क्विंटिल्यन, मार्कस फेबिअस : (सु. ३५–सु. १००). प्रसिद्ध रोमन वक्ता, लेखक व विधिज्ञ. स्पेनमधील कालागुरिस (सध्याचे लोग्रोन्यो प्रांतातील कालाऑरा) येथे जन्म. रोम येथे काही काळ शिक्षण घेतल्यावर तो इ. स. ६१ मध्ये स्पेनला परतला परंतु गॅल्ब या सम्राटाच्या आज्ञेनुसार तो पुन्हा रोमला आला. तेथे त्याने वक्तृत्वशास्त्राचे अध्यापन केले. सम्राट डोमिशनने त्याला ‘कॉन्सुलर’ हा बहुमान दिला. व्हेस्पेझ्यन या रोमन सम्राटाने त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली (इ. स. ७१). सरकारी वेतन मिळणारा हा पहिलाच प्राध्यापक होय. याच काळात त्याने विधिज्ञ म्हणूनही नावलौकिक मिळविला. त्यातून निवृत्त झाल्यावर तो इ. स. ९०च्या सुमारास लेखनाकडे वळला.
सतत दोन वर्षे परिश्रम करून लिहिलेला Institutio oratoria (९५, इं. शी. द ट्रेनिंग ऑफ ॲन ओरेटर ) हा वक्तृत्वशास्त्रावरील त्याचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तो एकूण बारा भागांत लिहिलेला असून त्याची विभागणी अशी आहे : पहिल्या दोन भागांत वक्तृत्वशास्त्राचे प्राथमिक शिक्षण तीन ते सात या भागांत वक्तृत्वाची सुरुवात, विषय व मांडणी आठ ते अकरा या भागांत शैली व पाठांतर आणि शेवटच्या भागांत निष्णात वक्ता होण्यास आवश्यक असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचा विचार. ग्रीक व लॅटिन साहित्याचा उत्कृष्ट परामर्श त्याने घेतला आहे. याविषयीच्या त्याच्या ग्रंथाचा हॅरल्ड बटलर याने केलेला इंग्रजी अनुवादही–लोएब सेरीज (४ खंड, १९२१-२२)– उपलब्ध आहे.
त्याचे वक्तृत्वशास्त्रावरील लेखन त्या काळात शैक्षणिक सिद्धांताच्या व साहित्यसमीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले.
शिरोडकर, द. स.