गाझा : पॅलेस्टाइन भागातील एक प्राचीन शहर. हे भूमध्य समुद्रकिनाऱ्यापासून ५ किमी. पूर्वेस आणि तेल आवीव्हच्या ६४ किमी. नैर्ऋत्येस आहे. इ.स.पू. १४६८ मध्ये ईजिप्तच्या राजाने येथे आपला बालेकिल्ला उभारल्याचा दाखला मिळतो. ईजिप्तमधून अरबस्तानात जाणाऱ्या मार्गावरील हे महत्त्वाचे नाके असल्याने गाझाला मोठा इतिहास आहे अनेक संस्कृतींची स्थित्यंतरे गाझाने अनुभवली आहेत. सॅम्सनचा मृत्यू येथेच घडला. मुहंमद पैगंबरांच्या पणजोबांना येथेच पुरण्यात आले, तर इस्लामी शाफी पंथाचा निर्माता अल् शाफी (७६७-८२०) याचा जन्म येथे झाला. सोळाव्या शतकात हे शहर ऑटोमन तुर्कांकडे आले. फ्रेंच, ईजिप्शियन, तुर्क यांच्याकडून १९१७ साली ते ब्रिटिश संरक्षणाखाली आले. १९४८ साली संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनची फाळणी केली तीनुसार पॅलेस्टाइन प्रदेशाचा गाझा आणि त्याभोवतालचा प्रदेश अरबांच्या वाटणीस आला. अरब-इझ्राएली संघर्षात गाझा पट्टीला खूपच महत्त्व आले. १९४९ च्या इझ्राएल-ईजिप्त करारान्वये गाझा ईजिप्तला मिळाले पण १९५६ साली इझ्राएलने हल्ला केल्याने या भागात अशांतता निर्माण झाली. काही दिवस येथे संयुक्त राष्ट्रांनी आपली फौज ठेवून दोन्हीकडील कुरबुरी थांबविल्या होत्या. फौजा गेल्यानंतर पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या आणि १९६७च्या सहा दिवसांच्या युद्धात गाझा व त्याभोवतालचा प्रदेश इझ्राएलने जिंकून घेतला. ४० किमी. लांब व ६ ते ८ किमी. रुंदीच्या गाझा पट्टीत १९७१ साली ३,६५,००० लोक राहत होते.

शाह, र. रू.