एमडेन : पश्चिम जर्मनी देशाच्या लोअर सॅक्सनी प्रांतातील बंदर. लोकसंख्या सु. ४८,०९८ (१९६९). हे ब्रेमेनच्या वायव्येस ११२ किमी., एम्स नदीमुखावर वसले आहे. डॉर्टमुंड-एम्स व एम्स-यादे बे कालव्यांचा शेवट एमडेनलाच होतो. बाराव्या शतकापासून एमडेन व्यापारकेंद्र म्हणून ख्यात आहे. १५६३ मध्ये इंग्लिश व्यापाऱ्यांनी त्यास आपले मुख्य यूरोपीय विक्रयालय केले. त्याच शतकात एमडेनचे व्यापारी-आरमार यूरोपात सर्वांत मोठे होते. १९०० साली डॉर्टमुंड-एम्स कालव्यामुळे रूरमधील व्यापाराचे सागरीबंदर म्हणून याची भरभराट झाली. दुसऱ्या महायुद्धात यावर अनेक विमानहल्ले झाले परंतु बंदरास फारसा धक्का पोहोचला नाही व आजही ते खोल सागरी मच्छीमारीचे केंद्र आहे. शिवाय जहाजे, शेतीची अवजारे इत्यादींचे कारखाने येथे आहेत.
शहाणे, मो. ज्ञा.