एबिंगहाऊस, हेरमान : (२४ जानेवारी १८५०—२६ फेब्रुवारी १९०९). जर्मन मानसशास्त्रज्ञ. जन्म बॉनजवळील बार्मेन येथे. त्याचे शिक्षण बॉन, हाल आणि बर्लिन येथे झाले. बर्लिन विद्यापीठात त्याने तत्त्वज्ञान विषयात पीएच्. डी. घेतली (१८७३). काही काळ त्याने लष्करातही नोकरी केली. काही वर्षे त्याने फ्रान्स, इंग्‍लंड आदी देशांत पर्यटन करण्यात व अभ्यासात घालविली.

जी. टी. फेक्‍नर (१८०१—१८८७) याचा Elemente der Psychophysik (१८६०) हा ग्रंथ वाचून एबिंगहाऊसला मानसशास्त्रीय संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. त्या काळी फेक्‍नर, हेल्महोल्ट्स (१८२१—१८९४) व व्हुंट (१८३२—१९२०) यांच्या नेतृत्त्वाखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा नुकताच उदय झालेला होता. परंतु या मानसशास्त्रज्ञांचे प्रायोगिक संशोधन मुख्यत्वेकरून इंद्रिय-वेदनांपुरते मर्यादित होते. विचार, स्मृती, शिक्षण, कल्पनाविलास आदी उच्चतर मानसिक प्रक्रियांचा प्रायोगिक पद्धतीने अभ्यास करता येणे शक्य नाही, अशी त्यांची समजूत होती. परंतु त्यांपैकी स्मृती अथवा स्मरणप्रक्रियेचे प्रायोगिक संशोधन करण्याचा एबिंगहाऊसने निर्धार केला. त्याने स्मरणशक्तीसंबंधी अभिनव प्रयोग आयोजिले. त्यासाठी आपल्या जर्मन भाषेमध्ये gid, var यांसारखे २,३०० छोटे पण अर्थहीन अक्षरसमूह तयार केले. सर्व प्रकारची वैज्ञानिक दक्षता घेऊन, सतत दोन वर्षे त्याने हे प्रयोग स्वत:वरच केले आणि आपल्या प्रयोगांचे तपशील व निष्कर्ष Ueber das Gedachtnis (१८८५, इं. शी. ऑन मेमरी) या महत्त्वपूर्ण ग्रंथात प्रसिद्ध केले [→स्मृति व विस्मृति ].

या ग्रंथात त्याने स्मृतिप्रक्रियेसंबंधाने जे मानसशास्त्रीय नियम प्रतिपादन केले, ते आजतागायत अबाधित राहिले आहेत. तांत्रिक कौशल्य आणि संशोधनयोग्य चिकाटी यांमुळे यशस्वी ठरलेल्या त्याच्या प्रयोगांनी ⇨ प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये संशोधनाचे एक नवे दालन उघडले. रंगदृष्टीबाबतही त्याने संशोधन केले. मानसशास्त्रातील त्याच्या कामगिरीबद्दल त्याला प्रथम बर्लिन विद्यापीठात (१८८६) आणि नंतर ब्रेस्लौ विद्यापीठात (१८९४) प्राध्यापकपद बहाल करण्यात आले.

ब्रेस्लौ येथील नगरपालिका-अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून त्याने विद्यार्थ्यांच्या उच्चकक्षीय मानसिक शक्तींची चाचणी घेण्याच्या कामी उपयुक्त ठरतील अशा बुद्धिमत्तेबाबतच्या ‘परिपूरण कसोट्या’ तयार केल्या (१८९७). त्या आजही बुद्धिमापनादीसाठी वापरल्या जातात [→मानसिक कसोट्या]. एबिंगहाऊसचे मानसशास्त्रावरील Grundzuge der Psychologie (१९०५) हे पाठ्यपुस्तक वैज्ञानिक काटेकोरपणा व मनोरंजक शैली यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने मानसशास्त्रीय संशोधनास वाहिलेले एक नवे नियतकालिकही सुरू केले. तो हाल येथे न्यूमोनियाने अचानक कालवश झाला.

सुर्वे, भा. ग.