क्विनीन : (कोयनेल). एक ⇨अल्कलॉइड. सूत्र C20H24O2N2. ⇨सिंकोना झाडाच्या सालीपासून मिळणाऱ्या अनेक अल्कलॉइडांपैकी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. १९२० सालापर्यंत क्विनीन हेच हिवतापावर गुणकारी म्हणून प्रसिद्ध औषध होते. परंतु त्यानंतर प्रायमाक्विन, क्लोरोक्विन, क्लोरोग्वानिडीन इ. हिवतापप्रतिबंधक संश्लिष्ट (रासायनिक क्रियांनी बनविलेली) औषधे उपलब्ध झाली आहेत. क्विनीन हे डोकेदुखी, तंत्रिकाशूल (मज्जामार्गे पसरणारी तीव्र वेदना) इत्यादींसाठी वेदनाहारक व ज्वरशामक  म्हणून अद्यापही काही प्रमाणात वापरले जाते. जावा बेटातील लागवडीपासून सर्वांत जास्त प्रमाणात सिंकोनाची साल मिळते. १७९२ मध्ये सिंकोनाच्या सालीपासून अशुद्ध स्थितीत क्विनीन असलेले मिश्रण फूरक्रवा यांनी प्रथम तयार केले. पेल्ट्येर व काव्हांतू यांनी १८२० मध्ये त्यातून क्विनीन आणि तत्सम इतर अल्कलॉइडे विलग केली. क्विनिनाची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) ठरवण्याचे बरेचसे श्रेय पी. राबे यांना आहे. १९४५ मध्ये वुडवर्ड आणि डोअरिंग यांनी क्विनिनाचे संश्लेषण केले. त्यामुळे ही संरचना निश्चित झाली.

क्विनीन

निसर्गातून क्विनीन मिळविण्यासाठी सिंकोनाची साल, पाणी आणि चुना किंवा कॉस्टिक (दाहक) सोडा यांचा प्रथम लगदा बनवून तो वाळवितात व नंतर त्यात बेंझीन मिसळून त्यापासून अल्कलॉइडांचा बेंझीन-निष्कर्ष (बेंझिनामध्ये अल्कलॉइडे विरघळून बनलेले मिश्रण) काढतात. त्यात विरल सल्फ्यूरिक अम्ल घालून मिश्रण ढवळतात व जलीय विद्राव वेगळा करतात. तो तापवून त्याचे सोडियम कार्बोनेटाने उदासिनीकरण (अम्लधर्मी नाही व अल्कलीधर्मी नाही असे करणे) केले व मिश्रण थंड केले म्हणजे क्विनीन सल्फेटाचे स्फटिक मिळतात. ते शुद्ध करून अमोनियाने त्यांचे विघटन (संयुगाच्या रेणूचे तुकडे करणे)केले म्हणजे क्विनीन तळाशी बसते. ते वामवलनी आहे [→ ध्रुवणमिति].

क्विनिनाचे स्फटिक ३ जलरेणुयुक्त असतात, C20H24O2N2·3H2O. निर्जल क्विनिनाचा वितळबिंदू १७७से. आहे. ते पाण्यात अत्यल्प प्रमाणात विरघळते. ते एक अतिदुर्बल द्विअम्लीय क्षारक (याचा एक रेणू अम्लातील दोन हायड्रोजनांची जागा घेऊन लवण व पाणी बनवितो) आहे. त्याची क्विनीन सल्फेट [(C20H24O2N2)2, H2SO4,8H2O] अशी रेखीव लवणे बनतात. ती जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) असून हिवतापावर गुणकारी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरीत असत. ती चवीला अत्यंत कडू असल्यामुळे कमी कडू किंवा रुचिहीन असे क्विनिनाचे अनेक अनुजातही (एका संयुगापासून बनविलेले दुसरे संयुग) बनविले जात. ओझोनीकरणाने (ओझोनाच्या विक्रियेने) क्विनिनापासून फॉर्माल्डिहाइड (H·CHO) मिळते. क्रोमिक अम्लाने काळजीपूर्वक ऑक्सिडीकरण (रेणूमध्ये ऑक्सिजन समाविष्ट करून विक्रिया घडविणे) केल्यास क्विनिनापासून क्विनिनिक अम्ल (C11H9O3N) व मेरोक्विनीन (C9H15O2N) ही संयुगे मिळतात.

 रानडे, अ. चि.