एली द बोमाँत, लिआँस : (२५ सप्‍टेंबर १७९८ ­­­— २१ सप्‍टेंबर १८७४). फ्रेंच भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कॅनन (काल्वादॉस) येथे झाला. इकोल द माइन्स (पॅरिस) येथे १८३५ साली त्यांची भूविज्ञानाच्या प्राध्यापकपदी व १८४७ साली खाणींचे महानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १८६१ साली ते कौन्सिल जनरल द माइन्सचे उपाध्यक्ष व लीजन ऑफ ऑनरचे उच्च अधिकारी झाले.

त्यांनी १८२९ साली पर्वतरांगांच्या उत्पत्तीसंबंधीचा आपला सिद्धांत ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस पुढे मांडून त्या विषयाचा पाया घातला. त्यांनी द्यूफ्रेन्वा यांच्या साहाय्याने फ्रान्सचा मोठ्या प्रमाणाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार केला. सेवानिवृत्तीनंतरही शेवटपर्यंत त्यांनी नकाशे काढण्याच्या कामावर देखरेख केली.

ते ॲकॅडेमी ऑफ बर्लिन, ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (फ्रान्स) व रॉयल सोसायटी (लंडन) यांचे सभासद, १८५२ पासून फ्रान्सचे सिनेटर व १८५३ पासून ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कायमचे सचिव होते. ते कॅनन येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.