गाढव : स्तनिवर्गाच्या विषम खुरी (ज्यांच्या पायांच्या खुरांची संख्या विषम असते अशा प्राण्यांच्या, पेरिसोडॅक्टिला) गणातल्या अश्वकुलातील (ईक्विडी) ईक्‍वस  वंशाचा हा प्राणी आहे. घोडा आणि झीब्रा हे याच कुलातील असल्यामुळे गाढवाचे जवळचे नातेवाईक आहेत. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत व आफ्रिका खंडाच्या उत्तर आणि पूर्व विभागात रानटी गाढवे आढळतात. विरळ झुडपे अथवा हिरवळ असलेल्या सपाट रुक्ष प्रदेशात अथवा अर्धवट वाळवंटी मैदानात ती बहुधा राहतात.

जाती व उपजाती : आफ्रिकेतील रानटी गाढव मुख्यतः सोमालीत व सुदानमध्ये आढळते. याचे शास्त्रीय नाव ईक्‍वस असिनस असे आहे. हे गाढव देखणे आणि मजबूत बांध्याचे असून खांद्यापाशी त्याची उंची सु. १·४o मी. असते. आशियात आढळणाऱ्या गाढवापेक्षा याचे कान फार मोठे व लांब असून पाय अरुंद असतात. शरीराचा रंग करडा असून खालचा (पोटाकडचा) भाग पांढरा असतो. डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे वलय असते. पाठीवर डोक्यापासून शेपटाच्या बुडापर्यंत लांब काळा पट्टा असतो. खांद्यावर एक आडवा काळा पट्टा असतो.

आफ्रिका खंडात व त्याच्या जवळपासच्या देशांत ओझे वाहण्यास उपयोगात आणली जाणारी पाळीव गाढवे सोमालीत अाढळणाऱ्या रानगाढवांपासूनच उत्पन्न झालेली आहेत.

आशियातील रानटी गाढवाचे शास्त्रीय नाव ईक्‍वस हेमिओनस  आहे. ही सर्वसाधारणपणे आफ्रिकी रानटी गाढवांसारखीच असतात. परंतु यांच्या शरीराचा रंग कमी करडा व जास्त तांबूस किंवा हरणाच्या रंगासारखा असतो. पाठीवरील लांब काळा पट्टा, खांद्यावरील आडवा काळा पट्टा आणि पायांवरील काळे पट्टे बहुधा असतात. यांच्या पाच उपजाती आहेत. काही प्राणिशास्त्रज्ञांचे मत असे आहे की, या उपजाती  नसून पाच भिन्न जाती आहेत, पण या भिन्न जाती नसून ईक्‍वस हेमिओनस  या जातीच्याच उपजाती आहेत, असे सर्वसाधारण मत आहे. (१) सिरियातील वाळवंटातील रानटी गाढव ईक्‍वस हेमिओनस हेमिप्पस. हा प्राणी जवळजवळ लुप्त झालेला आहे. (२) वायव्य इराणपासून सोव्हिएट तुर्कस्तानापर्यंत आढळणारे रानटी गाढव ईक्‍वस हेमिओनस ओनेजर. बायबलमध्ये जिचा उल्लेख आढळतो तीच ही जात असावी. (३) भारताच्या वायव्य भागातील वालुकामय प्रदेशाचा काही भाग, पश्चिम भारत व बलुचिस्तान यांत आढळणारे रानटी गाढव ईक्‍वस हेमिओनस खर. या उपजातीत खांद्यावरील आडवा काळा पट्टा आणि पायांवरील काळे पट्टे बहुधा फिक्कट असतात वा मुळीच नसतात. (४) तिबेटमधील ४,८०० मी. उंचीवरील पठारांवर आढळणारे रानटी गाढव ईक्‍वस हेमिओनस कियांग. आशियात आढळणाऱ्या सर्व रानगाढवांत हे मोठे आणि फार देखणे आहे. याच्या पाठीवरील लांब पट्टा अंधुक असून खांद्यावरील आडव्या पट्ट्यांचे नाममात्र चिन्ह असते पायावर पट्टे नसतात. (५) मंगोलियात अल्ताई पर्वताच्या पूर्वेस असलेल्या रुक्ष प्रदेशात आणि गोबी वाळवंटात राहणारे कुलान गाढव. याचे शास्त्रीय नाव ईक्‍वस हेमिओनस हेमिओनस आहे. कियांगपेक्षा हे काहीसे लहान असते. हल्ली हा प्राणी मंगोलियातील दुर्गम प्रदेशातच फक्त आढळतो.

गाढव

भारतीय उपजाती : वरील पाच उपजातीं पैकी भारतीय उपजातीचे थोडे जास्त वर्णन पुढे दिले आहे. भारतीय रानटी गाढव (ईक्‍वस  हेमिओनस खर) हा एक देखणा प्राणी असून कच्छच्या छोट्या रणात आणि लडाखमध्ये आढळतो. खांद्यापाशी उंची  o·९३-१·२o मी. असते रंग पिवळसर राखी आसतो खांदा, पाठीवरील बैठकीची जागा आणि ढुंगणापर्यंत दोन्ही बाजू फिक्कट पिंगट रंगाच्या असतात कान झीब्ऱ्याच्या कानासारखेच आखूड असतात. पाळीव गाढवाच्या आवाजापेक्षा याचा आवाज जास्त कर्कश असतो. याचा धावण्याचा वेग ताशी सु. ५० किमी. असतो. प्रजोत्पादनाचा काळ ऑगस्ट ते ऑक्टोबर असतो. गर्भावधी अकरा महिन्यांचा असून पिल्ले पुढील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमध्ये जन्मतात. मादीला एका खेपेस एकच पिल्लू होते. कच्छच्या छोट्या रणात बरीच गवताळ क्षेत्रे आहेत. गवताळ क्षेत्राला बेट म्हणतात. या बेटांवर हे प्राणी रात्री चरत असतात. काही बेटांवर पाणी व गवत कायमचे आसते. उन्हाळ्यात इतर बेटांवरचे गवत वाळल्यावर ही  गाढवे अशा बेटांवर चरण्यासाठी जातात. यांचे १o–३० गाढवांचे कळप दिवसभर वाळवंटात भटकत असतात. कधीकधी ती एकेकटीही भटकतात.

सर्वसाधारणपणे रानटी गाढवाच्या शरीराची (डोक्यासकट) लांबी २-२·२ मी. सते शेपटी ४२·५ सेंमी. लांब असते खांद्यापाशी  उंची ०·९-१·५ मी. आणि वजन सु. २६o किग्रॅ. असते. गाढवांचे रंग विविध असतात परंतु सामान्यत:  नाक, पोट व कडेचा (बाजूचा) रंग फिका असतो. केसांचे आवरण जाड व हिवाळ्यात करड्या रंगाचे आणि उन्हाळ्यात उजळ व तांबूस किंवा तपकिरी रंगाचे असते. कान लांब आसतात. शेपटीच्या टोकाकडे लांब केसांचा झुबका आसतो. आयाळ ताठ व आखूड केसांची असून असम असते. पाऊल लहान असते. गाढवे एकेकटीच हिंडतात किंवा त्यांचे अगदी लहान कळप असतात. मंगोलियात ती बहुधा गॅझेलांच्या संगतीने असतात. प्रजोत्पादनाच्या काळात कळप फुटतात. मादीचा ऋतुकाल पाच दिवस राहतो व दर २१ दिवसांनी  त्याची पुनरावृत्ती होते. मैथुन वसंत ऋतूत होते. ३४८–३७७ दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एकच पिल्‍लू होते. शिंगरू सहा महिनेपर्यंत स्तनपान करते. दुधामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून दुग्घ प्रथिनाचे (केसिनांचे) प्रमाण कमी असते. गाढवीला एका वर्षात यौवनदशा प्राप्त होते. गाढव सु. २५–४६ वर्षे जगते.


पाळीव गाढवे : नुतन अश्मयुगात म्हणजे १२,००० वर्षांपूर्वी गाढव माणसाळविले गेले असावे असा तर्क आहे. खि. पू. ३००० वर्षांपासून ईजिप्शियन लोक ओझी वाहण्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर पाळीव गाढवांचा उपयोग करीत आहेत. स्वारीकरिताही  त्यांचा उपयोग केला जातो. येशू ख्रिस्त गाढवावर बसूनच जेरूसलेममध्ये गेल्याची नोंद आहे. इंग्‍लंडमध्ये पहिल्या एलिझाबेथ राणीच्या वेळी आणि अमेरिकेत १४९३ मध्ये कोलंबस यांच्या दुसऱ्या पर्यटनाच्या वेळी त्या देशात गाढव नेण्यात आले. भारतातही प्राचीन वेदवाङ्‍मयात गर्दभ, रासभ, खर वगैरे नावांनी गाढवांचा उल्लेख केलेला आढळतो. उज्‍जैन (उज्‍जयिनी) येथे भरणारा गाढवांचा बाजार विक्रमादित्य काळापासून (दोन हजार वर्षांपासून) भरत असावा असा अंदाज आहे. गाढवाचा शिक्का असलेली त्या काळची काही नाणी उत्खननात सापडली आहेत.

पाळीव गाढवाची खांद्यापाशी सरासरी उंची सु. ०·९० मी. असून रंग मळकट करडा किंवा मळकट तपकिरी असतो. कान लांब असतात. भारतात पाळीव गाढवांचे दोन प्रकार आढळतात. एक लहान करडे गाढव व दुसरे मोठे पांढरे गाढव. पहिल्या प्रकारचे गाढव गडद करड्या रंगाचे असून भारताच्या बहुतेक भागांत आढळते  दुसऱ्या प्रकारचे गाढव सामान्यत:  कच्छमध्ये आढळते आणि त्याचा रंग अगादी फिक्कट करड्यापासून तो पांढऱ्यापर्यंत असतो. पहिल्या प्रकाराची सरासरी उंची ०·८१ मी. तर दुसऱ्याची ०·९३ मी. असते. रानटी  गाढवे पाळीव गाढवांत केव्हाही मिसळत नाहीत आणि या दोहोंत अंतराभिजनन (आपापसात प्रजनन) कधीही होत नाही. पाळीव गाढवांच्या प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो.

पाळीव गाढवे मुख्यत: ओझी वाहण्याकरिता उपयोगी पडतात. ती दृढपाद असून त्यांच्या अंगी असलेल्या काटकपणा, चिकाटी आणि सहनशीलता या गुणांमुळे उपयुक्त ठरलेली आहेत. सपाट अथवा डोंगराळ प्रदेशातून किंवा पर्वतावरील कठीण मार्गांवरून दूर अंतरावर जड ओझी वाहून नेण्याच्या कामी त्यांचा फार उपयोग होतो. घोडे नसणाऱ्या देशांत किंवा ज्या देशातील लोकांना गरिबीमुळे घोड्यांचा वापर करणे परवडत नाही अशा देशांत ओझी नेण्याकरिता व स्वारीकरिता गाढवांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. भर उन्हात व प्रतिकूल परिस्थितीतदेखील ती कणखरपणे काम करतात. पण त्यांच्या शक्तिबाहेर जर त्यांच्यावर काम लादले गेले, तर ती ते नीट करीत नाहीत किंवा काम न करता स्वस्थ उभी राहतात. क्रूर वागणुकीचा ती प्रतिकार करतात. त्यांच्या अशा वागणुकीवरून ती निर्बुद्ध व हेकट असतात असा समज रूढ झालेला आहे. गाढवाच्या स्वभावविषयक कित्येक म्हणी रूढ झालेल्या आहेत.

गाढवांना सुस्थितीत ठेवण्याकरिता विशेष श्रम पडत नाहीत अगर खर्चही फार येत नाही. चरबट व थोड्या अन्नावर ती तग धरून काम करू शकतात. बऱ्याच काळपर्यंत ती पाण्याशिवायही राहू शकतात.

इ. स. १९६१ मध्ये भारतात गाढवांची एकूण संख्या १०,९६,३०० होती. १९५६ सालापेक्षा ही संख्या ३.८ टक्क्यांनी वाढलेली होती. भारतात पाळीव गाढवांची सगळ्यात जास्त संख्या राजस्थानमध्ये आहे. त्याच्या खालोखाल उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि तमिळनाडूचा क्रम लागतो. केरळ व पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या तुलनेने फारच थोडी आहे.

गाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला ‘खेचर’ म्हणतात आणि घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्याला ‘हिनी’ म्हणतात. हिनी खेचरापेक्षा लहान व निकृष्ट प्रतीचा असतो. गाढवाच्या रोगांसंबंधीच्या माहितीसाठी  घोडा ही नोंद पहावी, कारण गाढव व घोडा यांचे रोग एकच आहेत.

पहा : खेचर घोडा.

संदर्भ :  1. CSIR, The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, Supplement, Livestock, New Delhi,

1970.

2. Walker, E. P. Mammals of The World, Vol. II, Baltimore, 1964.

गद्रे, य. त्र्यं.