एरेनबुर्क, इल्या गिऱ्यागॉऱ्येव्ह्यिच : (२७ जानेवारी १८९१ — १ सप्टेंबर १९६७). रशियन कादंबरीकार व पत्रकार. कीएव्ह (युक्रेन) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. शिक्षण मॉस्को येथे. वयाच्या अठराव्या वर्षी पॅरिसला आला आणि रशियन क्रांतीच्या वेळी रशियात परतला. प्रतिक्रांतिवादी म्हणून १९२१ मध्ये त्यास अटक झाली. तथापि आपण क्रांतीचे पुरस्कर्ते आहोत, असे त्याने मान्य केल्यानंतर त्याची सुटका झाली. त्यानंतर तो पुन्हा पॅरिसला गेला. १९४१ पर्यंतचा त्याचा बराचसा काळ पश्चिम यूरोपातच गेला. दुसरे महायुद्ध सुरू होताच तो रशियात आला.
Neobychnye pokhozhdeniya Julio Jurenito… (१९२१, इं. भा. द एक्स्ट्राऑर्डिनरी ॲड्व्हेंचर्स ऑफ ज्यूलिओज्यूरेनिटो…, १९३०) ह्या त्याच्या पहिल्या कादंबरीत विविध राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे उपरोधगर्भ चित्रण आहे. त्यानंतरच्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांपैकी Padenie Parizha मध्ये (१९४१, इं. भा. द फॉल ऑफ पॅरिस, १९४५) १९३५–४० या कालखंडातील फ्रेंच समाजाच्या दु:स्थितीचे चित्रण आढळते. ह्या कादंबरीस स्टालिन पारितोषिक मिळाले. Burya (१९४८, इं. भा. द स्टॉर्मं, १९४९) ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावर आधारलेली आहे. ह्या कादंबरीसही स्टालिन पारितोषिक मिळाले. द थॉ (१९५४) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या कादंबरीमुळे बरीच खळबळ माजली. स्टालिनच्या मृत्यूनंतर रशियातील अनेक ताण कसे सैल होत गेले, ह्याचे चित्रण तीत आहे. स्टालिनच्या काळातील शुद्धीकरणासारख्या अनेक धोरणांवर ह्या कादंबरीत टीका आहे.
ह्याखेरीज पत्रकार म्हणून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांचे त्याने लिहिलेले वेधक वृत्तांत उल्लेखनीय आहेत. त्यांतील काही भागांचे भाषांतर द टेंपरिंग ऑफ रशिया (१९४४) ह्या नावाने झाले आहे. पीपल अँड लाइफ : १८९१—१९२१ (१९६२), मेम्वार्स : १९२१—१९४१ (१९६४) आणि मेन, यिअर्स, लाइफ (१९६५) हे त्याचे इतर लेखन. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.
मेहता, कुमुद