कोलमनाइट : खनिज. स्फटिक एकनताक्ष आखूड प्रचिन. पाटनक्षम पुंजांच्या, कणमय किंवा संपुंजित रूपात आढळते [→ स्फटिकविज्ञान]. पाटन (१०) उत्कृष्ट [→ पाटन]. भंजन अनियमित. कठिनता ४ ते ४·५ वि.गु. २·४२. चमक काचेसारखी. बहुधा रंगहीन, कधीकधी पांढरे, पिवळसर किंवा करडे. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा. सं. Ca2B6O11.5H2O. बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. तापविल्यास पापुद्रे सुटतात. बहुधा यूलेक्साइटाबरोबर आढळते. ते यूलेक्साइटापासून (NaCaB5O9.8H2O) बनत असावे, असे मानतात. तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षापूर्वीच्या) थरांमध्ये व गाळाच्या खडकांतील स्फटग्रंथींत (ज्यांच्या कडांवर स्फटिक असतात अशा पोकळ्यांत) कोलमनाइट आढळते. नेव्हाडा, कॅलिफोर्निया, पश्चिम तुर्कस्तान, कझाकस्तान इ. प्रदेशांत ते सापडते. टाकणखार मिळविण्यासाठी कधीकधी ते वापरतात. विल्यम टी. कोलमन यांच्या खाणीत प्रथम सापडले म्हणून त्यांच्या नावावरून कोलमनाइट नाव पडले.
ठाकूर, अ. ना.