय काही लेखकांनी आपली नाटके रंगभूमीसाठी न लिहिता केवळ वाचनासाठीच लिहिलेली आहेत. ही नाटके प्रामुख्याने काव्यात्म असून त्यांना तत्त्वज्ञानाची व जीवनाच्या विशाल व सखोल अनुभूतीची बैठक आहे. याप्रकारची नाटके लिहिणारे प्रसिद्ध नाटककार म्हणजे ⇨ बैकुंठनाथ पटनाइक (१९०४ — ), ⇨ कालिंदीचरण पाणिग्राही (१९०१ — ) व मायाधर मानसिंह हे होत.
कादंबरी: कादंबरी हा आधुनिक वाङ्मयप्रकार होय. ⇨फकीरमोहनसेनापती (१८४३ — १९१८) हे ओडिया कादंबरीचे जनक होत. फकीरमोहन सेनापती, राधानाथ राय व मधुसूदन राव ही आधुनिक ओडियातील ‘त्रयी’ म्हणून ओळखली जाते. ह्यांनी ओडिया साहित्यात क्रांती घडवून आणली. ह्या त्रयीचे नेते फकीरमोहन होते. राधानाथ व मधुसूदन यांनी काव्यात, तर फकीरमोहन यांनी गद्यलेखनात क्रांती घडवून आणली. या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या कादंबऱ्या लिहिल्या. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतीय समाजात जी प्रचंड उलथापालथ होऊ लागली होती, तिचे दर्शन त्यांच्या कादंबऱ्यांत घडते. त्यांच्या कादंबऱ्यांत अत्यंत सामान्य माणसाचे तसेच जमीनदार, सरंजामदार यांचेही चित्रण केलेले आढळते. एखाद्या अज्ञात खेड्यात अथवा प्रसिद्ध शहरात चालू असलेल्या जीवननाट्याचे, त्याचप्रमाणे खेड्यातील देवालयातील तसेच शहरातील कोर्ट वा कॉलेज यांतील जीवनाचेही दर्शन त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून घडविले आहे. दीर्घकालीन प्रशासकीय अनुभवानंतर, वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी फकीरमोहन सेनापतींनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादींची पद्यात भाषांतरे केली असून, इतर प्रकारचे काव्यलेखनही केले आहे. आपल्या जीवनातील सखोल व व्यापक अनुभवाचा पुरेपुर उपयोग त्यांनी आपल्या कादंबरीलेखनात केला आहे. छमाणआठ–गुंठ, लच्छमा व प्रायश्चित ह्या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. फकीरमोहनांना अनेक अनुयायी लाभले. नंदकिशोर बल व ⇨ चिंतामणी महांती (१८६७ — १९५२) या फकीरमोहनांच्या प्रभावळीतील प्रमुख लेखकांचा आवर्जून उल्लेख करावयास हवा.
शहरी तसेच मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे विविध पैलू चित्रित करू पाहणारा नवीन लेखकवर्ग १९२० च्या सुमारास पुढे आला. गांधीयुगात राजकीय व सामाजिक स्वरूपाच्या तात्त्विक प्रेरणेतून लिहिलेल्या कादंबऱ्याही निर्माण झाल्या. आधुनिक काळात शिक्षणाचा विशेष प्रसार झाला व त्यामुळे साहजिकच वाचकवर्गही वाढत गेला. त्यामुळे कादंबरीलेखनाकडे लेखकांचा विशेष कल दिसू लागला. काही जणांनी केवळ व्यापारी वृत्तीने आपले लेखन केले, तर काहींनी प्रेमासंबंधी सवंग कादंबऱ्या लिहिल्या. अनेक कल्पनारम्य कथाही याच सुमारास लिहिल्या गेल्या. असे असले, तरी काही थोड्या लेखकांनी मात्र आपली कलात्मक सर्जनाची उच्च पातळी न सोडता दर्जेदार लेखन केले. अंतर्मुख व बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या अनेकविध भाववृत्तींचे चित्रण त्यांनी केले. जीवनाची व निसर्गाची नवीन क्षेत्रे धुंडाळून त्यांनी त्यानुरूप कादंबरीच्या आशयाभिव्यक्तीचे विविध प्रयोग केले. कधी त्यांच्या कादंबरीला सुस्पष्ट कथावस्तूच नसते, तर कधी स्वभावचित्रणही स्पष्ट नसते, तसेच सुसंगत असा विषयही तिला नसतो तरीही लेखकाच्या कलात्मक आविष्काराचा धागा मात्र त्यांतून दिसतो. या प्रयोगशील लेखकवर्गातील विशेष उल्लेखनीय लेखक म्हणजे ⇨ गोपीनाथ महांती (१९१४ — ), ⇨कान्हुचरण महांती (१९०६ — ), ⇨नित्यानंद महापात्र (१९१२ — ) व ⇨ राजकिशोर पटनाइक (१९१२ — ) हे होत.
कथाकादंबरीलेखनातील नवीन प्रवाह म्हणजे वैज्ञानिक स्वरूपाच्या कथाकादंबऱ्या असून, त्यांतील काही अत्यंत लोकप्रियही झाल्या आहेत. प्रेमकथा, कल्पनारम्यकथा आणि हेरकथा यांपेक्षाही या प्रकारच्या कथाकादंबऱ्यांची मोहिनी लोकांवर अधिक आहे. लोकांना विज्ञानाची गोडी लावण्यात या वैज्ञानिक कथाकादंबरीकारांचा वाटा निश्चितपणेच मोठा आहे, असे म्हणावे लागेल.
कथासाहित्य : गेल्या शंभर वर्षांत शेकडो ओडिया लोककथा संकलित करण्यात आल्या. प्राचीन काळात अनेक लेखकांनी गद्य-पद्य कथा लिहिण्याचे प्रयत्न केले. अठराव्या शतकातील दीनकृष्ण दास या कवीने प्रस्ताव सिंधु नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला. पद्यस्वरूपातील प्राचीन कथालेखनाचा तो एक उत्तम नमुना आहे. परंतु याच काळातील ⇨ ब्रजनाथ बडजेना (१७३० — १७९५) या थोर लेखकाने गद्यकथा लिहिण्याचा यशस्वी प्रयत्न केला. नीतिशिक्षणाबरोबरच वाचकांचे मनोरंजन करणे, हाही त्याचा हेतू होता. राजा आणि त्याचे दरबारी लोक यांचे मनोरंजन करण्यासाठी ‘गल्प-सागर’ (कथासागर) या नावाने ओळखला जाणारा कथाकारांचा एक वर्ग असे. त्यांच्या कथा प्रायः शृंगारिक असत आणि त्या ते नाट्यमय आविर्भावाने सांगत. ब्रजनाथ याने गल्प-सागरशैलीचा आपल्या चतुर विनोद या कथाग्रंथात चांगला उपयोग करून घेतला. ब्रजनाथाच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे आणि मानवी स्वभावाचे व दरबारी रीतिरिवाजांचे अचूक ज्ञान यांचा या ग्रंथात प्रत्यय येतो. राजे आणि त्यांचे पुरोहित यांचा उपहासही त्याच्या कथांतून केलेला आढळतो.
आधुनिक लघुकथेचा उदय एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला झाला. आधुनिक कथालेखनातही फकीरमोहन सेनापती यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केवळ वीस – पंचवीस कथा लिहिल्या असल्या, तरी त्यामुळे लघुकथालेखनाचा आदर्श घातला गेला. अनेक लेखकांनी त्यांचे अनुकरण करून आपले कथालेखन केले. वृत्तपत्रांमुळे व मासिकांमुळे कथालेखनाला चांगलेच प्रोत्साहन मिळाले. आधुनिक काळातील धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात लघुकथेने आपल्या लघुत्वामुळे फार मोठा वाचकवर्ग आपल्याकडे आकर्षून घेतला. लघुकथालेखनात विविध प्रकारचे प्रयोग करण्यात आले आणि आजही केले जात आहेत. नवकाव्याप्रमाणे लघुकथेतही कधीकधी कथालेखकाच्या वैयक्तिक भावना अधिक प्रमाणात अभिव्यक्त केल्या जातात आणि कलात्मक प्रयोगाच्या नावाखाली ती एवढी दुर्बोध बनते, की तिचा अर्थच कित्येकदा हरवून बसतो. ह्या कथालेखकांत ⇨ शची रौतराय (१९१६ — ), राजकिशोर पटनाइक, ⇨ राजकिशोर राय (१९१४ — ), ⇨ सुरेंद्र महांती (१९२० — ), अनंतप्रसाद पंडा हे विशेष उल्लेखनीय होत.
टीकासाहित्य: टीकासाहित्य हे ओडिया साहित्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. जुन्या परंपरेतील लेखकांना काव्य आणि टीका या दोन्ही गोष्टींची चांगली जाण होती आणि म्हणूनच प्रत्येक कवी हा बहुधा टीकाकारही असे. कवी ‘सुहृदास’ म्हणजे रसिकास उद्देशून जे आवाहन करत असे, त्यात स्वतःच्या कृतीच्या आस्वादासंबंधीच्या आपल्या कल्पनाही तो मांडत असे. जुने कवी कमीअधिक प्रमाणात संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वे आपल्या रचनेसाठी आधारभूत मानीत असत. उपेंद्र भंजासारख्या कवींनी काव्यशास्त्रावररसपंचक, छंद रत्नाकर यांसारखे स्वतंत्र ग्रंथही लिहिले आहेत.
आधुनिक काळात टीकासाहित्य हे साहित्याचे अविभाज्य अंग बनले आहे. साहित्यात नवे प्रवाह निर्माण करणारे लेखक हे अव्वल दर्जाचे टीकाकारही होते असे आढळते. राधानाथांनी सुरू केलेल्या नवकाव्याच्या प्रणालीला जुन्या परंपरेतील कवींचा कडवा विरोध होता. जेव्हा काव्यात एखादी नवीन प्रणाली सुरू होते, तेव्हा पारंपरिक टीकाकारांना तिचे मर्म चटकन समजते, असे क्वचितच होते. मान्यवर टीकाकार हे बहुधा जुन्या परंपरेचे अभिमानी असतात आणि त्यांची दृष्टी बहुधा मागे वळलेली असते. यामुळे नव्या काव्याची तुलना जुन्या काव्याशी करून त्याचे मूल्यमापन करण्याचा त्यांना मोह होतो. तथापि नवे कवी आणि सर्जनशील लेखक स्वतःच्या साहित्याबाबत स्वतःच आपला नवा दृष्टीकोन समजावून सांगत असतात व आपला वाचकवर्ग निर्माण करत असतात. टीकेबाबत ओडिया साहित्यात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस नेमके हेच घडले. एका बाजूला नवे सर्जनशील कलावंत व दुसऱ्या बाजूला सनातनी टीकाकार यांच्यात रस्सीखेच चालू होती. या परिस्थितीत राधानाथ व मधुसूदन यांसारखे कवी आणि रामनारायण लाला, गोपाल बल्लव दास यांसारखे टीकाकार यांनी ओडिया टीकासाहित्यात मोलाची भर घातली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच ओडिया टीकासाहित्याला भक्कम बैठक प्राप्त झालेली दिसते. त्यात प्राचीन साहित्यावर नव्या दृष्टीने प्रकाश टाकण्यात आला होता. आधुनिक साहित्याचाही तटस्थपणे सखोल अभ्यास करण्यात आला. पंडित गोपीनाथ नंद शर्मा व पंडित ⇨ मृत्युंजय रथ (१८८२ — १९२४) हे दोघेजण आधुनिक ओडिया ⇨ टीकासाहित्याचे जनक होत. गोपीनाथ नंद शर्मा हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी भाषाशास्त्रावर एक दर्जेदार ग्रंथ लिहिला तसेच पंधराव्या शतकातील विख्यात महाकवी सारळा दास याच्या साहित्यावरही एक उत्कृष्ट संशोधनपर ग्रंथ लिहिला. मृत्युंजय रथ यांनीही ओडिया टीकावाङ्मयात मोलाची भर घातली आहे. त्यांनी विभूतिपूजेच्या भावनेने काही चरित्रे लिहिली. त्यांतील शैली विशेष लालित्यपूर्ण आहे. १९१० नंतर कलकत्ता विद्यापीठात ओडिया भाषा-साहित्याचे अध्ययन सुरू झाले आणि ओडिया साहित्यातील एम्. ए. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोयही करण्यात आली. त्यामुळे अनेक प्राचीन ओडिया ग्रंथांचे संपादन केले गेले. आर्तवल्लभ महांती या क्षेत्रातील आद्य प्रणेते मानले जातात. त्यांच्या प्रस्तावनांमधून प्राचीन कवींच्या जीवनावर व काव्यांवर चांगला प्रकाश पडतो. उत्कलसाहित्य आणि सत्यवादीयांसारख्या पत्रिकांनी ओडिया टीकावाङ्मयाच्या विकासास मोलाचा हातभार लावला. या पत्रिकांतून काही विचक्षण टीकाकारांचा वर्ग तयार झाला. या लेखकवर्गापैकी पंडित नीलकंठ दास व पंडित ⇨ बिनायक मिश्र (१८९४ — १९७१) हे विशेष उल्लेखनीय टीकाकार होत. गेली दहा वर्षे टीकावाङ्मयाची सतत वाढ होत आहे आणि ओडिया साहित्याचा सखोल अभ्यासही होत आहे. आतापर्यंत अनेक दर्जेदार टीकाग्रंथ लिहिले गेले.
इतरगद्यपद्यप्रकार: (अ) गद्य : ललित गद्य, प्रवासवर्णन, वैज्ञानिक कथासाहित्य यांसारखे वाङ्मयप्रकार गेल्या काही वर्षांत ओडियात निर्माण होऊन, ते विशेष समृद्धही झाले. नवकाव्याचे प्रणेते राधानाथ यांनीच ललित गद्यलेखनाला प्रारंभ केला. विवेकी व भ्रमणकरिरपत्र (एका प्रवाशाची पत्रे) हे त्यांचे या प्रकारचे विशेष उल्लेखनीय ग्रंथ होत. ललित निबंधात व ललित गद्यलेखनात ⇨ गोपालचंद्रप्रहराज (१८७५ — १९४५) यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांची शैली आकर्षक असून बोलभाषेप्रमाणेच ग्रांथिक भाषेवरील प्रभुत्व, धारदार विनोद आणि आकर्षक निवेदन या गुणांचा त्यांच्या लेखनात चांगला प्रत्यय येतो.
ओडियात प्रवासवर्णने वाढत्या संख्येने लिहिली जाऊ लागली आहेत. देशातील प्रेक्षणीय व निसर्गसौंदर्याने नटलेल्या स्थळांची ओळख करून द्यावी, या हेतूने सुरुवातीस अनेक प्रवासवर्णने लिहिली गेली. तथापि सध्याच्या काळात सर्व जगभर फिरण्याची संधी अनेकांना उपलब्ध झाली आहे. आधुनिक काळात अशा प्रवासवर्णनलेखकांत पत्रकार, विद्यापीठांतील प्राध्यापक, प्रशासक, या सर्वांचा समावेश होतो.
(आ) काव्य : ओडिया काव्यात सध्या अनेक प्रयोग केले जात आहेत. काव्य म्हणजे केवळ गीत अशी भावना आता राहिलेली नाही. यमकसुद्धा आता आवश्यक मानले जात नाही. पद्य आणि गद्य यांचा विकास गेल्या हजार वर्षांत समांतर रेषेत होत गेल्यामुळे, त्यांच्यातील व्यवच्छेदकतेच्या सीमारेषाही आता काहीशा अस्पष्ट होऊ लागल्या आहेत. गद्य कधी कधी काव्यात्म रूप घेते, तर काव्यही कधी कधी दर्जेदार गद्यरूपात आविष्कृत होते. ओडिया नवकाव्यातील प्रयोगशीलता प्रतिमा आणि प्रतीके यांबाबतीत आढळते. अबोध मनाच्या खोल तळातून एखादी स्वप्नसृष्टी साकार करण्याचा प्रयत्न कवी कधी कधी करतात, तसेच त्यांची गीते अवकाश व काल यांच्या विशाल पटावरील ज्ञानाच्या पलीकडील प्रदेश व जीवनप्रतिमा यांसंबंधी असतात. त्यांच्या काव्यात विज्ञानाचे अद्भुत विश्व, पुराणकथा, आदिवासींतील कर्मकांड व निषिद्धे, माणसाच्या बाल्यावस्थेतील विधिनिषेध या साऱ्यांनाच स्थान लाभते. त्यामुळे पुष्कळ वेळा सामान्य वाचकांना हे काव्य दुर्बोधही वाटते आणि केवळ या काव्याची चांगली ओळख असलेला वाचकच या गूढ प्रकारच्या नवकाव्याचा आस्वाद घेऊ शकतो.
नियतकालिके : नियतकालिके ही आधुनिक काळाच्या उदयाची गमक होत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिस्ती धर्मप्रसारक व हिंदू धर्माभिमानी यांनी प्रथम नियतकालिके काढली. अरूणलोक, कुजिबर पत्रिका, परमार्थी यांसारखी मासिके व इतर नियतकालिके धार्मिक हेतूने काढण्यात आली. परंतु लवकरच महत्त्वाच्या ठिकाणी साहित्यमंडळे स्थापन होऊ लागली. नवशिक्षित तरूण वर्ग साहित्यावर आणि महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर चर्चा करू लागला. त्यांची मुखपत्रे म्हणून काही नियतकालिकेही निघू लागली. एकोणिसाव्या शतकात बलसोरहून बोधदायिनी, संबळपूरहून हितैषिणी, कटकहून दीपिका व उत्कलसाहित्य यांसारखी इतरही अनेक नियतकालिके प्रसिद्ध होत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सर्वस्वी साहित्याला किंवा राजकारणाला किंवा समाजसुधारणेला वाहिलेली अशी स्वतंत्र मासिकपत्रेच प्रकाशित होऊ लागली. वेगवेगळ्या राजकीय मतांचे लोक केवळ वर्तमानपत्रेच काढून थांबले नाहीत, तर बुद्धिजीवी वर्ग व लेखकवर्ग आपल्याकडे आकृष्ट व्हावा म्हणून साहित्यविषयक मासिकपत्रेदेखील चालवू लागले. हल्ली पाच वर्तमानपत्रे व सहासात मासिके कटकहून प्रसिद्ध होतात आणि कलकत्त्याहूनही काही ओडिया नियतकालिके निघतात.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
स्वातंत्र्योत्तरकाळातीलओडियासाहित्य: स्वातंत्र्योत्तर काळातील ओडिया साहित्याचा आढावा घेताना, आधीच्या ‘सत्यवादी दला’ च्या साहित्याचा आणि ‘सबूज दला’ च्या साहित्याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. ह्या दलांनी आपापल्या काळात ओडिया साहित्यात महत्त्वपूर्ण भर घालून ते समृद्ध केले. सबूज दलाचे साहित्य हे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांच्या संक्रमणावस्थेतील साहित्य होय. सबूज दलाचे नेतृत्व ⇨ अन्नदाशंकर राय (१९०४ — ) यांनी केले. कालिंदीचरण पाणिग्राही आणि बैकुंठनाथ पटनाइक हेही या दलातील महत्त्वाचे साहित्यिक होत. अन्नदाशंकरांनी ह्या काळात दर्जेदार भावकविता लिहिली असून ती उत्कलसाहित्य ह्या नियतकालिकातून तसेच सबूज कविता ह्या संग्रहातून प्रसिद्ध झाली. ह्या काळातील एक महत्त्वाचा कवी म्हणून त्यांना ओडिया साहित्यात स्थान आहे. काव्यव्यतिरिक्त त्यांनी निबंध, प्रवासवर्णन, कादंबरी व लघुकथा लिहिल्या. नंतर मात्र ते ओडियाऐवजी बंगालीतून लेखन करू लागले. ह्या दलातील बैकुंठनाथ पटनाइक व कालिंदीचरण पाणिग्राहींसारखे काही लेखक आजही दर्जेदार साहित्यनिर्मिती करीत आहेत.
सबूज दलानंतर समाजवादी विचारप्रणाली व मनोविश्लेषण इतर भारतीय साहित्यांप्रमाणेच ओडियातही अवतीर्ण झाले. मार्क्स, फ्रॉइड व वॉल्ट व्हिटमन यांचा प्रभाव ह्या साहित्यावर विशेषत्वे आढळतो. नवसाहित्याच्या प्रवर्तकांनी ओरिसातील वर्गकलहाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रक्षोभक व क्रांतिकारी कविता लिहिली. मार्क्सवादी प्रचारकी प्रेरणेतूनही काही दर्जेदार साहित्यनिर्मिती ओडियात झाली. अर्थात ओडिया साहित्यात ह्या प्रकारच्या साहित्याला जे स्थान लाभले, ते त्यातील प्रचारकी स्वरूपामुळे नव्हे, तर त्यातील मानवी भावभावनांच्या, सामाजिक वास्तवतेच्या आणि लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वाभाविक व कलात्मक आविष्कारामुळे. या दृष्टीने शची रौतराय यांचा पल्लीश्री हा कथासंग्रह उल्लेखनीय होय. आधुनिक जीवनातील वैफल्य व निराशा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या काही कथा व कविता दर्जेदार आहेत. तसेच अनंत पटनाइक व मनमोहन मिश्र यांच्या भावपूर्ण कविताही उल्लेखनीय होत.
ह्या क्रांतिवादी प्रेरणेतील साहित्याचा बहर आता ओसरू लागलेला असून, एलियट व पाउंड यांचा प्रभाव ओडिया साहित्यावर—विशेषतः काव्यावर —दिसत आहे. गेल्या तीस–चाळीस वर्षांत ओडिया साहित्यात अनेक साहित्यिक चळवळी उदयास आल्या व अस्तही पावल्या. अशा परिस्थितीतही काही साहित्यिकांनी कुठल्याही गटात वा चळवळीत सामील न होता मोठ्या धैर्याने पण आत्मविश्वासपूर्वक आपली साहित्यनिर्मिती चालू ठेवली आणि समीक्षकांनीही निःपक्षपातीपणे, कुठल्याही गटाचा अभिनिवेश न धरता, दर्जेदार साहित्य उचलून धरले व हिणकस साहित्यावर टीकाप्रहार केले. अशा निष्ठावंत साहित्यिकांत प्रामुख्याने ⇨ राधामोहन गडनायक (१९११ — ) यांची गणना करावी लागेल. त्यांनी आपल्या विपुल काव्यनिर्मितीत सौंदर्य, प्रेम, शौर्य यांचा प्रत्ययकारक आविष्कार केला आहे. स्मरणिका, उत्कलिका, कैस्वरिका, धुसर-भूमिका आणि समुकर स्वप्न हे त्यांचे संग्रह दर्जेदार होत. त्यांची कविता नेटकी व आकर्षक आहे. प्राचीन काव्याचे व छंदशास्त्राचेही ते गाढे अभ्यासक असून त्यांवर त्यांनी दर्जेदार ग्रंथ लिहिले आहेत. तथापि मायाधर मानसिंह, कुंजबिहारी दास (१९१४ — ) इ. काही मोजकी नावे वगळल्यास ओडिया काव्याची १९५० ते ६० ह्या दशकात पीछेहाटच झालेली दिसते. मानसिंह यांचे कमलायन हे महाकाव्य आणि कृष हा त्यांच्या सुनीतांचा संग्रह दर्जेदार आहे. कुंजबिहारी दास यांची माटी ओ लाठि आणि कंकाळर लुह ही सामाजिक महाकाव्ये आणि कलकल्लोल व चिताचित्र ह्या काव्यकृती वैशिष्ट्यपूर्ण होत. हे दशक प्रामुख्याने कादंबरी-नाटकाचेच दशक म्हणावे लागेल. १९६० नंतर मात्र ओडियात दर्जेदार काव्यनिर्मिती झालेली असून त्यात उपनिबेश (१९६७) हा मनोज दास यांचा काव्यसंग्रह दर्जेदार आहे. त्यांच्या काव्यातील आधुनिक दृष्टीकोन आणि तंत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. रवींद्र सिंह यांचा अप्रीतिकर कबिता (१९६७) हा बंडखोर कवितांचा संग्रहही लक्षणीय असून, त्यांची ही बंडखोरी मानव व ईश्वर यांच्याशी आहे. बैकुंठनाथ पटनाइक हे प्रतिभासंपन्न कवी असून त्यांच्या उत्तरायण ह्या भावगीत-संग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले आहे. १९६२ मध्ये चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाचे पडसाद ओडिया काव्यातही उमटले. एतद्विषयक कवितांचा महादीक्षा (१९६५) हा संग्रह लक्ष्मीनारायण राइसिंग यांनी संपादित केला आहे. कौन तारार काव्य (१९६५) हा ब्रजमोहन महांती यांच्या कवितांचा संग्रह असून, त्यात बदलत्या जीवनमूल्यांमुळे एका तरूण, संवेदनशील मनाचा झालेला भ्रमनिरास प्रतिबिंबित झाला आहे. शची रौतराय हे प्रभावी कवी असून नव्या पिढीवर त्यांचा विशेष प्रभाव पडला आहे. त्यांचा पांडुलिपि (१९४६) हा अत्यंत गाजलेला संग्रह. १९६२ मध्ये त्यांच्या कबिता ह्या संग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. गोविंद दास यांच्या जातक (१९६५) या संग्रहात आधुनिक समाजाच्या जटिल स्वरूपाचे बुद्धिवादी विश्लेषण आढळते. पी. के. मिश्र यांचा आत्मनेपदी (१९६५), मोहनचंद्र पढी यांचा सूर्य सोपारी नाइ (१९६५), कृष्णचंद्र त्रिपाठी यांचा बेला ओ बिची (१९६५) आणि ब्रह्मानंद दास यांचा धरणी ओ झरण (१९६५) हे संग्रहही उल्लेखनीय होत. सध्याच्या उदयोन्मुख कवींत चिंतामणी बेहेरा, जानकीबल्लव महांती, ब्रजनाथ रथ, रमाकांत रथ, सीताकांत महापात्र इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. ह्या काळात प्रदीर्घ काव्ये लिहिण्याचा फारसा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. तथापि कालीचरण पटनाइक यांचे अनंग (१९६५) हे दीर्घकाव्य मात्र त्यातील पारंपरिकता, भावनुकूलता, शब्दकळा आणि अभिनव प्रतिमा यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
फकीरमोहन सेनापतींनंतर कांदबरीक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. नंतर सबूज दलाचे कादंबरीकार पुढे आले तथापि त्यांनीही दोन-तीनच दर्जेदार कादंबऱ्यांची भर ओडिया साहित्यात घातली. १९४७ नंतर मात्र दर्जेदार कादंबऱ्यांची लाटच ओडियात उसळली. गोपीनाथ महांती यांची अमृतर संतान (१९४९) ही आदिवासी जीवनावरील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी असून, तिला १९५५ चे साहित्य अकादेमीचे पारितोषिकही मिळाले. याशिवाय त्यांच्या सरत बाबुन्क गली(१९४७), राहुर छाया (१९५२), दानापानी (१९५५), लयबिलय (१९६१), मातिमताल (१९६४) वगैरे कादंबऱ्याही दर्जेदार होत. कालिंदीचरण पाणिग्राही यांच्या लुहार मनीषा (१९४७) आणि आजिर मनीषा (१९५०) हा कादंबऱ्यांत आधुनिक जीवनानुभवाचे उत्कृष्ट दर्शन घडते. गोपीनाथ व कान्हुचरण महांती हे बंधुद्वय, तसेच चंद्रमणी दास, नित्यानंद महापात्र इ. उल्लेखनीय कादंबरीकारही याच काळात उदयास आले. गोपीनाथांनी आदिवासी जीवनावर, तर कान्हुचरण यांनी सामाजिक समस्यांवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या अभिनेत्री (१९४७), झंजा (१९५०), सर्बरी (१९५०), का (१९५५), बज्रबाहु (१९५८) इ. कादंबऱ्या महत्त्वपूर्ण होत. कमलाकांत दास (१९०६ — ) यांच्या इच्छा बरन (१९६५) या कादंबरीतील शहरी व ग्रामीण जीवनाचे चित्रण चांगले आहे. मदवाती(१९५२), दीपशिखा (१९६२), चित्रतारका (१९६३), चांदनी चौक (१९६३) इ. त्यांच्या कादंबऱ्याही महत्त्वपूर्ण होत. बिभुती पटनाइक यांच्या एई मन बृंदावन(१९६५), शेष बसंत (१९५५), प्रेम ओ पृथ्वी (१९५६), प्रथम सकाळ (१९५७), चपल छंदा (१९६१) आणि चतुर्थी (१९६७) तसेच ज्ञानींद्र वर्मा यांची अपराहनार आकाश (१९६५) ह्या उत्कृष्ट कादंबऱ्या होत. १९६७ च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या ओडिया कादंबऱ्यात भांडवलवादी समाजरचना व त्यातील भ्रष्टाचार, ग्रामीण एकत्र कुटुंबपद्धती, विधवांचे जीवन, अस्पृश्यता इ. विषय चित्रित केलेले दिसतात. उमेशचंद्र पाणिग्राही यांनी केवळ कलावादी मनोरंजनासोबतच बोधवादी दृष्टिकोनातूनही आपले कादंबरीलेखन केले आहे. राजकिशोर पटनाइक हे एक समर्थ लेखक असून त्यांनी कादंबरी, कथा, ललित निबंध इ. प्रकारांत दर्जेदार लेखन केले आहे. त्यांच्या सपन कुहुडी (१९४७), प्रेमीकर डायरी (१९५५), चला बात(१९५६), सकाळ कुहुडी (१९७०) इ. कृतींचा अवश्य उल्लेख करावा लागेल. सुरेंद्र महांती हे मुख्यत्वे कथालेखक असले, तरी त्यांनी काही कांदबऱ्याही लिहिल्या असून, त्यांतील नील शैल आणि अंधा दिगंत ह्या उत्कृष्ट होत.
ह्या काळातील कथालेखन विपुल व दर्जेदार आहे. जीवन संगीत, श्रुतिसंचयन आणि महानिर्बाण हे १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेले उल्लेखनीय कथासंग्रह अनुक्रमे राजकिशोर राय, गोदावरीश महापात्र आणि सुरेंद्र महांती यांचे असून, त्यांत वास्तववादी प्रभावी चित्रण आहे. दर्बार (१९६५) हा संतनू आचाऱ्याचा (१९३४ — ) वचिदिपन टीका (१९६५) हा रमेशचंद्र मिश्र यांचा कथासंग्रह असून. त्यांत औद्योगिकीकरणाचे तसेच गलिच्छ वस्त्यांचे चित्रण आहे. ह्या काळातील इतर उल्लेखनीय कथाकार म्हणजे बिभुती पटनाइक, नीलमणी साहू, राजकिशोर महांती, किशोरीचरण दास, कृष्णप्रसाद मिश्र, निमाईचरण पटनाइक, माधबचंद्र सतपथ हे होत. माधबचंद्र सतपथ यांनी आपल्या कथांत विनोदाचा प्रभावी उपयोग करून आधुनिक समाजरचनेतील दोषांवर प्रहार केले आहेत. ह्याच काळात इतर भारतीय भाषांतील तसेच इंग्रजीतील कथांचीही अनेक ओडिया भाषांतरे झाली आहेत. चिंतामणी मिश्र यांनी पर्ल बकच्या कथांचा निषिथे निस्तर ओ अन्यन गल्प (१९६५) नावाने केलेला ओडिया अनुवाद उल्लेखनीय होय. मनोज दास यांच्या कथा त्यांतील मानसशास्त्रीय दृष्टिकोनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. शेष बसंतर चिथी (१९६७) हा त्यांचा कथासंग्रह ओडियातील नवकथेचे आशास्थान आहे. ज्ञानींद्र वर्मा हे कवी व कांदबरीकार असले, तरी त्यांनी कथयंती (१९६७) हा दर्जेदार कथासंग्रहही प्रसिद्ध केला आहे. बसंतकुमारी पटनाइक यांच्या जीवन चिंता (१९६७) ह्या संग्रहात स्त्रीजीवनाचे वास्तववादी चित्रण आहे. उदयनाथ सरंगी यांचा मुद्गर मोह (१९६७) हा विनोद कथांचा संग्रहही उल्लेखनीय आहे. रानी अपथारू पुसिजा आणि भौतिक राजनीर ट्रॅजेडी हे नीलमणी साहू यांनी १९५२ ते १९६५ च्या दरम्यान लिहिलेल्या कथांचे संग्रह असून, महायुद्धोत्तर जीवनाचे उपरोधपूर्ण चित्रण त्यांत आहे.
ह्याच काळात अनेक नाटके व एकांकिका निर्माण झाल्या. त्यांतील बहुतांश नाटके सामाजिक असून ती विशेष लोकप्रियही आहेत. काही नाटके रहस्यप्रधानही आहेत. बलराम दास यांनी भारताच्या फाळणीवर सूर्य पराग (१९६७) हे नाटक लिहिले असून ते प्रभावी आहे. कालीचरण पटनाइक (१८९८ — ), कार्तिककुमार घोष (१९०३ — ), गोपाळ छोटराय (१९१८ — ), भंजकिशोर पटनाइक (१९२२ — ), मनोरंजन दास (१९२३ — ), कमललोचन महांती, कीर्तिकुमार घोष, हिमांशुभूषण साबत हे नाटककार व एकांकिकालेखक उल्लेखनीय आहेत. कालीचरणांची रक्तमाती(१९४८), फटाभूइन (१९४९) व रक्तमंदार (१९५२) गोपाळ छोटराय यांची भरसाओपरकलम (१९५४), नस्तउर्बसीओपथिक (१९५५) व पथिकबंधु (१९५६) भंजकिशोरांची जहर (१९४७), तोफान (१९५०),माणिकजोदी (१९५१), पहिलीरज (१९५३), गरीब (१९५३), साध्बी (१९५३), देवी (१९६१), अशोकस्तंभ (१९६२) व आकाशजेउंठिमाटिछाँए (१९७०) आणि मनोरंजनांची आगामी (१९५०), अबरोध (१९५१), रचना (१९५५), सागरमंथन (१९६४) व बनहंसी (१९६९) ही नाटके विशेष उल्लेखनीय होत.
ह्या काळातील समीक्षापर व वैचारिक गद्यलेखनाचा दर्जा चांगला असून अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. ओरिया साहित्यर इतिहास ह्या पंडित सूर्यनारायण दास यांच्या ओडिया साहित्येतिहास ग्रंथाचे १९६७ पर्यंत तीन खंड प्रसिद्ध झाले आहेत. बैष्णवचरण बल यांचा आधुनिक ओरिया साहित्य (१९६५) आणि सुबोधकुमार चतर्जी यांचा ओरिया साहित्यसमीक्षा (१९६५) हे दोन समीक्षाग्रंथ महत्त्वाचे होत. पं. बिनायक मिश्र यांचा ओरिया भासार पुरातत्त्व (१९६५ ) हा ओडिया भाषेच्या उद्गम -विकासाबाबतचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. चिंतामणी दास यांचा भक्त कवि-जीवन समीक्षा (१९६५) हा मधुसूदन राव यांच्या जीवनावरील व साहित्यावरील महत्त्वपूर्ण अभ्यासग्रंथ होय. यांशिवाय के. सी. पाणिग्राही यांचा साहित्य विचार, गंगाधर बल यांचा साहित्य आलोचना, डी.पी. पटनाइक यांचा साहित्य- बीक्षा हे समीक्षापर लेखांचे संग्रह उल्लेखनीय होत. ओरिया साहित्यर आधुनिक युग (१९६७) हा ब्रिजमोहन महांती यांचा संशोधनपर ग्रंथ असून, त्यातील कादंबरीचे विवेचन चांगले आहे. सूर्यनारायण दास यांच्या जगन्नाथ मंदिर ओ जगन्नाथ तत्त्व (१९६७) ह्या ग्रंथात पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा इतिहास व जगन्नाथाच्या उपासनेबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधनपर विवेचन आहे. पंचसखा ओ ओरिया साहित्य (१९६५) हा देबेंद्रनाथ महांती यांचा ग्रंथ असून त्यात प्राचीन वैष्णव संतकवींसंबंधी चांगली माहिती आहे. आधुनिक ओरिया साहित्य संदर्शन (१९६५) ह्या त्यांच्या ग्रंथात आधुनिक ओडिया साहित्याचा आढावा आहे . खगेश्वर महापात्र यांच्या चर्यागीतिका (१९६५) ह्या ग्रंथात चर्यागीतांची ओडिया भाषा-साहित्याच्या विकासास जी महत्त्वपूर्ण मदत झाली, त्याचे विवेचन आहे . यांशिवाय पीतांबर स्वैन, सुवर्णरेखा भंज, जेन, गोपालचंद्र मिश्र ह्यांच्या समीक्षापर लेखांचाही अवश्य उल्लेख करावा लागेल. बीरकिशोर दास यांनी जुगे युगे नाट्य साहित्य (१९६५) ह्या ग्रंथात ओडिया नाट्यलेखनाचा उदूगम व विकास यांचे चांगले विश्लेषण केले आहे, तर नारयण सतपथ यांनी ओरिया नाटक, नाटककार (१९६५) यात निवडक आधुनिक नाटकांचे विश्लेषण-विवेचन केले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील ओडिया साहित्यात एक नवीन जाणीव निर्माण झालेली दिसून येते. नवनवीन प्रकाशनसंस्था उदयास आल्या आहेत आणि विपुल प्रमाणावर ग्रंथनिर्मिती होत आहे. अनेक जगप्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथांची ओडियात भाषांतरे होत आहेत. ओडिया भाषेतील ग्रंथांचीही हळूहळू अन्य भारतीय व अभारतीय भाषांत भाषांतरे होऊ लागली आहेत. ही देवाणघेवाणप्रक्रिया व्यापक प्रमाणावर व्हावी, अशी भावनाही लोकांत निर्माण झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्याचा दुसरा एक विशेष म्हणजे, आजचा वाचकवर्ग हा सर्व थरांतील आहे हा होय. त्यांतील सर्वच सुसंस्कृत असतील अशी अपेक्षा अर्थातच नही. हल्ली वेगवेगळ्या वाचकवर्गांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यही निर्माण होऊ लागले आहे. आज ओडिया साहित्याच्या विकासास चांगला वाव आहे. आपल्या ओडिया भाषिक लोकांच्या भावभावना समजून घेण्याची आजच्या ललित लेखकांची धडपड आहे. एकाच देशात राहणारा, एकच भाषा बोलणारा, एकच सांस्कृतिक वारसा असलेला हा समाज ह्या एकात्मतेसोबतच एवढे भिन्न भिन्न प्रकारचे जीवन कसे जगतो, हेही जाणण्याची जिज्ञासा लेखकांत प्रकर्षाने दिसते.
मिश्र, नरेंद्र(इं.) सुवें, भा. ग. (भ.)
संदर्भ : 1. Das, Chittaranjan, Studies in the Mediaeval Religion and Literature of Orissa, Santiniketan, 1951.
2. Mansinha, Mayadhar, History of Oriya Literature, Delhi, 1962.
3. Sen, Priyaranjan, Modern Oriya Literature, Calcutta, 1947.
4. पाठक, अनसूया प्रसाद, उत्कल साहित्य का इतिहास, कटक.
“