केप कोस्ट : घानाच्या किनाऱ्यावरील बंदर. लोकसंख्या ७१,५९४ (१९७०). हे राजधानी ॲक्राच्या पश्चिमेस १५० किमी. असून, घानाच्या मध्य विभागाचे कारभार केंद्र आहे. येथून मुख्यतः कोको निर्यात होतो. तसेच परिसरात मासेमारी चांगली चालते. १६५२ मध्ये स्वीडिश लोकांना मिळालेल्या येथील भूमीवर त्यांनी किल्ला बांधला. तो पोर्तुगीज, डच यांच्याकडून अखेर १६६४ मध्ये ब्रिटिशांकडे आला. गोल्ड कोस्ट वसाहत येथे स्थापन झाल्यावर १८७७ पर्यंत केप कोस्ट तिचे मुख्य ठाणे होते. येथे अनेक ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे, आधुनिक रुग्णालये व माध्यमिक शाळा आहेत.  

कुमठेकर, ज. ब.