क्लापरोट, मार्टीन हाइन्रिख : (१ डिसेंबर १७४३–१ जानेवारी १८१७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. युरेनियम, झिर्कोनियम व सिरियम ह्या मूलद्रव्यांचा त्यांनी शोध लावला. त्यांचा जन्म व्हेर्नीगरोड येथे झाला. औषधविक्रेते म्हणून त्यांनी बराच काळ धंदा केला. त्यांनी बर्लिनमधील शस्त्रक्रिया आणि औषध महाविद्यालयाचे सल्लागार म्हणून १७८२–९७ या काळात काम केले. याच महाविद्यालयात ते व्याख्यातेही (१७८२–१८१७) होते. बर्लिन येथील खनिजविज्ञान विद्यालयात व्याख्याते (१७८४–१८१७) म्हणूनही त्यांनी काम केले. तेथील तोफखाना विद्यालयात रसायनशास्त्राचे व्याख्याते म्हणून त्यांची १७९२ मध्ये नेमणूक झाली. बर्लिन विद्यापीठाची स्थापना झाल्यावर (१८१०) रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची तेथे नेमणूक झाली.
वैश्लेषिक रसायनशास्त्र आणि खनिजविज्ञान या विषयांमध्ये त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या तसेच त्यांमध्ये सुसूत्रता आणली. लव्हॉयझर यांच्या फ्लॉजिस्टॉनविरोधी (ज्वलनक्रियेत फ्लॉजिस्टॉन नावाचे रसायन बाहेर पडते या संकल्पनेला विरोध करणाऱ्या) सिद्धांताला पाठिंबा देणाऱ्या फ्रान्सबाहेरील शास्त्रज्ञांमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी युरेनियम (१७८९), झिर्कोनियम (१७८९) व सिरियम (१८०३) ह्या मूलद्रव्यांचा प्रथम शोध लावला व त्यांचे गुणधर्मही सांगितले. पण शुद्ध धातुरूपात ही मूलद्रव्ये त्यांना मिळविता आली नाहीत. विल्यम ग्रेगर यांनी टिटॅनियमाचा १७९१ मध्ये शोध लावल्यावर पाच वर्षांनंतर क्लापरोट यांनी त्याचा परत शोध लावला व या मूलद्रव्याला टिटॅनियम हे नाव त्यांनीच दिले. टेल्यूरियम, स्ट्राँशियम, बेरिलियम व क्रोमियम यांच्या काही संयुगाचे रासायनिक संघटन त्यांनी शोधून काढले.
त्यांना रॉयल सोसायटी, लंडन (१७९५) व इन्स्टिट्यूट द फ्रान्स (१८०४) या संस्थांच्या सभासदत्वाचा बहुमान मिळाला.
त्यांचे जवळजवळ २०० निबंध Beitrage zur chemischen Kenntnis der Mineralkorpar (१७९३—१८१०) आणि Chemische Abhandlungen gemischten Inhalts (१८१७) या दोन ग्रंथांद्वारे त्यांनी प्रसिद्ध केले. एफ्. वूल्फ यांच्याबरोबर त्यांनी पाच खंडांचा (१८०७–१०) [व चार खंडांची पुरवणी (१८१५–१९)] एक रासायनिक शब्दकोश प्रसिद्ध केला. एफ्. ए. सी. ग्रेन यांच्या Handbuch der Chemie (१८०३) या ग्रंथाची सुधारलेली व संपादित केलेली आवृत्ती त्यांनी काढली. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.
मिठारी, भू. चिं.