गर्भावधी : गर्भधारणा झाल्यापासून गर्भ गर्भाशयात वाढत असतो. त्याची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो गर्भाशयातून बाहेर पडतो म्हणजे त्याचा जन्म होतो. गर्भधारणा झाल्यापासून प्राण्याचा जन्म होण्याच्या वेळेपर्यंतच्या काळाला गर्भावधी असे म्हणतात. हा गर्भावधी निरनिराळ्या प्राण्यांमध्ये निरनिराळा असतो. निरनिराळ्या प्राण्यांचे सरासरी गर्भावधी पुढील कोष्टकात दिलेले आहेत.
प्रत्येक प्राण्यामध्ये हा गर्भावधी वेगळा का असावा याचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना मिळाले नाही. सर्वांत जास्त गर्भावधी – २२ महिने- भारतीय हत्तीमध्ये असतो व सर्वांत कमी व्हर्जिनिया ऑपॉस्सममध्ये- १२ दिवसांचा- असतो.
निरनिराळ्या प्राण्यांचे सरासरी गर्भावधी |
|
प्राण्याचे नाव |
सरासरी गर्भावधी (दिवस) |
माणूस |
२८० |
ब्ल्यू व्हेल |
३०५ |
डॉल्फिन |
२७६ |
पॉरपॉईज |
१८३ |
गेंडा |
५४८ |
जिराफ |
४५० |
म्हैस |
३११ |
गाय |
२८२ |
हिप्पोपोटॅमस |
२४० |
बकरी |
१४४-१५० |
डुक्कर |
११२-११५ |
सिंह |
११० |
वाघ |
१०६ |
ससा |
३० |
कांगारू |
३८ |
उंदीर |
२१ |
हत्ती |
६२१ |
घोडा |
३३५ |
चिंपँझी |
२३६ |
गिनीपिग |
६८ |
कुत्रा |
६३ |
मांजर |
६० |
व्हर्जिनिया ऑपॉस्सम |
१२ |
जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने पाहिले असता प्रत्येक प्राण्याच्या जरूरीप्रमाणे गर्भावधीत बदल होतो. प्राण्यांच्या आकारमानाप्रमाणे त्यांचा गर्भावधी कमी जास्त होतो. लहान सस्तन प्राण्यांत तो कमी असतो व मोठ्या सस्तन प्राण्यांत तो जास्त असतो. परंतु गिनीपिग या नियमास अपवाद आहे. गिनीपिगमध्ये गर्भावधी ६८ दिवसांचा आढळून येतो. सामान्यत: कृंतक (उंदीर, घूस यांसारख्या कुरतडणार्या) प्राण्यांत गर्भावधी २० ते ३० दिवसांचा असतो. काही प्राण्यांचा जनन –ऋतू नैसर्गिक रीत्या अशा वेळेला असतो की, ज्यावेळी वर्षातील इतर कोणत्याही ऋतूपेक्षा अन्नधान्य जास्त असते. गर्भावधीच्या अभ्यासाने असेही दिसून येते की, ज्या प्राण्यांना आपली पिल्ले सुरक्षित जागी ठेवता येतात, त्या प्राण्यांत गर्भावधी कमी असतो व पिल्ले अप्रौढ किंवा असाहाय्य अवस्थेत जन्माला येतात उदा., बीळ करून राहणारे काही कृंतक. कांगारूचे पिल्लू असाहाय्य व अप्रौढ अवस्थेत जन्माला येते जन्मानंतर लगेच ते शिशुधानीत (उदरावरील पिशवीत) ठेवले जाते व त्याची उरलेले वाढ तेथेच होते. याउलट जे प्राणी खुल्या मैदानात, जंगलात किंवा कुरणात राहतात त्यांच्यामध्ये गर्भावधी जास्त असतो व पिल्ले असाहाय्य किंवा अप्रौढ नसतात.
एकाच प्राण्याच्या निरनिराळ्या वेगळ्या गर्भावधीत फरक पडतो. माणसांमध्ये मुलगा जन्माला येणार असेल, तर गर्भावधी मुलीच्या गर्भावधीपेक्षा चार पाच दिवसांनी जास्त असतो. जुळ्या मुलांचा गर्भावधी एका मुलाच्या गर्भावधीहून चारपाच दिवसांनी कमी असतो. आनुवंशिकतेचाही गर्भावधीवर परिणाम होतो. मातापित्यांच्या वयाचा गर्भावधीवर परिणाम होत नाही. संकरांच्या बाबतीत गर्भावधी मातापित्यांच्या दरम्यान असतो. सामान्यत: संकरांचा गर्भावधी मातेच्या गर्भावधीकडे झुकणारा असतो.
गर्भधारणेनंतर ब्लास्ट्रला (पेशींच्या एकाच स्तराची भित्ती असलेली पाण्याने भरलेली पोकळी ) तयार होतो. हा ब्लास्ट्रला अनेक दिवस सुप्तावस्थेत राहतो व नंतर काही दिवसांनी परत त्याची वाढ होते. त्यामुळे गर्भाची खरी वाढ जितके दिवस होते त्यापेक्षा ती अधिक दिवस झाल्यासारखी वाटते, उदा., यूरोपियन बॅजर.
काही कृंतक प्राण्यांमध्ये काही वेळेला गर्भावधीत वाढ झाल्याचे आढळून येते. उंदरामध्ये गर्भावधी २१ दिवसांचा असतो. ज्यावेळी पिल्ले मातेचे दूध पीत असतात त्यावेळी गर्भधारणा झाल्यास गर्भावधी तीसचाळीस दिवसांचा होतो.
अंडोत्सर्गानंतर (अंडाशयातून अंडे अथवा अंडी बाहेर पडल्यानंतर) पीतपिंड (अंड बाहेर पडलेले आहे अशा अंडपुटकापासून तयार होणारा पिवळा पुंज, कॉर्पस ल्युटियम) तयार होतो. पीतपिंडामधून प्रोजेस्टेरोन नावाचा अंत:स्राव (हॉर्मोन) स्रवत असतो. जोपर्यंत प्रोजेस्टेरोनाची निर्मिती होत असते तोपर्यंत गर्भ गर्भाशयात राहतो पण जेव्हा पीतपिंडाचा र्हास होतो व प्रोजेस्टेरोनाची निर्मिती थांबते त्यावेळी गर्भ गर्भाशयातून बाहेर येतो वा पिल्लू जन्माला येते. जोपर्यंत पीतपिंडामधून प्रोजेस्टेरोनाची निर्मिती होत असते तोपर्यंत गर्भावधी असतो. पीतपिंड हा गर्भावधी ठरविणारा एक घटक आहे. जर काही कारणामुळे त्याचा र्हास झाला व प्रोजेस्टेरोनाची निर्मिती थांबली, तरी प्रोजेस्टेरोनाची अंत:क्षेपणे (इंजेक्शने) देऊन गर्भावधी थोडे दिवस वाढविता येतो. आफ्रिकेतील एका जातीच्या वटवाघुळात गर्भावधीच्या सुरूवातीला पीरपिंडाचा र्हास होतो, तरीही पिल्लू जन्माला येत नाही आणि गर्भावधी चालू राहतो. पीरपिंडाचा जरी र्हास झाला, तरी त्याचे प्रोजेस्टेरोन स्रवणाचे काम एखादा भाग करीत असावा असे शास्रज्ञांचे मत आहे. गर्भावधीच्या सुरूवातीच्या काळात जर पीतपिंड काढून टाकला, तर त्याचा वेगवेगळ्या प्राण्यांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही प्राण्यांत गर्भावधी चालूच राहतो उदा., माणूस, माकड. काही प्राण्यांत गर्भपात होतो, उदा., उंदीर, बकरी, गाय, म्हैस.
जोशी, मीनाक्षी
“