केक अर्चिन: एकायनोडर्माटा संघातील एकायनॉयडिया वर्गाच्या क्लिपिॲस्ट्रॉयडिया गणातील हा प्राणी आहे. केक अर्चिनाचे समुद्री अर्चिनाशी बरेच साम्य आहे, पण काही बाबतींत त्यांच्यात फरक आहे. केक आर्चिन एखाद्या तबकडीसारखा चपटा असून त्याच्या शरीरावर बारीक कॅल्शियममय कंटक (बारीक काटे) असतात व गुदद्वार शीर्षस्थ क्षेत्राच्या (डोक्याकडील भागाच्या) बाहेर असून तबकडीच्या काठावर असते. यांशिवाय इतर काही क्षुल्लक फरकही आहेत. क्रमविकासात (उत्क्रांतीत) केक अर्चिनाची मूळ अरीय (त्रिज्यीय) सममिती गौण द्विपार्श्व सममितीने व्यापून टाकलेली असते [→ प्राणिसममिति] म्हणून यांच्या शरीराला अग्र व पश्च टोक आणि उजवी व डावी बाजू असते. या कारणाकरिताच याला नियमबाह्य अर्चिन म्हणतात. केक अर्चिनांच्या कित्येक जाती आहेत, पण उष्ण प्रदेशातील समुद्रात आढळणारा क्लिपिॲस्टर हे याचे एक चांगले उदाहरण आहे.
हे प्राणी समुद्राच्या उथळ पाण्यातील वाळूत सापडतात काही वाळूत अर्धवट पुरलेले तर काही वाळूवर असतात. बहुतेक जातींत शरीर अतिशय चपटे पण काहींत मध्यभागी बरेच फुगीर असते शरीराची रूपरेषा काहींत वर्तुळाकार, काहींत अंडाकार तर काहींत (क्लिपिॲस्टर) पंचकोनी असते अधर (खालच्या)
पृष्ठाच्या केंद्रस्थानी मुख असून गुदद्वार काठावर असते सर्व शरीरावर कवच असून ते एकमेकांना घट्ट जोडलेल्या कॅल्शियममय पट्टांचे (तकटांचे) बनलेले असते कवचाच्या आतील बाजूला वरच्या आणि खालच्या भित्तींना जोडणारे आणि देहगुहेतून (शरीराच्या पोकळीतून) गेलेले उभे कॅल्शियममय स्तंभ असतात हे मुख्यत: शरीराच्या परिघीय (घेराजवळच्या) भागात असतात. सगळ्या कवचावर अतिशय आखूड, सारख्या लांबीचे व मऊ कंटक असतात वरच्या पृष्ठावरील कंटक पक्ष्माभिकायुक्त (हालचालीसाठी उपयोगी पडणाऱ्या केसासारख्या वाढींनी युक्त) असल्यामुळे त्यांच्या हालचालींच्या योगाने अपमुख पृष्ठावरून (मुखपृष्ठाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या पृष्ठावरून) पाणी सारखे वाहत राहते. संदंशिका (चिमट्यासारख्या बारीक संरचना) आणि गोलेंद्रिये (लहान वाटोळी ज्ञानेंद्रिये) सामान्यत: असतात. मुद्गरिका (पक्ष्माभिकायुक्त सूक्ष्म कंटक) नसतात. अपमुख पृष्ठावरील चरणार-क्षेत्रे (ज्यांवर नालपाद म्हणजे नळीसारखे बारीक पाय असतात अशी अरीय क्षेत्रे) दलाभ (पाकळीसारखे) असतात. नालपादांमुळे या प्राण्यांचे चलन होते पण अपमुख पृष्ठावरील नालपाद चपटे झालेले असून त्यांचा श्वसनाकरिता उपयोग होतो. मुखाच्या आत ‘ॲरिस्टॉटलचा कंदील’(अन्न चावण्यासाठी असणारे उपकरण) असून समुद्री अर्चिनाच्या कंदिलापेक्षा त्याची रचना साधी असते. कंदिलाच्या वरच्या पृष्ठापासून आहारनाल (अन्नमार्ग) निघून गुदद्वाराने तो बाहेर उघडतो. वाळू व चिखल यांत मिसळलेले जैव (सेंद्रिय) पदार्थांचे कण आणि लहान जीव हे याचे भक्ष्य होय. ॲरिस्टॉटलच्या कंदिलातील पाच दात अन्नकण मिसळलेली वाळू किंवा चिखल मुखात लोटण्याचे कार्य करतात. जलवाहिका तंत्राचे (ज्या वाहिन्यांतून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे अभिसरण होते त्यांच्या बनलेल्या तंत्राचे) बरेच परिवर्तन झालेले असते.
लिंगे भिन्न असून अंडाशय व वृषण (पुं-जनन ग्रंथी) प्रत्येकी पाच असतात. अंडाशयापासून किंवा वृषणांपासून निघणाऱ्या वाहिन्या शीर्षस्थ जनन-पट्टांवर उघडतात.
जोशी, मीनाक्षी
“