केरूर, वासुदेवाचार्य: (१५ ऑक्टोबर १८६६–११ जानेवारी १९२१). प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार, नाटककार आणि सत्यनिष्ठ व स्वतंत्र बाण्याचे निर्भय पत्रकार. तत्कालीन कन्नड समाजात स्वत्वाची जाणीव निर्माण करून त्यात नवचैतन्य ओतणाऱ्या थोर व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. जन्म विजापूर जिल्ह्यातील तोळमक्की येथे. शिक्षणासाठी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश परंतु कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना उच्च शिक्षण मध्येच सोडून देऊन, एच्. पी. परीक्षा द्यावी लागली आणि वकिली व्यवसाय अंगीकारावा लागला.

प्रतिभा, पांडित्य आणि रसिकता यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांना ‘कन्नड साहित्याचे सर वॉल्टर स्कॉट’ म्हटले जाते. त्यांच्या लेखनात विचार, विनोद, वास्तवता व आदर्श यांचा मिलाफ झालेला आढळतो. जिवंत व्यक्तिरेखा, अर्थपूर्ण संवाद आणि प्रासादिक कथनशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. नीळगतेगळू (१९२०), तोळेद मुत्तु (१९५२), बेळगिद दीपगळु (१९५२) हे कथासंग्रह यदुमहाराज (१९२०), भ्रातृघातकनाद औरंगजेब (१९४६), प्रेमविजय (१९५२) या ऐतिहासिक कादंबऱ्या वाल्मीकि विजय (१९४५) ही पौराणिक कादंबरी इंदिरे (१९०८) ही सामाजिक कादंबरी ही त्यांची उल्लेखनीय साहित्यनिर्मिती होय. तत्कालीन मराठी वाङ्मयाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला होता.

गोल्डस्मिथच्या शी स्टूप्स टू काँकरचे पतिवशीकर (१९२१) आणि शेक्सपिअरच्या अ मिडसमर नाइट्स ड्रीम मर्चंट ऑफ व्हेनिसची अनुक्रमे वसंतयामिनी चमत्कार (१९२७) व सुरतनगरद श्रेष्ठि (१९२९) ही कन्नडमध्ये अनुवादित केलेली त्यांची नाटके विशेष उल्लेखनीय होत.

वासुदेवाचार्य यांनी आपल्या धारदार शैलीने कन्नड वृत्तपत्रसृष्टी गाजविली. सचित्रभारत  मासिकात प्रमुख लेखक या नात्याने त्यांनी लेखन केले असून शुभोदय (स्था. १९१७) हे साप्ताहिक त्यांच्या संपादकत्वाखाली निघत होते.               

वर्टी, आनंद