एरॉस : एक लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या दरम्यान कक्षा असलेल्या अनेक लहान ग्रहांपैकी एक). हा लघुग्रह काही वेळा पृथ्वीच्या अतिशय जवळ येत असल्यामुळे व त्यावरून सौर पराशय (निरीक्षकाची स्थिती बदलल्याने खगोलाच्या पार्श्वभूमीवर खस्थ पदार्थ सरकल्याचा आभास) काढण्यासाठी मदत होत असल्यामुळे त्याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. १३ ऑगस्ट १८९८ रोजी बर्लिन येथील जी. विट यांनी तो शोधून काढला. पूर्वी त्याला १८९८ डीक्यू म्हणत, नंतर त्याला ४३३ क्रमांक व एरॉस हे नाव देण्यात आले. त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ६४३·२ दिवस व स्वत: भोवती फिरण्यास ५ तास १६ मिनटे लागतात. त्याच्या गतीवर पृथ्वी व मंगळ यांच्या आकर्षणाचे परिणाम होतात. त्याची कक्षा व क्रांतिवृत्त ( सूर्याच्या भासमान वार्षिक गतीचा मार्ग ) यांच्यात १०·८ अंशांचा कोन आहे. तो अनियमित व ओबडधोबड आकाराचा असून ३२ किमी. लांब व १६ ते २४ किमी. रूंद असा लांबट पदार्थ असावा. त्याच्या तेजस्वीपणात (प्रत ११) बदल होत असतात व ते बहुधा त्याच्या आकारामुळे व अक्षीय गतीमुळे होत असावेत. त्याचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर १·४५८ ज्योतिषशास्त्रीय एकक आहे (पृथ्वी व सूर्य यांतील सरासरी अंतर = ज्योतिष शास्त्रीय एकक). परंतु त्याची विर्केद्रता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन दर्शविणारे गुणोत्तर) फार (०·२२३) असल्याने दर ४४ वर्षानी तो पृथ्वीपासून सु. २·२४ कोटी किमी. अंतरापर्यंत जवळ येतो. १८९४ साली म्हणजे त्याच्या शोधापूर्वी तो पृथ्वीजवळ आला असता नकळत त्याचीही छायाचित्रे निघाली व पुढे त्यांचाही उपयोग झाला. १९०० व १९३८ साली त्याचे थोडे वेध घेण्यात आले. परंतु १९३१ साली तो २·५९२ कोटी किमी. अंतरावर आला असता चौदा देशांतील चोवीस वेधशाळांमधून त्याची २,८४७ छायाचित्रे घेण्यात आली. त्यांचा अभ्यास करून हॅरल्ड स्पेन्सर जोन्स यांनी १९४१ साली सौर पराशयाचे मूल्य ८·७९० मिनिटे इतके व त्याच्यावरून पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतर (म्हणजे ज्योतिषशास्त्रीय एकक) १,४८,८०,४८० किमी. इतके काढले. पुन्हा तो १९७५ साली पृथ्वीच्या जवळ येणार आहे. तथापि आता सूर्याचे अंतर मोजण्यासाठी रडार तंत्रावर आधारलेल्या अधिक चांगल्या पद्धती उपलब्ध झालेल्या असल्यामुळे या घटनेला फारसे महत्त्व उरणार नाही.
ठाकूर, अ. ना.