केटोनिएलीझ: मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्मरूप (अवशेषरूप) प्रकटबीज वनस्पतींचा एक गण [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग]. यांचा शोध सुप्रसिद्ध पुरावनस्पतिविज्ञ एच्. एच्. टॉमस यांनी लावला (१९२५). त्यांना हे जीवाश्म यॉर्कशरमधील केटन बेच्या मध्य जुरासिक (सु. १७ कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांत सापडले. यांची पाने (सजेनॉप्टेरीस ), लघुबीजुककोश (लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव धारण करणारा पिशवीसारखा भाग, केटोनँथस ) व बीजधारक अक्ष (केटोनिया ) यांचे जीवाश्म सुस्थितीत आढळतात. पाने संयुक्त, हस्ताकृती १·५–३ सेंमी. लांब असून सिराविन्यास (शिरांची मांडणी) जाळीदार होता लघुबीजुककोश एका प्रमुख अक्षावर दुय्यम शाखांपासून लोंबलेले असून त्यात सपक्ष परागकण होते. बीजधारक अवयवसुद्धा एका मुख्य अक्षावर असून ते या कोशाप्रमाणे व लहान बियांनी भरलेले होते. यांच्या तळाशी अक्षावर ओठासारखा फुगीर भाग होता तोच किंजल्क व संपूर्ण अवयव म्हणजे किंजदल[→फूल]. या वनस्पती त्या काळातील आवृतबीज (बंदिस्त बीज असलेल्या) वनस्पती असाव्या असा प्रथम समज झाला परागकणसुद्धा आवृतबीज वनस्पतींप्रमाणेच ओठासारख्या भागावर रुजले असावेत असा ग्रह झाला परंतु नंतरच्या संशोधनात परागकण किंजदलामध्ये सापडले व ते बीजकांमध्ये (बीजाच्या पूर्वावस्थेत) रुजले असल्याचे सिद्ध होऊन या वनस्पती आवृतबीज नसून प्रकटबीज आहेत असे सिद्ध झाले. केटोनिएलीझ व ⇨ बीजी नेचे (टेरिडोस्पर्मी) यांचे फार निकट संबंध आहेत. आवृतबीज वनस्पतींच्या किंजल्कांचा व किंजदलांचा उद्गम व विकास कसा असावा हे समजण्यास या गणाची माहिती उपयुक्त ठरते.
पहा: पुरावनस्पतिविज्ञान.
संदर्भ : Thomas, H. H. Philosophical Transactions of Royal Society, 213 B : 299- 363, London, 1925.
वऱ्हाडपांडे, द. गो.
“