केअर्न्झ: ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याच्या ईशान्येस वसलेले बंदर. लोकसंख्या ३१,२५० (१९७२). हे ब्रिस्बेनच्या वायव्येस रेल्वेने १,३७७ किमी. अंतरावर असून सडकांनी व हवाई मार्गांनी हे सर्व मोठ्या शहरास जोडलेले आहे. केअर्न्झची १८७६ मध्ये स्थापना झाली व १८८५ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. येथून साखर, लाकूड, प्लायवुड, मका, मांस, तंबाखू, सोने, तांबे, दुग्धपदार्थ व फळफळावळ ह्यांची निर्यात केली जाते. रासायनिक खते, पेट्रोलियम पदार्थ, यंत्रसामान वगैरेंची आयात होते. शहरात साखर, लोणी व डबाबंद मांसाचे कारखाने आणि रेल्वे कर्मशाळा आहेत. आकर्षक शहररचना, सौम्य हिवाळी हवा, पृष्ठप्रदेशाचे सृष्टिसौंदर्य, बॅरन नदीवरील धबधबे, सर्फचा खेळ व मासेमारी ह्यांमुळे दरवर्षी हजारो प्रवासी हिवाळ्यामध्ये या शहरास भेट देतात.

गद्रे, वि. रा.