कृष्ण : कृष्ण ही अतिप्राचीन भारतेतिहासातील इतिहासाला कलाटणी देणारी एक वास्तविक व्यक्ती होऊन गेली. विष्णूच्या प्रसिद्ध ⇨ दशावतारातील मत्स्यापासून वामनापर्यंतचे पाच अवतार जसे काल्पनिक अवतार आहेत, तसा कृष्ण हा केवळ काल्पनिक अवतार नाही. रामही अशीच ऐतिहासिक व्यक्ती असणे फार शक्य आहे, असे पुराणसंशोधकांचे मत आहे. हिंदुधर्माला मानवदेहधारी साक्षात परमेश्वरच या दोन ऐतिहासिक व्यक्तींच्या रूपातच विशेषतः मिळाला. विष्णू, शिव, देवी, दत्त, गणेश इ. साक्षात परमेश्वस्वरूप मानलेले देव या ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे कोणीही मानीत नाही. रामापेक्षाही कृष्णाला हिंदुधर्मात अधिक महत्त्व आले, ते त्याने स्थापन केलेल्या ⇨भागवतधर्मामुळे अथवा ⇨ भक्तिमार्गामुळे होय. कृष्णाचाच भक्तिमार्ग हा रामभक्तीतही परिणत झाला.
कृष्णचरित्रात अद्भुत अतएब काल्पनिक असे प्रसंग व असेच पराक्रम वर्णिलेले आहेत. अशा अद्भुत प्रसंगांनी आणि पराक्रमांनी भरलेल्या या चरित्रातही वास्तविक ऐतिहासिक अंश किंवा बीजे सहज अनुमानिता येतात. वास्तवालाच कल्पनारम्य अद्भुत रूप दिलेले लक्षात येते. बाल्यावस्थेत कृष्णाने पूतना या साक्षसीचे स्तनपान करतानाच तिचे प्राणापहरण केले या कथेचा ‘पूतना’ नामक बालरोगातून त्याची त्वरित सुटका झाली असा अर्थ लागतो. उखळला दोराने बांधलेल्या बालकृष्णाने दोन अर्जुनवृक्षांमध्ये अडकलेल्या उखळाच्या जोरावर ते दोन अर्जुनवृक्ष पाडले, ही कथाही बांधलेले उखळ त्याने फरफटत नेले आणि बागेतील लहान बालवृक्ष त्यामुळे मोडून पडले, या वस्तुस्थितीशी जुळू शकते. गाडा उलथून टाकणे प्रचंड उन्मत्त बैलाशी झुंज घेऊन त्याची शिंगे मोडून त्याला ठार करणे बेलगाम व बेफाम झालेल्या दांडग्या घोड्याला काबूत आणून व लोळवून ठार करणे इ. पराक्रमही नवतरुण व मल्लविद्येत प्रवीण अशा बलिष्ठ कृष्णाला शक्य आहेत असंभवनीय नाहीत. शकटासुर, वृषभासुर, केशी दैत्य, मथुरेच्या दरवाजातील कुवलयापीड हत्ती इत्यादिकांच्या निर्दालनाच्या कृष्णाच्या नवयौवनातल्या घटना वास्तविक असू शकतात. त्यांत अलौकिक बुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्य आणि कुशलता हे गुण कृष्णाच्या ठिकाणी एकत्रित झालेले दिसून येतात. चाणूरासारखे अप्रतिम मल्ल, मल्लयुद्धात खेळ खेळत ठार करण्याचीही शक्ती मल्लविद्येत प्रवीण असलेल्या व्यक्तिला असू शकते. कृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याच्या नवयौवनातीस कथांचा अंतर्भाव केला आणि त्या अधिक अद्भुत रसात्मक केल्या ही गोष्ट कृष्णाला ‘दिव्यावतार’ मानण्याच्या कालखंडात झालेले परिवर्तन होय. यशोदेला बालकृष्णाने आपल्या मुखात विश्वरूप दर्शन दिले, ही कथा अशा परिवर्तनानंतर प्रविष्ट झाली. गोवर्धन पर्वत करंगळीवर कृष्णाने पेलला अशा तऱ्हेच्याही कथा त्याची दिव्यावतार म्हणून पूजा झाल्यानंतर कथा होत. या कथेतही वास्तवाचे बीज स्पष्ट दिसते. इंद्रपूजा किंवा ⇨ इंद्रध्वजोत्सव बाजूला सारून गोप्रचार तसेच भूमीच्या किंवा पर्वताच्या पूजनाचा कृष्णाने पुरस्कार केला, ही गोष्ट कृष्णाच्या नवयौवनात घडणे शक्य आहे. वैदिक श्रेष्ठ देव असलेल्या इंद्राचे माहात्म्य कमी करून जुन्या धार्मिक परंपरांना महत्त्व देऊन त्या सुरू करण्याचा कृष्णाचा यत्न होता. वैदिकेतर व वेदपूर्व हिंदुधर्मातील परंपरांना उजाळा देणारा थोर धर्मसुधारक म्हणूनही कृष्णाचे महत्त्व या कथेने चांगले सूचित होते. वैदिक यज्ञधर्माच्या परंपरेला दुय्यम लेखणारा आणि वासुदेवभक्तिसंप्रदाय, उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचा आधार देऊन, दृढ करणारा कृष्ण ही सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक व्यक्ती होय, असे त्याच्या चरित्रातील अनेक कथांवरून सूचित होते. गोपालन आणि गोमातेची पूजा हा हिंदुधर्मातील एक केंद्रवर्ती आचारधर्म आहे. या आचारधर्माला कृष्णाने प्राधान्य दिले.
कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३·७·६) आला असून, मनुष्य जीवनच यज्ञ म्हणून चालवावे या यज्ञाच्या दक्षिणा तप, दान, ऋजुता, अहिंसा आणि सत्यवचन ह्या होत असा उपदोश घोर अंगिरस या ऋषीने केल्यामुळे कृष्ण हा तृष्णामुक्त झाला, असे त्यात म्हटले आहे. भगवद्गीतेशी हा उपदेश जुळतो. वासुदेव कृष्णाचा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केलेला आहे. क्षत्रिय म्हणून या दोघांनाही पाणिनिकाली मान्यता नसावी. मूळ महाभारत (इ. स. पू. सु. ३००), हरिवंश (इ. स. पू. सु. दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सु. पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (सु. नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सु. पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधारग्रंथ होत. ⇨ महाभारताच्या सभापर्वामध्ये राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान कृष्णालाच का देणे जरूर आहे, याचे समर्थन भीष्माने केले. त्या समर्थनाच्या निमित्ताने जे कृष्णचरित्र भीष्माने सांगितले आहे, ते ⇨ हरिवंशातूनच जवळजवळ सगळे उचलले आहे, असे ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरा’ ने प्रसिद्ध केलेल्या हरिवंशाच्या संशोधित आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. प. ल. वैद्य यांनी सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून असा निष्कर्ष निघतो, की कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णाच्या कथा ह्या महाभारतातील मूळच्या असून सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे. विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशांच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे. आज भारतात सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः ⇨भागवताच्या दशमस्कंधातील कृष्णकथा होय. दशमस्कंध हा कृष्णकथेला वाहिलेला स्कंध आहे. हरिवंशातीलच कथांना अधिक अद्भुत रम्य रूप दिले. वत्सक, अघासुर, प्रलंब आणि शंखचूड या असुरांच्या वधाचे प्रसंग, ही त्यातील हरिवंशापेक्षा निराळी अशी भर आहे. कुब्जेवरील प्रेमाच्या कथेतही अधिक रंग भागवताने भरला आहे. ‘ब्रह्मस्तुती’ आणि ‘वेदस्तुती’ हीही अधिक भर घातलेली प्रकरणे होत.
रूक्मिणीस्वयंवरकथेमध्येसुद्धा रूक्मिणीने कृष्णाला पाठविलेले प्रेमपत्र हरिवंशात नाही, ते येथे आहे. हरिवंशातील केवळ कृष्णाची किर्ती व रूक्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन कानावर आल्यामुळे, दोघांची प्रीती एकमेकांवर बसली, असे म्हटले आहे. भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचे उत्तान वर्णन आले आहे. तसेच कृष्ण व गोपींची ⇨रासक्रीडा खूप खुलवून सांगितली आहे. हरिवंशात हा शृंगार आणि क्रीडा सूचक रूपानेच तेवढी आली आहे. महाभारत, हरिवंश व भागवत यांमध्ये कृष्ण हा गोपींचा प्राणवल्लभ म्हणून निर्दिष्ट केलेला असला, तरी तेथे कोठेही राधेचा निर्देश नाही. हालाच्या गाथासप्तशतीत (सु. पाचवे शतक) ⇨ राधा व कृष्ण यांच्या प्रणयाचा उल्लेख आला आहे. राधा ही इतर गोपींप्रमाणेच परकीया आहे, असे एक मत धरून मध्ययुगीन काही काव्ये लिहिली आहेत, तर राधा व कृष्ण यांचा विवाह झाला, असे धरून काही काव्यांमध्ये वर्णन आहे. राधा ब्रह्मवैवर्तपुराण व जयदेवकविरचित गीतगोविंदात कृष्णाची परमप्रिया म्हणून चमकते. ब्रह्मवैवर्तात विष्णूची आदिमायाशक्ती हीच राधा बनली. मूळमहाभारतात जशी कालांतराने भर पडत गेली, तशी मूळ हरिवंशातही ती पडत गेली व मूळ ग्रंथ दुप्पट अथवा तिप्पट झाले. वरील सर्व ग्रंथांमध्ये असलेल्या कृष्ण चरित्रांपैकी भागवतातील कृष्णचरित्र हे मध्ययुगीन देशी भाषांमध्ये प्रामुख्याने प्रसृत झाले. कृष्णाच्या बाललीला आणि राधाकृष्णप्रणय मराठी संतांच्याही कवितांचा विषय बनला.
कृष्णचरित्र : यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला. वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण ‘पृथा’ म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता ⇨कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.
वसुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली. या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की ‘कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की ‘देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे’. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा. अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर ‘व्रज’ म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.
आकाशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला. वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव ‘संकर्षण’ होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे ‘संकर्षण’ होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपाने देवकीपुढे प्रगट झाला परंतु देवकीच्या प्रार्थनेने त्याने पुन्हा नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला. यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले. हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचलली, बालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे. कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली. वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे’. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे. याचा अभिप्राय असा, की वासुदेव भक्तिसंप्रदायाने किंवा ⇨वैष्णव संप्रदायाने देवीपूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला.
नंद आणि यशोदा यांचा पुत्र म्हणून कृष्ण गोकुळात व नंतर गोकुळाची वस्ती उठल्यावर वृंदावनात वाढला. वृंदावनात आल्यावर यमुनेच्या डोहात नागगणांचा अधिपती कालीयनाग गरुडाच्या भीतीने दडून बसला होता. नागांच्या विषाने यमुनेचे पाणी दूषित झाले होते, म्हणून कृष्णाने डोहात उडी घेऊन कालीयनागाचे दमन केले आणि त्याला त्याच्या परिवारा सह लांबदूर वस्ती करण्याच्या अटीवर जिवंत सोडले. कुरुकुल व यदुकुल यांच्याशी नागकुलाचे वैर दीर्घकाळ चालू होते. अर्जुनाकडून करविलेल्या खांडववनदाहात तक्षककुल नष्ट झाले, तक्षक तेवढा वाचला, अशी कथा महाभारतात आहे. परीक्षित राजाचा नाश तक्षकाने केला म्हणून जनमेजयाने सर्पसत्र करून नागकुलाचा नाश केला, अशीही कथा महाभारतात सांगितली आहे. वृंदावनात असताना वार्षिक इंद्रमह, इंद्रयज्ञ, किंवा इंद्रपूजा कृष्णाने बंद पाडून गोवर्धनपूजा सुरू केली. इंद्राने प्रचंड अतिवृष्टी करून, गोपांचे जीवित धोक्यात आणले, तेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने उचलून त्याच्याखाली गायी व गोपालांना रक्षण दिले. इंद्राने अखेरीस प्रसन्न होऊन स्वतःच्या इंद्रपदावर गोविंदाला अभिषेक केला, असे हरिवंशात म्हटले आहे. वैदिक धर्माचे कृष्णभक्तसंप्रदायात रूपांतर झाल्याची सूचक अशी ही कथा आहे.
वृंदावनातील कृष्णाचे अनेक शौर्यप्रसंग कंसाच्या कानावर वारंवार पडू लागले. त्यामुळे त्याला नंदगोप व गोपालकुल यांचा मत्सर वाटू लागला. गोपालकुलाच्या निःपात करण्याचा विचार तो करू लागला. ही गोष्ट नंदाच्या व कृष्णाच्या ध्यानात आली. कृष्णानेही सावधगिरी बाळगून आलेल्या प्रसंगांना शिताफीने तोंड देण्याचा निश्चय केला. कंसाने कृष्णाचा व बलरामाचा युक्तीने नाश करण्याचा उपाय शोधला. ‘धनुर्मह’ म्हणजे ‘धनुष्योत्सव’ योजला. त्यात उत्कृष्ट, टणक, केवळ मोठ्या ताकदीनेच वाकवून पेलता येणारे धनुष्य, शक्तीची परीक्षा करण्याकरिता ठेवण्याचा विचार केला. शूरांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा म्हणजे मल्लांच्या कुस्त्या व धनुष्याचे खेळ ठेवले. यदुकुलोत्पन्न अक्रूर ह्याला नंदगोपाकडे वृंदावनात कृष्ण-बलरामांना निमंत्रण देण्याकरिता पाठविले. कृष्ण-बलरामांचा सत्कारपूर्वक मथुरेत प्रवेश झाला. मथुरेत राजमार्गावर कृष्ण-बलरामांना पाहण्याकरिता नागरिकांच्या रांगा लागल्या. राजमार्गातून जात असताना वाटेत कंसाचे शस्त्रागार लागले. त्यात हे दोघे वीर विविध शस्त्रांच्या दर्शनार्थ उत्सुकतेने शिरले. तेथे एक महान धनुष्य, वीरांची कसोटी करील असे, ठेवलेले त्यांनी पाहिले. ते कृष्णाने सहज उचलून वाकविले व मोडून फेकून दिले. मथुरेत वीरांच्या स्पर्धांकरिता रंगांगण व प्रेक्षकांचे मंचक सजवून तयार ठेवले होते. त्या रंगांगणाला विशाल प्रवेशद्वार होते. कंसाने प्रचंड कुवलयापीड नावाचा हत्ती रंगांगणाच्या दरवाज्याजवळ उभा केला होता. सूचने प्रमाणे कृष्ण व बलराम प्रवेशद्वारावर येताच तो मत्तमातंग कृष्ण-बलरामांवर चालून गेला. त्याची सोंड पकडून त्याच सोंडेच्या शिडीने त्या हत्तीच्या मस्तकावर कृष्ण चढला. त्याने त्या हत्तीचा लांब सुळा उपटून त्याच शस्त्राने त्याला रक्तबंबाळ करून जमिनीवर आडवा केला. सबंध रंगांगण सागरासारखी गर्जना करून कृष्णाचा जयजयकार करीत हेलावू लागले. कंसाने आपल्या मल्लश्रेष्ठ चाणूराला कृष्णाचा समाचार घेण्याकरिता पुढे करून कृष्णाला आव्हान दिले. कृष्णाने एका तडाख्यातच चाणूराचे मर्दन करून त्याला यमसदनास पाठविले. त्याच्या पाठोपाठ बलरामाने मुष्टिक या मल्लाला चारीमुंडे चीत केले. अशा अनेक महामल्लांची वाट लावल्यानंतर, यादवकुलाचे आणि नंदगोपाच्या जमातीचे निर्दालन करण्याची कंसाची प्रतिज्ञा आठवून, कृष्णाने कंसाच्या सिंहासनावर झेप घेऊन, कंसाचा शिरच्छेद केला आणि कंसाचा पिता उग्रसेन यास राज्याभिषेक केला.
यादवांच्या ताब्यात मथुरा आली. कंसही यादवच होता परंतु तो गणांच्या संमतीवाचून राज्य बळकावून बसला होता म्हणून ‘कृष्णाने मथुरापुरी यादवाधीन केली’, असे हरिवंशात म्हटले आहे. त्यानंतर वृंदावनाकडे न जाताच राम व कृष्ण यांनी काशी देशीय परंतु अवंतिपुरनिवासी गुरू सांदीपनीकडे धनुर्वेदाध्ययनार्थ गमन केले. स्वतःची वेदशाखा आणि गोत्र गुरूंना सांगितले चौसष्ट दिवसांत वेदांचे सांग अध्ययन केले चतुष्पाद धनुर्वेद व अस्त्रविद्या शिकले. कृतकृत्य झालेल्या कृष्णाने सांदीपनीला गुरुदक्षिणा काय द्यावी म्हणून पृच्छा केली. गुरूने सांगितले, ‘प्रभासक्षेत्रास तीर्थयात्रेकरिता गेलो असताना, समुद्रात महामत्स्याने माझ्या पुत्राला ओढून नेले त्यास परत आणून दे’. कृष्णाने समुद्र प्रवेश केला समुद्राने त्याला सांगितले की, ‘पंचजन नामक दैत्याने त्या बाळाला गिळले आहे’. पंचजन दैत्याचा कृष्णाने वध केला गिळलेला गुरुपुत्र जिवंत केला तेथे त्याला उत्कृष्ट शंख मिळाला. त्याचेच नाव ‘पांचजन्य’ होय. गुरूला मृतपुत्र जिवंत करून अर्पण केला. आपल्या मथुरेतल्या पितृगृही राम व कृष्ण दोघेही परतले. मगधातील राजगृहनामक राजधानीचा अधिपती जरासंध याला आपल्या दोन कन्यांचा पती कंस कृष्णाने मारला ही वार्ता कळल्यावर, कृष्णाचे पारिपत्य करण्याकरिता तो मथुरेवर चाल करून गेला. त्यात मगध सम्राट जरासंध आणि कृष्णाचे वृष्णिकुल यांचे युद्ध झाले. बलरामाने गदायुद्धात जरासंधाला जेरीस आणले परंतु त्याचा वध न करता शरण आणून सोडून दिले. बलरामाला वृंदावनात पाठविले. राम तेथील आनंदपूर्ण जीवनाचे दर्शन घेऊन मथुरेस परतला. मथुरा राजधानी सुरक्षित रीतीने, निर्भयपणे, शांततापूर्ण जीवन चालवण्यास समर्थ नाही ही गोष्ट जरासंधाच्या आक्रमणावरून लक्षात आल्यामुळे, कृष्णाने आपल्या यादव वंशातील मथुरावासी वृष्णिकुलाला सल्ला दिला, की ही अशी आक्रमणे सतत वाढत्या प्रमाणात चालू राहणार, म्हणून आपण पश्चिम सागराच्या किनाऱ्यावरून सुरक्षित व शत्रूस दुर्गम असलेल्या प्रदेशाचा आश्रय करूया. कृष्णाने द्वारकापुरीची रचना समुद्र चोहोबाजूस असलेल्या एका बेटावर केली. द्वारकेस वार्ता आली, की जरासंधाचा मित्र कालयवन मथुरेवर चाल करून येत आहे. हे कळल्याबरोबर कृष्ण मथुरेस परतला. कालयवन त्याचा पाठलाग करू लागला. कृष्ण हा झुकांड्या देत त्याच्या हातून निसटला व एका पर्वताच्या गुहेत शिरला. कालयवनाने त्याचा पिच्छा पुरविला. त्या गुहेत मांधात्याचा पुत्र मुचुकुंदराजा देवासुर युद्धात महापराक्रम करून श्रांत होऊन दीर्घ निद्रेला वश होऊन पडला होता. या निद्रेत जो कोणी त्याला जागा करील त्याला क्रोधाग्नीत जाळून टाकील, असा दैवी वाणीने त्याला आशीर्वाद दिला होता. त्याला कालवयनाने कृष्ण समजून लाथ मारून जागे केले. कालयवन त्याच्या नेत्रांतून निघालेल्या ज्वालेत दग्ध होऊन नष्ट झाला.
कृष्णाने द्वारकेत व भोवतालच्या प्रदेशात बलरामाच्या साहाय्याने गणराज्याची स्थापना केली. या गणराज्याचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात आहे. कृष्णाने विदर्भराजा हिरण्यलोमा किंवा भीष्मक या यादव वंशीय राजाच्या रुक्मिणीनामक सुंदर कन्येशी राक्षस विवाहविधीने विवाह केला. भीष्मकाला ‘दाक्षिणात्येश्वर’ असे विशेषण हरिवंशात लावलेले आहे. तेथे म्हटले आहे, की ‘ कुंडीननामक नगरीत राहून याने अगस्त्याच्या दिशेवर म्हणजे दक्षिण दिशेवर आपली राजसत्ता चालविली.’ राक्षसविवाहविधी हा क्षत्रियांस विहित मानला आहे. राक्षसविवाहविधी म्हणजे कन्येला तिच्या माता-पित्यांच्या संमतीवाचून पळवून नेऊन विवाह करणे. कृष्णाशी रुक्मिणीचा विवाह होणे, तिचा पराक्रमी बंधू रुक्मी यास मान्य नव्हते. रुक्मीने सैन्य घेऊन कृष्णावर हल्ला केला. जरासंध व तत्पक्षीय सर्व राजे या युद्धात कृष्णाच्या विरुद्ध पक्षास येऊन मिळाले. बलरामाने या युद्धात मोठा पराक्रम करून रुक्मीपक्षास जेरीस आणले. रामासह कृष्ण रुक्मिणीला द्वारकेस घेऊन गेला व तेथेच शास्त्रोक्त पाणिग्रहण विधीने कृष्णाने रुक्मिणीला वरले. असंतुष्ट व क्रुद्ध रुक्मीचा वध अखेरीस बलरामानेच केला.
त्यानंतर प्राग्ज्योतिष राज्याचा अधिपती नरकासुर होता, त्याचा कृष्णाने निःपात केला. सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा व लक्ष्मणा यांच्याशी कृष्णाचे विवाह झाले. यांच्यापैकी काहींची निराळी नावेही पुराणांत आढळतात. त्याही पराक्रमाच्या योगानेच त्याने मिळविल्या. कृष्णाच्या या अष्टनायिका होत. नरकासुराचा वध केल्यानंतर पुढे नरकासुराच्या बंदीतील सोळा हजार कन्यांना कृष्णाने बंधमुक्त केले व वरिले. त्यानंतर कृष्णाने आपली विश्वसुंदरी सत्यभामा हिला घेऊन गरुडावर आरोहरण केले आणि देवराज इंद्राच्या नंदनवनात तो गेला. तेथे देवराजेंद्राने त्याचा बहुमान पूर्वक सत्कार केला. नंदनवनातील पारिजातनामक पुण्यगंध दिव्यवृक्ष कृष्णाच्या दृष्टीस पडला. तो उपटून गरुडावर आरोहण करून सत्यभामेकरिता द्वारकेस आणला. त्यानंतर कामदेवासारखा सुंदर असलेला कृष्णपुत्र प्रद्युम्न यास शंबरासुराने किंवा कालशंबराने पळवून नेले. शंबरासुराचा वध करून कृष्णाने प्रद्युम्न परत मिळविला. त्यानंतर बाणासुराशी युद्ध झाले. बाण हा शिवभक्त होता. त्यामुळे शिवाशीही कृष्णाचे युद्ध झाले. बाण व शिव यांचा या युद्धात पराभव झाला. त्यानंतर बाणासुराची कन्या उषा हिच्याशी कृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा विवाह झाला. ही हरिवंशातील कथा शिव भक्तीपेक्षा कृष्णभक्ती अधिक पुण्यप्रद आहे याची सूचक आहे.
पांडवांचा आणि कृष्णाचा मैत्रीचा संबंध कृष्णाची भगिनी सुभद्रा व अर्जुन यांच्या विवाहाने दृढ झाला, असे महाभारतात सूचित केले आहे. मगधराज जरासंध आणि कृष्ण यांचे वैर कंसवधापासून सारखे पेटलेलेच होते. कृष्णाने भीमाच्या हस्ते युक्तीने जरासंधाचा वध करविला. धर्मराजाने वनवासापूर्वी राजसूय यज्ञ केला. त्यात अग्रपूजेचा मान कृष्णाला भीष्माच्या सांगण्यावरून मिळाला. चेदी देशाचा राजा शिशुपाल याने या प्रसंगी कृष्णाची राजसभेत भरपूर निंदा केली, त्यामुळे शिशुपालाचा कृष्णाच्या हातून तेथेच वध झाला. पांडवांच्या पत्नीची म्हणजे द्रौपदीची भरसभेत वस्त्रहरण पूर्वक विटंबना झाली, तीत कृष्णाने आपली मानलेली भगिनी हिला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. पांडवांच्या वनवाससमाप्तीनंतर कृष्णाने पांडवांचा शांतिदूत म्हणून दुर्योधनास, पांडवांचा राज्यात अर्धा वाटा आहे, म्हणून तो दिला पाहिजे, असे पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्योधनाने पांडव अज्ञातवास गुप्तरीतीने पूर्ण करू शकले नाहीत, या मुद्यावर हट्ट धरून राज्याचा भाग देण्याचे नाकारले. पूर्ण अज्ञातवासाची अट पांडवांना पाळता आली, की नाही हा वादाचा मुद्दा आहे. डॉ. एस्. एल्. कत्रे यांच्या मते ही अट पांडवांना पूर्ण करता आली नाही. भारतीय युद्धात कृष्णाने दुर्योधनाला आपली सेना दिली व स्वतः अर्जुनाचे सारथ्य केले. त्यावेळी अर्जुनाला तत्वज्ञानावर अधिष्ठित असा कर्तव्य पालनास उपयुक्त नीतितत्त्वांचा उपदेश देऊन युद्धाला प्रोत्साहित केले. कृष्णाने या युद्धात पांडवांना अनेक वेळा कुटिल सल्लामसलत देऊन त्यांच्या विजयास भरपूर हात दिला.
कृष्णाने युधिष्ठिराला भारतीय युद्धानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर राज्याभिषेक केला व उत्तरेच्या गर्भात असलेला अभिमन्यूचा गर्भ परीक्षित याचे संरक्षण केले. युधिष्ठिराने राज्यरोहणानंतर अश्वमेध केला, त्यात कृष्णाची पुन्हा भेट झाली.
कृष्णाच्या अखेरच्या जीवनपर्वात यादवांमध्ये आपसांत मारामाऱ्या होऊन यादवकुलाचा संहार झाला. कृष्णपुत्र सांब याने नारदादी ऋषींची थट्टा केली त्यामुळे ऋषींनी यादवांना शाप दिला, हे निमित्त झाले. राम कृष्णांना या सर्व गोष्टींचा अत्यंत वीट आला. बलरामाने देहाचे विसर्जन केले आणि कृष्णाने प्रभासक्षेत्राजवळील वनामध्ये योगसमाधी लावली. त्यात एका पारध्याचा बाण लागल्यावर त्याने देह सोडून दिला.
दाशरथी रामाने राक्षसांचा निःपात केल्यावर अयोध्येत राज्य करण्यास प्रारंभ केला. तेव्हा द्वापरयुगास प्रारंभ झाला. त्यानंतर पांचाल, पौरव, चेदी, मगध, यादव आणि पूर्वेकडचे आनव या क्षत्रिय वंशांची भरभराट झाली. रामाचा सूर्यवंश रामानंतर अस्ताकडे कलला. पांचालांचा अखेरचा प्रसिद्ध राजा द्रुपद होय. कौरव व पांडव हे पौरव कुलातील होत. चेदी आणि मगध कुलांतील अखेरचे सम्राट शिशुपाल व जरासंध होत. यादवांचे महापुरुष बलराम व कृष्ण होत. आनव वंशाच्या सिंहासनावरील अखेरचा सुप्रसिद्ध शूर राजा कर्ण हा होय. दाशरथी रामाच्या वंशातील अखेरचा पुरुष बृहद्बल याला कर्णाने पराजित केले. बृहद्बल हा कुरुक्षेत्रावर झालेल्या भारतीय युद्धात अभिमन्यूच्या हातून मारला गेला.
यादवकुलाचा पशुसंगोपन मुख्य व्यवसाय त्यांच्या काही शाखांमध्ये तो कृष्णापर्यंत चालू होता. त्यामुळे कृष्णकथा ही वैश्य व शूद्र या भारतीय समाजरचनेतील लोकांमध्ये अत्यंत प्रिय झाली. शूद्रादी खालच्या वर्णांना कृष्ण हा आपल्यातीलच वाटू लागला. त्यामुळे भक्तिमार्ग हा चांडालादिकांपर्यंत म्हणजे हरिजनांपर्यंत हरिप्राप्तीचा मार्ग ठरला. नृत्य व वाद्यकलेत निपुण असलेला हा मुरलीधर गोपगोपींसह रासक्रीडेत रममाण होतो गोपालनात निपुण पोहणे, कुस्ती इ. शारीरिक शक्तींच्या खेळांमध्ये तरबेज उत्कृष्ट मल्ल असा कृष्ण सामर्थ्यशाली सुसंस्कृत जीवनपद्धतीचा आदर्श ठरतो. जरासंध, बाण इत्यादिकांशी संग्रामांत विजयी होणारा वीर म्हणूनही शूरांना तो स्फूर्ती देणारा ठरतो. पांडवांचा मुत्सद्दी सल्लागार आणि भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा महान द्रष्टा म्हणून कृष्णाचे दिव्य स्थान भारतीय संस्कृतीत अढळ बनले. वेदकालापासून आजपर्यंत झालेल्या जगातील धार्मिक विभूतींमध्ये, धर्मसंस्थापकांमध्ये इतके वैचित्र्यपूर्ण, सर्वांगीण आणि समृद्ध चरित्र जगाच्या वाङ्मयात कोणाचेही सापडत नाही.
पौराणिक परंपरेप्रमाणे कृष्ण हा द्वापर युगाच्या अखेरीस म्हणजे द्वापर आणि कली यांच्या संधिकाळात इ. स. पू. ३००० वर्षांच्या पूर्वी झाला. पुराणांतील ऐतिहासिक कालगणना निश्चित करणाऱ्या पार्गीटर, डॉ. पुसाळकर इ. विद्वानांच्या मते इ. स. पू. सु. चौदावे शतक हा कृष्णाचा काल अनुमानित झालेला आहे. भारतीय युद्ध कित्येक आधुनिकांच्या मते इ. स. पू. १२०० च्या सुमारास झाले. भारतीय युद्धाच्या समयी कृष्णाचे वय १०० किंवा त्याहून थोडे अधिक होते, असे काहींचे म्हणणे आहे.
मूर्तिकलेत व चित्रकलेत कृष्णचरित्रावरील जन्मापासूनचे प्रसंग निर्माण केलेले सापडतात. इ. स. पहिल्या शतकापासून तो पाचव्या शतकाच्या कालातील मूर्तिशिल्पे मथुरेच्या परिसरात सापडली आहेत. वसुदेव कृष्णाला सुपात घेऊन यमुना पार करतो, असे शिल्प पहिल्या शतकातील आहे. पाचव्या-सहाव्या शतकांतील शिलापट्टांवर ‘गोवर्धनधारण’, आणि ‘कालियामर्दन’ अंकित केले आहे. बंगालमधील पहाडपूर येथे धेनुका सुरवध, दोन अर्जुनवृक्ष उलथणे, चाणूर मुष्टिकांशी मल्लयुद्ध, राधाकृष्ण अशा मृत्तिकामूर्ती सापडल्या आहेत. जोधपूरजवळ ‘गोवर्धनधारण’, ‘यशोदेचे दधिमंथन’, ‘नवनीतचौर्य’ इ. दृश्ये तोरणस्तंभावर चौथ्या शतकात कोरलेली उपलब्ध झाली आहेत. मध्य प्रदेशातील देवगड येथे कृष्णजन्म, शकट उलथणे, कृष्ण व सुदामा इ. दृश्ये कोरलेली सापडली आहेत. मध्य प्रदेशातील पठारी येथेही कृष्णजन्माचे शिल्प सापडले आहे. यांशिवाय महाबलीपूर, खजुराहो, राजस्थान आणि गुजरात येथेही उत्खननांत विविध कृष्णशिल्पे मिळाली आहेत. सहाव्या-सातव्या शतकांतील विष्णुधर्मोत्तर पुराणात पूजेसाठी निर्माण करावयाच्या कृष्णमूर्तीचे रुक्मिणी व सत्यभामा यांच्यासह शिल्प कसे तयार करावे, याचे तंत्र सांगितले आहे. रांगता बालकृष्ण उडुपीला मुरलीधर, राधासहित कृष्ण किंवा सत्यभामा सहित कृष्ण किंवा पार्थसारथी कृष्ण इ. कृष्णमूर्ती हंपी, कांची, महाबलीपूर इ. ठिकाणी दक्षिणेत आढळतात. भारतीय चित्रकलेतही कृष्णलीला चित्रित केलेल्या आहेत. गुजराती, राजपूत, कांग्रा, ओरिसा, काशी इ. शैलींमध्ये कृष्णलीला चित्रित केलेल्या आहेत. नंदलाल बोस, जेमिनी
रॉय इ. आधुनिक चित्रकारांनीही कृष्णचित्रे रंगविलेली आहेत. (चित्रपत्र १७) ).
संदर्भ : 1. Katre, S. L. “Krashna and the Mahabharat War”, The Allahabad University Studies Journal.
2. Majumdar, R. C. Pusalkar, A. D. Ed. The Vedic Age, London, 1957.
३. पणशीकर, वा. ल. संपा. श्रीमद्भागवतम्, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९२९.
४. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, संपा. महाभारतम्, पुणे, १९३३–१९५९.
५. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, संपा. हरिवंशम्, पुणे, १९६९.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
“