गांधी, इंदिरा : (१९ नोव्हेंबर १९१७– ). भारताच्या पहिल्या लोकप्रिय स्त्रीपंतप्रधान. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर जानेवारी १९६६ मध्ये त्यांची भारताचे तिसरे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
त्यांचा जन्म अलाहाबादच्या नेहरू या प्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात झाला. आजोबा पं. मोतीलाल व पिता पं. जवाहरलाल आणि माता सौ. कमला हे सारे कुटुंबच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य कुटुंब होते. साहजिकच आजोबा, वडील यांबरोबरच आई कमला, आत्या विजयालक्ष्मी व कृष्णा हाथिसिंग ह्या सर्वच चळवळींत पडल्या होत्या. बालपणापासूनच त्यांना क्रियाशील राजकारणाचे धडे घरी मिळू लागले.
प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुणे, मुंबई, रवींद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन, समरव्हील महाविद्यालय (ऑक्सफर्ड), स्वित्झर्लंड वगैरे ठिकाणी ठेवण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षण कौटुंबिक अस्थिरता, तंग जागतिक वातावरण व राजकीय चळवळ यांमुळे इंदिरा पूर्ण करू शकल्या नाहीत. तरीसुद्धा विद्वान पित्याच्या तसेच त्यांच्या सान्निध्यातील इतर विद्वान व्यक्तींच्या सहवासामुळे त्यांना पारंपरिक शिक्षणापेक्षाही विविध विषयांचे ज्ञान मिळविण्याची संधी मिळाली. याशिवाय त्यांनी विविध देशांना कधी आजोबांबरोबर, तर कधी वडिलांबरोबर भेटी दिल्या. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक व राजकीय समस्यांचे ज्ञान प्राप्त झाले.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी चरखा संघ व लहान मुलामुलींची वानरसेना स्थापन केली आणि महात्मा
गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीस मदत केली. त्या वेळी वानरसेनेची सभासद संख्या सु. ६०,००० होती. त्यांच्या या सेनेचे फार कौतुक झाले. त्यांना काँग्रेसचे सभासदत्व १९३८ पर्यंत अधिकृत रीत्या मिळाले नाही कारण अठरा वर्षे ही सभासदत्वाची किमान वयोमर्यादा असे. तरीही त्या चळवळीत सहभागी झाल्या. ऑक्सफर्डमध्ये असताना त्यांनी व्ही. के. कृष्ण मेनन यांच्याबरोबर इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा पुरस्कार केला. या सुमारास फिरोझ गांधी या ऑक्सफर्डमधील एका पारशी तरुणाशी त्यांची ओळख व मैत्री झाली. १९४२ मध्ये मैत्रीची विवाहात परिणती झाली. दोघांनीही छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. तेव्हा त्यांना अटक झाली पण काही दिवसांतच सोडण्यात आले. लग्नानंतर त्यांनी लखनौ येथे राहण्याचे ठरविले. फिरोझ गांधी नॅशनल हेरल्ड या नेहरूंनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे संपादक झाले. लखनौला काही दिवस राहून त्या प्रसूतीकरिता १९४४ मध्ये आत्या कृष्णा हाथिसिंग यांच्याकडे मुंबईस आल्या राजीव या मुलाचा जन्म झाला. काही वर्षांनी संजीव हा त्यांना दुसरा मुलगा झाला. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर जातीयवादाने सर्वत्र थैमान घातले. त्या वेळी दिल्लीच्या दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. इंदिराजींनी यापुढे आपल्या वयोवृद्ध वडिलांजवळ राहून त्यांची सेवा करण्याचे ठरविले. फिरोझ गांधीही दिल्लीस राहण्यास आले व पुढे ते लोकसभेचे सभासद झाले. इंदिरा गांधींची १९५० ते १९५९ ही वर्षे जवाहरलालांचा स्वीय साहाय्यक, एतद्देशीय व परकीय पाहुण्यांचे स्वागत करणे, तसेच वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाहणे या कामांत गेली. त्या काळात त्यांनी नेहरूंबरोबर अनेक देशांचे अधिकृत रीत्या दौरे केले त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय राजकारणातील मातब्बर व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची त्यांना संधी लाभली. आफ्रिका व रशिया यांचा सदिच्छा दौरा त्यांनी केला. त्या काँग्रेस कार्यकारिणीच्या १९५५ मध्ये सदस्या तसेच स्त्रियांच्या समितीच्या अध्यक्षा झाल्या. थोड्याच काळात त्या मध्यवर्ती निवडणूक मंडळ व मध्यवर्ती संसदीय मंडळ यांच्या सदस्या झाल्या. यांशिवाय त्यांनी यूनेस्को कार्यकारिणी, शैक्षणिक मंडळ, शिशुकल्याण वगैरे अनेक मंडळांवर व समित्यांवर सभासद म्हणून काम केले.
नेहरूंच्या मृत्यूनंतर १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्या वेळी इंदिराजींना परराष्ट्रीय खाते घेण्याविषयी विनंती करण्यात आली. परंतु एकूण कोणतीही अधिकाराची वा पदाची जागा घेण्याच्या मनःस्थितीत आपण नाही, असे त्यांनी सांगितले. तरीसुद्धा माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. एकदीड वर्षात त्यांनी भारतीय नभोवाणी खात्यात अनेक मौलिक सुधारणा केल्या आणि अद्ययावत उपकरणांनी नभोवाणी खाते सुसज्जही केले. भारतात प्रथम दिल्लीमध्ये दूरचित्रवाणीची सुरुवात केली. त्यांनी अधिकृत रीत्या ग्रेट ब्रिटन, यूगोस्लाव्हिया, रशिया वगैरे देशांना भेटी दिल्या तसेच तिसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सव समितीचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रकुल परिषदेस त्या हजर राहिल्या. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी संरक्षणाच्या निरनिराळ्या समित्यांवर त्यांनी काम केले. प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन जवानांची विचारपूस केली. नाटक अकादमीच्याही त्या अध्यक्षा झाल्या. भारतीय व परदेशीय विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी बहाल करून त्यांचा बहुमान केला. याशिवाय त्या वर्षी मदर्स ॲवॉर्ड, इझाबेला डीएस्टे इ. मानपदे तसेच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला (१९७२).
लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर १९६६ मध्ये इंदिरा गांधींची संसदेच्या नेतेपदी काँग्रेसमधील बऱ्याच अंतर्गत वादंगानंतर निवड झाली. या वेळीच काँग्रेसमधील दोन विरुद्ध गटांची सस्सीखेच त्यांच्या लक्षात आली. जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री या दोन थोर नेत्यांमागून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. नेहरूंची परंपरा नि लोकप्रियता इंदिराजींच्या मागे होती. या सुमारास काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह चालू होते. ताश्कंद करार भारतीय जनतेस आणि विरोधी पक्षांना मान्य नव्हता नव्हे, ती भारताची मानहानी आहे असे वाटत होते. त्याचे पालन करण्याची नैतिक जबाबदारी शिरावर घेऊन या बिकट प्रसंगी इतर अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावयाचे होते. या सर्व परिस्थितीत त्या धैर्याने टिकून राहिल्या. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला संसदेत पुन्हा बहुमत मिळाले आणि त्यांचीच बहुमताने पंतप्रधान म्हणून निवड झाली. १९६७ मध्ये आठ राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभव जुन्या नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे झाला, असे काँग्रेसची डाव्या मताची मंडळी म्हणू लागली. त्यामुळे काँग्रेसांतर्गत दुही वाढतच होती. बंगलोर येथील १९६९ च्या श्रेष्ठींच्या परिषदेत राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवारीवरून तिला तोंड फुटले. काँग्रेसच्याअधिकृत उमेदवाराविरुद्ध गिरींनी स्वतंत्र म्हणून निवडणूक लढविली. इंदिराजींनी त्यांना पाठिंबा दिला आणि गिरी निवडून आले. काँग्रेसमधील दुफळी अटळ होती, ती झाली आणि इंदिराविरोधी लोकांना मंत्रिमंडळातून जावे लागले. अखेर नवकाँग्रेसचे मंत्रिमंडळ द्रविड मुन्नेत्र कळघमच्या आधाराने सत्तेवर टिकून होते. ही लवचिक परिस्थिती बरी नाही, म्हणून गरिबी हटावची घोषणा नवकाँग्रेसतर्फेदेऊन इंदिराजींनी १९७१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या.काँग्रेसला तीन चतुर्थांश बहुमत मिळाले व त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. या अवधीत त्यांनी दहा मुद्यांच्या कार्यक्रमानुसार अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली. तत्पूर्वी भारतातील १४ महत्त्वाच्या बँकांचे राष्ट्राध्यक्षांच्या वटहुकमाने राष्ट्रीयीकरण करून समाजवादाची आपली भूमिका जनतेसमोर ठामपणे मांडली. याच धोरणानुसार भारतातील राजेरजवाड्यांचे तनखे बंद केले आणि लघुउद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याकरिता अनेक लहानसहान योजना त्यांनी संसदेत मंजूर करून घेतल्या.
१९७१ च्या सुरुवातीस पूर्व व पश्चिम पाकिस्तान यांत यादवी युद्धास प्रारंभ झाला. पूर्व पाकिस्तानातून सु. एक कोटी निर्वासित भारतात आले. निर्वासितांचा प्रश्न व पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर होणारे अमानुष अत्याचार या अन्यायांविरुद्ध आंतरराष्ट्रीय मत अजमाविण्यासाठी त्यांनी जगातील महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या आणि भारताची धर्मनिरपेक्ष व शांतताप्रिय भूमिका स्पष्ट केली. भारताला युद्धाव्यतिरिक्त पर्याय उरला नाही इंदिराजींनी रशियाबरोबर मैत्रीचा करार केला. पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ रोजी भारताविरुद्ध युद्धाची घोषणा करून भारतावर आक्रमण केले. भरातीय फौजांनी मुक्तिवाहिनीच्या मदतीने १४ दिवसांचे युद्ध करून पाकिस्तानचा पराभव केला. डाक्का १४ दिवसांनी पडले आणि भारताने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. सु. ९५ हजार पाकिस्तानी सैन्य युद्धबंदी झाले. भारताने स्वतंत्र बांगला देशाला प्रथम मान्यता दिली. भारताने बांगला देशाशी मैत्रीचा करार केला. १९७२ च्या राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवकाँग्रेसला पुन्हा भरघोस यश मिळाले. मात्र पाकिस्तानात आमूलाग्र बदल झाले. याह्याखान जाऊन भुट्टो अध्यक्ष झाले. भुट्टोंबरोबर इंदिराजींनी सिमला येथे जुलै १९७२ मध्ये करार केला आणि दोन्ही देशांनी सर्व प्रश्न सलोख्याने सोडवावेत असे ठरले. इंदिराजींनी विजयी राष्ट्राची ताठर भूमिका सिमला कराराच्या वेळी कधीही अवलंबिली नाही. युद्ध, अवर्षण, पूर आदी आपत्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना तोंड देण्यासाठी त्या नवनवीन योजना शोधून काढीत आहेत. कमाल जमीनधारणा व शहरी संपत्तीवर मर्यादा, यांचा त्या अलीकडे पुरस्कार करीत आहेत. गरिबी हटावच्या धोरणाने बहुसंख्य गरिबांना अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गोष्टी तरी मिळतील, या दृष्टीने त्या प्रयत्नशीलआहेत.
इंदिरा गांधींच्या आगमनानंतर भारतीय राजकारणातील शिथिलता जाऊन त्यात गतिमानता आली आहे. त्याकरिता पक्षशिस्तीची मर्यादा राष्ट्रपती गिरी यांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना उल्लंघावी लागली. काँग्रेसची पुनर्घटना जुन्या पक्षसंघटनेचे जूं झुगारून त्यांना करावी लागली. पाक-भारत संघर्षाच्या प्रारंभी त्यांनी रशियाशी मैत्रीचा करार करून भारत- पाक संघर्षात परकीय राष्ट्रांचा हस्तक्षेप कुशलतेने टाळला. परंतु यामुळे भारताच्या अंतर्गत राजकारणावर रशियाचा प्रभाव वाढला, अशी टीका साहजिकच होऊ लागली. ही टीका अवास्तव आहे, असे इंदिराजींचे म्हणणे आहे. बांगला देशाच्या निर्मितीनंतर भारताची प्रतिष्ठा व वर्चस्व आशियाई देशांत वाढले आहे, ते इंदिराजींमुळेच, हे त्यांच्या टीकाकारांनाही मान्य आहे.
संदर्भ : 1. Drieberg, Trevor, Indira Gandhi – A Profile in Courage, New Delhi, 1972.
2. Hutheesing, Krishna Nehru, Dear to Behold, London, 1969.
3. Hutheesing, Krishna Nehru, We Nehrus, Bombay, 1967.
4. Nair, Kuldip, India After Nehru, Bombay, 1975.
5. Sahni, N. C. Indira – A Study, Delhi, 1967.
६. बुद्धिसागर, शांता, पंतप्रधान इंदिरा गांधी, पुणे, १९७२.
देशपांडे, सु. र.
“