कृष्णदास कविराज : (१५१७ – १६१४). प्रसिद्ध बंगाली पंडित, वैष्णव कवी व चैतन्य महाप्रभू ह्यांचा चरित्रकार. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील नैहाटी भागातील झामटपूर ह्या गावी, वैद्य जातीच्या एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो सहा वर्षांचा असताना त्याचे आई वडील निवर्तले. नातेवाइकांच्या आश्रयाखाली त्याचे बालपण कसेबसे व्यतीत होत असता, ⇨चैतन्य महाप्रभूंच्या एका भक्ताशी त्याचा सहवास घडला. ह्या सहवासामुळे चैतन्य संप्रदायाकडे कृष्णदासाचे मन वळले वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने आपले गाव सोडले व वैष्णव संप्रदायाचे विद्याकेंद्र असलेल्या वृंदावन क्षेत्राची वाट धरली. ह्या वेळी वैष्णव धर्मांतर्गत चैतन्य तत्त्वप्रणालीचे अधिकारी, प्रतिपादक व प्रचारक म्हणून प्रख्यात असलेल्या रूप, सनातन, जीव, गोपाळभट्ट, थोरला व धाकटा रघुनाथ ह्या सहा गोसाव्यांचे वास्तव्य, वृंदावन क्षेत्री होते. कृष्णदासाने त्यांची भेट घेतली व त्यांच्या सेवेची संधी आपल्याला मिळावी, अशी त्यांना प्रार्थना केली. त्यांचा त्याच्याबद्दल, प्रथम दर्शनीच, अनुकूल ग्रह झाला. त्यांनी त्याला आपल्या सान्निध्यात ठेवले व त्याच्या विद्याध्ययनाकडे जातीने लक्ष दिले. कृष्णदासाने संस्कृत व्याकरण व साहित्य त्याचप्रमाणे वैष्णव तत्त्वज्ञान ह्यांत झपाट्याने प्रगती करून दाखविली. त्याने पुढे संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ रचले त्यांपैकी राधा–कृष्ण कथेवर त्याने रचिलेले गोविंद–लीलामृत हे महाकाव्यसदृश काव्य त्याच्या प्रगल्भ प्रतिभेची व श्रेष्ठ दर्जाच्या कवित्वाची साक्ष देते.
कृष्णदासाने संस्कृत ग्रंथांप्रमाणेच बंगाली भाषेतही काही ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर लिहिलेला ⇨चैतन्यचरितामृत हा ग्रंथ फार महत्त्वाचा होय. वैष्णव मंडळींच्या आग्रहावरून, तो त्याने वयाच्या ७५ व्या वर्षी लिहावयास घेतला व सतत वीस ते बावीस वर्षे अपार परिश्रम घेऊन पूर्ण केला. त्यात प्रामुख्याने चैतन्य महाप्रभूंचे विस्तृत आध्यात्मिक चरित्र आले आहे. चरित्र वर्णन करीत असता, कवीने ओघाओघाने मूलभूत वैष्णव तत्त्वांचे व चैतन्यांच्या विचारसरणीचे सुस्पष्ट आणि साधार विवेचन केलेले आहे.‘आदिलीला’, ‘मध्यलीला’ व ‘अंत्यलीला’ असे त्याचे तीन विभाग पाडलेले असून एकूण श्लोकसंख्या १५,०५० आहे. गौडीय वैष्णव या ग्रंथास ‘वैष्णवांचा महावेद’ मानतात.
खानोलकर, गं. दे.