गाल – १ : श्रीलंका देशाच्या दक्षिण प्रांताची राजधानी व हिंदी महासागरावरील नैसर्गिक बंदर, लोकसंख्या ७३,००० (१९६८ अंदाज). हे कोलंबोच्या दक्षिण आग्नेयीस सु. ११३ किमी. वर वसले आहे. गाल म्हणजे सिंहली भाषेत खडक व लॅटिनमध्ये कोंबडा म्हणून पोर्तुगीज आणि डच लोकांनी शासकीय गृहासमोर कोंबड्याची प्रतिकृती बसविलेली दृष्टीस पडते. कोलंबोच्या उदयापूर्वी गालला मोठे व्यापारी महत्त्व होते आणि प्राचीन काळी ईजिप्त, ग्रीस, इटली, चीन, इराण येथील जहाजे गालला येत. तार्शिश नावाने ते त्यावेळी ओळखले जाई. मध्ययुगात ते मागे पडले. इब्न बतूता गालचा उल्लेख करतो. सोळाव्या शतकात पोर्तुगीज आल्यानंतर त्यास पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर डचांनी तर तेथे तटबंदी करून किल्लाही बांधला. तो सुस्थितीत असून अलीकडे इतर आधुनिकीकरणाबरोबर छानछोकी लोकांची बाजारपेठ झाली आहे. तेथून एक किमी. वर गालपेट्टा ही प्रमुख बाजारपेठ, सर्व आधुनिक दुकाने व अद्यावत सुखसोयींनी युक्त आहे. जुन्या गाल शहरात काही बौद्धकालीन अवशेष आहेत. अलीकडे कोलंबो बंदराचा ताण कमी करण्यासाठी पुन्हा गालच्या विकासास सुरुवात झाली आहे. येथे रबर, नारळ, दालचिनी, चहा, कॉफी, तांदूळ, भाजीपाला इत्यादींचा व्यापार चालतो.
देशपांडे, सु. र.