गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी १८७६–२० डिंसेंबर १९५६). एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.
लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.
स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.
संदर्भ : कवडे, पां. बा. श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र, पंढरपूर, १९३९.
फरांडे, वि. दा.
“