ओचोआ, सेव्हेरो : (२४ सप्‍टेंबर १९०५ — ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व १९५९ च्या वैद्यक व शरीरक्रियाविज्ञान विषयांतील नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. स्पेनमधील लुआर्का येथे त्यांचा जन्म झाला. १९२१ मध्ये मालागा महाविद्यालयातून बी.ए. व १९२९ मध्ये माद्रिद विद्यापीठाची एम्.डी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यानंतर बर्लिन येथील कैसर विल्हेल्म संस्थेमध्ये व पुढे हायड्लबर्ग विद्यापीठात त्यांनी संशोधन कार्य केले. १९३१ मध्ये त्यांची माद्रिद विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९३२ – ३४ या काळात त्यांनी लंडन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत काम केले. १९३५ साली माद्रिद येथील इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेच्या शरीरक्रियाविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुन्हा जर्मनी व इंग्‍लंडमध्ये प्लायमथ व ऑक्सफर्ड येथे संशोधनकार्य करून ते १९४१ मध्ये अमेरिकेत गेले व सेंट लुई येथील वॉशिंग्टन विद्यापीठात संशोधनसाहाय्यक म्हणून काम केले. १९४२ पासून न्यूयॉर्क येथील वैद्यक विद्यालयातील वैद्यक विभागात अनेक जागांवर काम केल्यानंतर १९४६ मध्ये त्यांची औषधिविज्ञान शाखेचे (औषधांचे गुणधर्म, वैशिष्ट्ये व त्यांचे शरीरावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करणार्‍या वैद्यकाच्या शाखेचे) प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९५६ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

न्यूक्लिओसाइड डायफॉस्फेटापासून रिबोन्यूक्लिइक [→ न्यूक्लिइक अम्‍ले] अम्‍ल तयार करणारे एक प्रवर्तक (हॉर्मोन) ओचोआ यांनी शोधून काढले. हे प्रवर्तक त्यांनी एका विशिष्ट जंतूमधून काढले व त्याच्या न्यूक्लिओसाइड डायफॉस्फेटावरील विक्रियेचा अभ्यास करून असे सिद्ध केले की, या प्रवर्तकामुळे मॅग्‍नेशियम आयनांच्या (विद्युत् भारित अणूंच्या) सान्निध्यात रिबोन्यूक्लिइक अम्‍ल तयार होऊ शकते. म्हणून या प्रवर्तकाला त्यांनी पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरिलेज असे नाव दिले. या त्यांच्या शोधामुळे कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) प्रथिन पदार्थ कसे तयार होतात यावर नवीनच प्रकाश पडला. पुढे या प्रवर्तकाच्या मदतीने त्यांनी ॲमिनो अम्‍लांपासून अनेक प्रथिने कृत्रिम पद्धतीने तयार केली.

शरीरातील कोशिकांच्या वृद्धीसाठी अत्यंत जरूर असलेले रिबोन्यूक्लिइक अम्‍ल प्रथम संश्लेषित करण्याबद्दल (घटक पदार्थापासून कृत्रिमरीत्या बनविण्याबद्दल) त्यांना १९५९ चे वैद्यक व शरीरक्रियाविज्ञान विषयांतील नोबेल पारितोषिक कोर्नबर्ग यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर १९५७ मध्ये त्यांची निवड झाली.

कानिटकर, बा. मो.