ओट : (हिं. जवी लॅ. ॲव्हेना सटायव्हा कुल-ग्रॅमिनी). वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधीपासून [→ ओषधि] मिळणारे एक तृणधान्य. हे पहिल्याने ग्रीसमध्ये माहीत होते. उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळते. हल्ली रशियात व अमेरिकेत सर्वांत जास्त लागवड करतात. भारतातही (उत्तरेस १,७०० मी. उंचीपर्यंत हिमालय), बंगालपासून सिंधूपर्यंत, महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे आणि गुजरातेत अहमदाबाद जिल्ह्यात रब्बी पीक म्हणून पिकविले जाते. पाने लांब, सपाट व अरुंद खोड पोकळ व ०·६ — १·५ मी. उंच पुष्पबंध-परिमंजरी कणिशकात (कणसात) दोन द्विलिंगी फुले प्रत्येक फुलात केसरदले तीन, लघुतुषे दोन, किंजले दोन, किंजल्क केसाळ [→ फूल] बीजक (बिजाची पूर्वावस्था) एक सस्यफलावर [→ फळ] अंतस्तुषांचे (आतील तुसांचे) वेष्टन असते तुषावरचे प्रशूक (कुसळ) सरळ व नाजूक असते.

हे पाश्चात्त्य देशांतून भारतात आणले गेलेले पीक असून ते मुख्यत्वेकरून ओल्या चाऱ्यासाठी आणि काही प्रमाणात धान्यासाठी लावतात. याची हिरवी वैरण घोडे व दुभती जनावरे यांच्यासाठी फारच उपयुक्त असते. वैरण चविष्ट आणि पौष्टिक असते. ती इतर वैरणीबरोबर मिसळून दिल्यास सर्व वैरण जनावरे आवडीने काहीही वाया न घालविता खातात. दाणेही भरडा करून जनावरांना खाऊ घालतात. त्याचा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व इतर जनावरे यांच्या मांसोत्पादनावर आणि मांसाच्या प्रतीवर फार चांगला परिणाम घडतो. दाण्यांत तंतुमय भाग जास्त असल्याने त्यांचा भरडा डुकरांच्या पिलांना मानवत नाही. पण दाणे बारीक दळून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत खुराकात मिसळून दिल्यास ते मानवते. परंतु हे पीठ नुकत्याच मळणी केलेल्या दाण्यांचे नसावे. याच्या पिठाच्या भाकरी माणसे खातात. दाण्यांची दुधातील खीर पौष्टिक असते. तुषांपासून रेझीन, रासायनिक द्रव्ये व जंतुनाशक द्रव्ये बनवितात. बी रेचक, उत्तेजक व मज्‍जातंतूस पोषक असते.

हवामान : हे पीक मूळचे थंड प्रदेशातील असल्यामुळे भारतात त्याची लागवड थंड हवामानाच्या हंगामात करतात.

जमीन : याला अनेक प्रकारची जमीन चालते. तथापि चांगला निचरा होणाऱ्या गाळाच्या मोकळ्या कसदार जमिनीत पीक चांगले येते ते बहुतेक बागायती पीक म्हणूनच लावतात.

मशागत : खरीप हंगामातील पाऊस संपला म्हणजे सप्‍टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जमीन नांगरून तिला तीन-चार कुळवाच्या पाळ्या घालतात. खोल मुळांच्या पिकानंतर ओट अशी या पिकाच्या फेरपालटीमध्ये योजना करतात. खोल मुळांचे आधीचे पीक काढून घेतल्यानंतर जमिनीची योग्यप्रकारे मशागत करून बी पेरतात. मशागत करताना आधीच्या पिकाची धसे वेचून काढून घेणे फार आवश्यक असते. धसे वेचून न काढल्यास उगवण बिघडते आणि पीक विरळ होऊन उत्पन्न कमी येते. सामान्यतः याचे स्वतंत्र पीक घेतात. वैरणीच्या पिकात वाटाण्याचे बी मिसळून पेरतात. उत्तर गुजरात भागात याच्याबरोबर राई दुय्यम पीक म्हणून पेरतात.

खत : धान्यासाठी लावावयाच्या पिकाला प्रत्यक्ष खत न घालता त्या जमिनीत ओटाच्या आधी ध्यावयाच्या पिकाला भरखत घालतात. त्या बेवडावर ओट घेतात. त्यामुळे पीक जमिनीवर लोळत नाही. वैरणीसाठी लावावयाच्या पिकाला हेक्टरी ४० — ४५ किग्रॅ. नायट्रोजन मिळेल या प्रमाणात सल्फेट ऑफ अमोनियाच्या अगर पेंडीच्या रूपात दोन हप्त्यांनी वरखत देतात.

पेरणी : बी मुठीने फोकून अगर औताद्वारा पेरतात. पेरणीचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असतो. बी ओळींत २५ — ३० सेंमी. अंतर ठेवून पेरतात. वैरणीचे पीक बहुतेक बी मुठीने फोकूनच पेरतात. दर हेक्टरी ६५ ते ८५ किग्रॅ. बी पेरतात. हलक्या जमिनीत बी नेहमी जरा जास्त प्रमाणात सोडतात. ओटाचे पीक सामान्यपणे पाण्याखाली लावले जाते आणि त्याला पीक काढून घेतले जाईपर्यंतच्या मुदतीत तीन-चार पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. या पिकात सहसा आंतर मशागत करीत नाहीत.

वैरणीसाठी केलेले पीक पेरणीपासून दोन महिन्यांनी दाणे चिकावर असताना कापतात. धान्यासाठी केलेले पीक पेरणीपासून साडेतीन ते चार महिन्यांत तयार होते. ते पूर्णपणे पक्व होईतोवर शेतात उभे राहू देत नाहीत. थोडे आधीच पिकाची ताटे थोडी हिरवी असतानाच कापून घेतात कारण शेतात पूर्णपणे पक्व होऊ दिल्यास विळ्याने कापणी करताना दाण्यांची गळ होऊन नुकसान होते. कापलेले पीक खळ्यावर नेऊन चांगले वाळू देतात. पूर्णपणे वाळल्यावर गहू किंवा सातूच्या मळणीप्रमाणे त्याची मळणी करतात. दाणे साफ करून सुरक्षित जागी साठवून ठेवतात. वैरणीच्या पिकाची ओल्या वैरणीसाठी जानेवारी ते मार्च या मुदतीत तीन वेळा कापणी करून पुढे ते पीक बियांसाठी तसेच वाढू देतात. ते पुढे एप्रिल महिन्यात कापणीसाठी तयार होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याची कापणी करून मळणी करतात.

  

उत्पन्न : सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रातून ४५,००० ते ५०,००० किग्रॅ. ओली वैरण आणि २०० — ३०० किग्रॅ. दाणे मिळतात. धान्यासाठीच खास लावलेल्या पिकापासून दर हेक्टर क्षेत्रातून ३,५०० ते ४,००० किग्रॅ. धान्य आणि २,५०० — ३,००० किग्रॅ. वाळलेली वैरण मिळते. ओटाच्या दाण्यावर आवरण असते ते काढून टाकून दाणे मोकळे करावे लागतात. या फोलपटाचे दाण्याबरोबर प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंत असते.

सुधारलेली वाणे : या परदेशी पिकाच्या भारतात लावल्या जाणाऱ्या प्रकारांमध्ये उत्तरेकडील सपाट आणि टेकड्यांच्या प्रदेशांत ‘केंट’ प्रकार उत्कृष्ट समजतात. अलीकडेच त्याचे बी ऑस्ट्रेलियामधून आणवून त्याच्या लागवडीचे प्रयोग करून पाहण्यात आलेले असून. त्यावरून तो प्रकार वरील प्रदेशाकरिता उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. त्याची ताटे जरा टणक असतात आणि बी ठोकळ असते. या प्रकारामध्ये ११२ दिवसांत फुलोरा येतो. हेक्टरमधून टरफलासह ओटचे ४५० क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. वैरणीसाठीच लावलेल्या पिकाचे हेक्टरमधील उत्पन्न ३,७०० क्विंटल ओली वैरण असते.

एन. पी. हायब्रीड एक्स-२७ हा दुसरा जास्त धान्य देणारा प्रकार. केंटखेरीज जास्त चारा देणारे एन. पी. हा. ३, वेस्टर्न सेकंड, ब्रुंकर १०, फ्लेमिंग गोल्ड, ओव्हरलँड आणि ग्रीन मौंटन हे प्रकार आहेत. या हिरव्या चाऱ्याचा पुरवठा अखंड चालू ठेवणयासाठी अगाप, जरा उशिरा तयार होणारे आणि जास्त उशिरा तयार होणारे प्रकार यांची पृथकपणे ठराविक क्षेत्रात एकाच वेळी लागवड करतात. म्हणजे एका प्रकारचे पीक संपण्याच्या वेळी दुसऱ्या प्रकारचे पीक कापणीला आलेले असते आणि त्यामुळे ओल्या वैरणीच्या पुरवठ्यात खंड पडत नाही.

चौगले, द. सी. पाटील, ह. चिं.

कीड : ओटवर किडींचा फारसा उपद्रव आढळून येत नाही.

रोग : (१) गुप्त काणी : उस्टिलागो कोलेरी या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) हा रोग होतो. लक्षणे, प्रसार व उपाय सातूच्या गुप्त काणीप्रमाणे.

(२) काजळी : मळणीच्या वेळी उस्टिलागो ॲव्हेनी कवकाचे बीजाणू बियांस चिकटतात ल त्यांच्याद्वारा रोग उद्‍भवतो. त्यावर उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियांना एक टक्का पारायुक्त कवकनाशक चोळतात.

(३) खोडाचा तांबेरा : हा रोग पक्सीनिया कॅमिनीस ॲव्हेनी या कवकामुळे होतो. रोगाची लक्षणे, प्रसार व उपाय गव्हावरील खोडाच्या तांबेऱ्याप्रमाणे असतात.

(४) टिक्का : हा रोग हेल्‌मिथोस्पोरिअम ॲव्हेनी या कवकामुळे होतो. गव्हाच्या टिक्का रोगासारखीच लक्षणे, प्रसार व उपाय असतात.

कुलकर्णी, य. स.

पहा : गहू सातू.

संदर्भ : 1. Daji, J. A. Raghavan, D. Handbook of Agriculture, New Delhi, 1946.

    2. Hubbel, D. S. Tropical Agriculture, An Abridged Field Guide, Kansas City, 1965.

    3. Krishnan, T. S. Diseases of Milleis, New Delhi, 1965.