गॅस्ट्रोपोडा : मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघाचा व गोगलगाय, कवडी, शंख इ. प्राण्यांचा वर्ग. अग्रभागी असणारे डोके व अधरभागी असणारा लांबट पाय हे यांच्या शरीराचे ठळक भाग होत व ते द्विपार्श्व सममित (फक्त एकाच पातळीने विभागून शरीराचे दोन समान भाग होणारे) असतात. यांचा आंतरांग (शरीराच्या विविध गुहांमध्ये म्हणजे पोकळ्यांमध्ये असणाऱ्या इंद्रियांचा) पुंज सामान्यतः एका कवचात सामावलेला असतो आणि  आंतरांग पुंज व कवच ही सामान्यतः मळसूत्राप्रमाणे सर्पिल (वेटोळी असलेली) व असममित (विभाजनाने दोन सारखे भाग न पडणारी) असतात. कवच एकाच पुटाचे असते. त्याच्यात कोष्ठ नसतात. गॅस्ट्रोपॉडांच्या शरीरातील पचनमार्ग, गुद, हृदय, क्लोम (कल्ले) व वृक्क (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारे इंद्रिय) व काही तंत्रिका (मज्‍जा) ही १८० अंशांइतकी फिरविली गेलेली आढळतात (आ. २) आणि प्रत्येक बाजूला एकेक अशा प्रकारे जोडीने असणाऱ्या इंद्रियांपैकी एका बाजूची काही इंद्रिये नष्ट झालेली असतात. गॅस्ट्रोपॉडांना सामान्यतः एक कवच असते. कवचाचे अनेक प्रकार आहेत (आ. ५). बहुतेक सर्व गॅस्ट्रोपॉडांना आपली शरीरे कवचात आखडून घेता येतात. कित्येक गॅस्ट्रोपॉडांच्या पायाच्या पश्च टोकाजवळच्या उत्तर भागात एक कॅल्शियममय किंवा शृंगमय पदार्थाचा (केराटीन नावाच्या प्रथिनाचा) पत्रा असतो व त्याची मांडणी अशी असते की, प्राणी कवचात शिरला की, त्या पत्र्याने कवचाचे द्वारक (तोंड) बंद होते. त्या पत्र्याला प्रच्छद म्हणतात. गॅस्ट्रोपॉडांच्या मऊ शरीरांचे अनेक प्रकार आढळतात. त्या प्रकारांस अनुसरून त्यांचे तीन प्रमुख गट (गण किंवा काहींच्या मते उपवर्ग) केले जातात.

प्रोसोब्रँकिया किंवा स्ट्रेप्टोन्यूरा : या गणात मुख्यतः सागरात व काही थोड्या जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या कुलांचा समावेश होतो. यांच्या आंतरांग पुंजाच्या तंत्रिका-रज्‍जूला (मज्‍जारज्‍जूला) तिढा पडून तिला इंग्रजी आठाच्या आकारासारखा आकार (8) आलेला असतो (आ. २). यांना सामान्यतः एकच क्लोम असतो व तो बहुधा हृदयाच्या अग्राच्या पुढील भागात असतो. प्रावार गुहेचे (त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीने वेढलेल्या पोकळीचे) द्वार अग्रदिशेस असते. नर व माद्या निरनिराळ्या असतात. बहुतेकांना प्रच्छद असतात. प्रोसोब्रँकियांचे दोन उपगण आहेत.

(१)ॲस्पिडोब्रँकिया उपगण: याच्यात अधिक आदिम (आद्य) व मूळच्या सममितीची चिन्हे दर्शविणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. त्यांना दोन वृक्क, दोन अलिंद (हृदयाचे अग्र कोष्ठ) व काही थोड्यांना दोन क्लोमही असतात. क्लोम पिसासारखे व तंतूंच्या दोन रांगा असलेले असे असतात. लिंपेट, फिशुरेला, हॅलिओटिस, क्रेपिड् युला, लिटोरिना, स्ट्राँबस, टर्बो, ट्रॉकस  इ. समुद्रातील वंशांचा आणि नेरिटिना  या गोड्या पाण्यातील वंशाचा या उपगणात समावेश होतो.

(२) पेक्टिनीब्रँकिया उपगण : यांचे क्लोम तंतूंच्या एकाच रांगेचे असतात. द्विपार्श्व सममितीचे चिन्हही नसते. एकच क्लोम, एक अलिंद व एक वृक्क ही असतात. या उपगणातील वंशांची उदाहरणे पुढील होत: कवडी (सायप्रिया), म्युरेक्स, बक्सिनम्, कोनस, टरिटेला, यूरोसाल्पिंक्स हे समुद्रातील व पॅल्यूडिना किंवा व्हिव्हिपॅरस हे गोड्या पाण्यातील वंश. याच उपगणात हेटेरोपॉड नावाच्या एका असामान्य प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होतो. महासागराच्या पाण्याच्या पृष्ठाजवळच्या भागात तरंगत राहण्यास अनुकूल अशी यांची शरीरे असतात. पाय दोन बाजूंनी दाबला जाऊन उभ्या पंख्यासारखा व्हावा तसा असतो. हेटेरोपॉडांचे शंख बारीक (३ सेंमी. पर्यंतच्या व्यासाचे) किंवा अगदी सूक्ष्म असतात. महासागरांच्या पृष्ठाजवळच्या पाण्यात असंख्य हेटेरोपॉड असतात. ते मेल्यावर त्यांची कवचे महासागरांच्या तळाशी साचणाऱ्याग्‍लोबिजेरीनाऊझेत (मऊ चिखलात) मिसळून जातात. हेटेरोपॉडांच्या सु. साठ विद्यमान जाती आढळलेल्या आहेत.

ओपिस्थोब्रँकिया : या गणातील प्राण्यांचा आंतरांग पुंज तिढा उलगडून साधा झालेला असतो व तंत्रिका तंत्र (मज्‍जासंस्था) साध्या कड्यासारखे असते. क्लोम एकच असतो किंवा नसतो, असला तर हृदयाच्या पाठीमागे असतो. अलिंद एक व तो निलयाच्या (हृदयाच्या मुख्य संकोचशील कोष्ठाच्या) मागे असतो. वृक्क सामान्यतः एकच असते. प्रावार गुहेचे द्वार पश्च (मागच्या) दिशेस असते. बहुतेकांस प्रच्छद असतो व बहुतेक उभयलिंगी व सागरात राहणारे असतात. याचे पुढील दोन उपगण आहेत.

(१)न्यूडिब्रँकिया :(सागरी पिकळी). प्रौढावस्थेत कवच व खरे क्लोम नसतात. श्वसन त्वचेच्या द्वारे किंवा गुदाभोवती किंवा पाठीवर किंवा पार्श्वीय कडांवर असणाऱ्या गौण क्लोमांकडून घडून येते. उदा., डोरिस वंश [→ न्यूडिब्रँकिया].

(२)टेक्टिब्रँकिया : सामान्यतः यांना प्रावार (कवचाच्या लगेच खाली असणारी त्वचेची बाहेरची मऊ घडी), कवच व एक खरा क्लोम ही असतात. कवच पातळ असते व ते प्रावाराच्या व पायाच्या घड्यांत बसविलेले असते. उदा., वंश : ॲक्टियॉन, ब्युलॅरियाॲप्लीसिया (सागर-ससा). ॲप्लीसियाची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. त्याचे कवच आंतरिक व अवशेषी (लहान आणि अपूर्ण वाढ झालेले) असते. टेरोपोडा (पक्षपाद) हा टेक्टिब्रँकियांपैकी असामान्य प्राण्यांचा गट आहे. महासागरांच्या पृष्ठाजवळील पाण्यात ते राहतात. यांच्या पायाच्या कडा प्रसरण पावून अग्रभागी दोन पार्श्वीय (बाजूंवर असलेले) पंख तयार झालेले असतात. डोके स्पष्ट नसते. आकारमान बारीक व कवच सूक्ष्म, शंकूसारखे, पंचपात्रासारखे किंवा सर्पिल असते. उष्ण व उप-उष्ण कटिबंधांतील महासागरांच्या पृष्ठालगतच्या प्लवक म्हणजे तरंगत असलेल्या जीवांत असंख्य टेरोपॉड असतात व त्यांच्या सु. १६० विद्यमान जाती आहेत. प्राणी मेल्यावर त्यांची कवचे पाण्याच्या तळाशी साचतात. ज्यांच्यात टेरोपॉडांची विपुल कवचे असतात असे टेरोपॉड ऊझ नावाचे निक्षेप (साठे) मध्यम खोलीच्या महासागरांच्या तळाशी आढळतात.

आ. १. गॅस्ट्रोपॉडांचे काही प्रकार : (१) जमिनीवरील गोगलगाय, (२) न्यूडिब्रँक, (३) पिकळी : (अ) श्वसन रंध्र, (४) फिशुरेला, (५) टेरोपॉड (वंश क्लिओ), (६) हेटेरोपॉड (वंश ॲटलांटा).

आ. २. गॅस्ट्रोपॉडांची प्रावार गुहा व तिच्याशी संबंध असणार्‍या रचनांच्या विस्थापनांचे आरेखी निरूपण: (अ) जवळजवळ सममित व्यवस्था (आ, इ, ई) प्रावार गुहेचे उजव्या बाजूकडे व पुढच्या बाजूकडे होणारे विस्थापन (उ) गुदद्वार व (मूळ) उजवा कंकतक्लोम यांनी मध्यरेषा ओलांडल्याचे दर्शविले आहे. (१) मुख, (२) प्रमस्तिष्क गुच्छिका, (३) पार्श्व गुच्छिका, (४) पाद गुच्छिका, (५) महाधमनी, (६) उजवा कंकतक्लोम, (७) वृक्कीय छिद्रे, (८) डावा कंकतक्लोम, (९) गुदद्वार, (१०) डावी भित्तीय गुच्छिका, (११) डावी फुप्फुसपार्श्व संयोजनी, (१२) प्रावार, (१३) उजवी फुप्फुसपार्श्व संयोजनी, (१४) फुप्फुसपार्श्व संयोजनी, (१५) आंतरांग परिमोजी, (१६) मूळ डावी पण आता स्थलाकृतिक उजवी भित्तीय गुच्छिका (अध: - आंत्र भित्तीय गुच्छिका).

पल्मोनेटा : या गणात जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायींचा समावेश होतो. यांचे आकारमान बहुधा लहान आणि कवच सर्पिल व साधे असते. प्रौढ प्राण्यांना सामान्यतः प्रच्छद नसतो. काही वंशांतल्या प्राण्यांना कवच नसते. डोक्यावर संस्पर्शकांच्या (संवेदनशील अंगांच्या) एक किंवा दोन जोड्या व डोळ्यांची एक जोडी असते. यांना क्लोम नसतात. प्रावार गुहेचे परिवर्तन होऊन तिचा फुप्फुसकोश झालेला असतो. प्रावार गुहा अग्रभागात असते. आंतरांग पुंजाच्या तंत्रिका-रज्‍जूला तिढा नसून तो साध्या कड्यासारखा असतो. सर्व उभयलिंगी (द्विलिंगी) व बहुतेक सर्व अंडज (अंड्यापासून जन्मणारे) असतात. जमिनीवरील वंशाचे उदाहरण :  हीलिक्स गोड्या पाण्यातील वंशांची उदाहरणे : लिम्निया, प्लॅनॉर्बिस.


जमिनीवरील पिकळ्या (स्लग्ज): यांना कवच नसते किंवा आंतरिक, अवशेषी कवच असते.

बहुसंख्य सागरी गोगलगायी विपुल अंडी घालतात. अंड्याचा विकास होऊन पटिका डिंभावस्थेतून [→ डिंभ] गेल्यावर प्रौढ प्राणी तयार होतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणारे बहुतेक पल्मोनेटा अंडी घालतात व अंड्यापासून प्रौढ प्राणी सरळ तयार होतात.

पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६०–२४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) सुरुवातीपासून पृथ्वीवरील समुद्रात गॅस्ट्रोपॉड रहात आलेले आहेत. प्रारंभी त्यांचे प्रकार व संख्या ही अल्प होती पण ती हळूहळू वाढत गेली व आजच्या मॉलस्कांत गॅस्ट्रोपॉड हे प्रमुख झालेले आहेत.

प्रोसोब्रँकिया या गणाच्या २५,००० विद्यमान आणि १०,००० जीवाश्मी (ज्यांचे फक्त दगडासारखे कठीण अवशेष सापडलेले आहेत अशा) जाती आहेत. आयुःकालावधी पूर्व कँब्रियन कल्प (सु. ६० कोटी वर्षांपूर्वी) ते आधुनिक काळ. ओपिस्थोब्रँकिया गणाच्या ३,००० विद्यमान व ३०० जीवाश्मी जाती आहेत. आयुःकालावधी कार्‌बॉनिफेरस कल्प (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वी) ते आधुनिक काळ. पल्मोनेटा गणाच्या ५,००० विद्यमान व १,००० जीवाश्मी जाती आहेत. आयुःकालावधी उत्तर कार्‌बॉनिफेरस कल्प ते आधुनिक काळ.

गॅस्ट्रोपॉडांच्या कवचांचे प्रकार : लिंपेटांचे कवच पोकळ शंकूसारखे असते, पण बहुसंख्य गॅस्ट्रोपॉडांचे कवच अगदी वेगळ्या प्रकारचे, एका टोकाशी निमुळते व बंद असलेल्या व सर्पिल म्हणजे गुंडाळी केलेल्या नळी सारखे असते. नळी गुंडाळली जाऊन तयार झालेले वेढे क्वचित

आ. ३. कवचाचे भाग (फॅसिओलॅरिया) : (१) शिखराग्र, (२) वेढा, (३) सेवनी, (४) आंतर ओष्ठ, (५) बाह्य ओष्ठ, (६) द्वार, (७) कळस.

आ. ४. गॅस्ट्रोपॉडांच्या शंखांची काही वैशिष्ट्ये : (१) ओंफॅलोट्रॉकस (जीवाश्म) (२) नॅटिका (जीवाश्म) : (अ) नाभी (३) दक्षिणावर्त शंख (४) वामावर्त शंख (५) लिपेंट (पटेला) : (आ) पार्श्विय दृश्य (इ) माथ्याकडून दिसणारे दृश्य (६) ट्रायटनाच्या कवचाचा छेद (७) टरिटेला : (ई) प्रच्छद.

कडबोळ्यासारखे एका पातळीत असतात (उदा., प्लॅनॉर्बिस). पण सामान्यतः नळीचे वेढे एका पातळीत नसून मळसूत्राकार असतात. वेढे सामान्यतः अलग नसून एकमेकांस चिकटलेले असतात. शेजारीशेजारी असणाऱ्या दोन वेढ्यांमधील सांध्याच्या रेषेला सेवनी म्हणतात. शेवटचा वेढा वगळून कवचाच्या उरलेल्या भागाला कळस किंवा शिखर आणि कळसाच्या टोकाला शिखराग्र म्हणतात. शेवटचा वेढा पूर्वीच्या वेढ्यांपेक्षा सामान्यतः मोठा असतो व शिखराग्रापासून सर्वांत दूर असणाऱ्या त्याच्या भागाला पाया म्हणतात. शिखरात असणाऱ्या वेढ्यांची एकूण संख्या कमीअधिक असते व शिखरे लांब किंवा आखूड, अरुंद किंवा रुंद व सुळक्यासारखी किंवा चापट शंकूसारखी असतात, म्हणजे कवचाचे शिखरकोण न्यून किंवा अधिक असतात. कवचाची गुंडाळी सामान्यतः दक्षिणावर्त (उजवीकडे वळलेली) असते आणि शिखराग्र सर्वांत दूर असेल अशा रीतीने कवच हातात धरून द्वारक अधर बाजूने पाहिले म्हणजे ते पाहणाऱ्याच्या उजवीकडे येते. काही थोड्या जातींच्या व क्वचित वंशांच्या कवचाची गुंडाळी याच्या उलट म्हणजे वामावर्त (डावीकडे वळलेली) असते. सामान्यतः दक्षिणावर्त असणाऱ्या जातीतील प्राण्यांची कवचे अगदी क्वचित व केवळ नैसर्गिक चमत्कारामुळे वामावर्त असतात (आ. ४).

कित्येक गॅस्ट्रोपॉडांच्या कवचांच्या वेढ्यांच्या आतल्या बाजू एकमेकांस घट्ट चिकटलेल्या असतात. त्यामुळे कवचाच्या मध्याशी शिखराग्रापासून पायापर्यंत जाणारा एक घन दांडा किंवा कणा तयार होतो. त्याला मध्याक्षक म्हणतात. इतर कित्येकांच्या कवचाच्या वेढ्यांच्या आतल्या बाजू एकमेकांस न चिकटता कमीअधिक दूर राहतात. त्यामुळे कवचाच्या मध्याशी एक पोकळी राहते. तिचे द्वार कवचाच्या पायाशी असते. अशा पोकळीला नाभी किंवा केंद्रगर्त म्हणतात. कित्येक कवचांच्या नाभीच्या मुखाजवळचा भाग प्रावाराच्या स्रावाने झालेल्या कॅलस नावाच्या चूर्णमय पदार्थाने अंशतः किंवा पूर्णपणे बुजविला गेलेला असतो.

आ. ५. गॅस्ट्रोपॉडांच्या विविध शंखांचे प्रकार : (१) क्रेपिड्युला (जीवाश्म), (२) लिटोरिना, (३) हॅलिओटिस, (४) ट्रॉकस, (५) टर्बो, (६) कवडी, (७) म्युरेक्स, (८) कोनस (जीवाश्म), (९) फ्यूजिनस, (१०) फायसा (जीवाश्म), (११) प्यूपा, (१२) सागरी कृमिरूप शंख, (१३) लिम्निया.

सामान्यतः कवचाच्या आतली पोकळी मुखापासून शिखराग्रापर्यंत सलग असते. परंतु काही कवचांच्या प्रारंभीच्या भागात अनुप्रस्थ (आडवे) पडदे तयार झालेले आढळतात. त्यांच्यामुळे निर्माण झालेले कोष्ठ रिकामेच राहतात. गोगलगाय चालताना तिचे कवच तिच्या पाठीवर असते व कवचाचे शिखराग्र मागे व वरच्या दिशेस टोक करून असते म्हणून शिखराग्राच्या भागाला पश्च व त्याच्यापासून सर्वांत दूर असणाऱ्या भागाला अग्रभाग म्हणतात.

कवचाच्या द्वारकाचा आकार व आकारमान ही वंशपरत्वे भिन्न असतात. द्वारकाच्या काठाला परितुंड म्हणतात. कित्येक वंशांचे परितुंड अखंड असतात (उदा., नॅटिका). पण इतर कित्येकांच्या परितुंडांच्या अग्रभागात एक खाच किंवा पन्हळासारखा नळ असतो व त्या खाचेत किंवा पन्हळात प्राण्याची अभिवाही (पाणी आत नेणारी) नलिका बसविलेली असते. काही कवचांच्या पश्च काठाशीही एक खाच किंवा पन्हळ असते आणि त्याच्यात अपवाही (पाणी बाहेर नेणारी) नलिका बसविलेली असते. बाह्य ओठ सरळ उभा किंवा आत किंवा बाहेर वळविलेला किंवा पंखासारखा बाहेर वाढलेला व गुळगुळीत किंवा खवले किंवा काटे असलेला अशा अनेक प्रकारचा असतो. कवचाचे द्वारक बंद करून घेणारा जो प्रच्छद कित्येक वंशांत असतो त्याचा आकार, आकारमान व संरचना हीही वंशपरत्वे भिन्नभिन्न असतात.

कवचांचे पृष्ठ गुळगुळीत असते किंवा त्याच्यावर पुटकुळ्या, काटे, वरंबे इ. असतात. आधुनिक शंखांचे पृष्ठ सामान्यतः रंगीत व कित्येकदा विविध रंगांचे ठिपके-पट्टे असलेले असे असते. कवचाच्या पृष्ठभागी एक पातळ, कायटिनमय थर असतो व त्याच्या आत कॅल्शियम कार्बोनेटाचा, सामान्यतः ॲरॅगोनाइटाचा, अधिक जाड असा थर असतो. तो पोर्सलीनसारखा (चिनी मातीसारखा) दिसतो. काही जातींच्या कवचाच्या आतल्या पृष्ठावरचा थर मौक्तिकसम असतो. गॅस्ट्रोपॉडांच्या कवचांच्या आकाराचे अनेक प्रकार आढळतात. कवचाचा आकार, द्वारकाचे स्वरूप इ. लक्षणांचा वंश आणि जाती ओळखण्यासाठी उपयोग होतो.

संदर्भ : 1. Easton, W. H. Invertebrate Palaeontology, New York, 1960.

           2. Morton, J. E. Molluscs, New York, 1963.

केळकर, क. वा.