गॅलियम : धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Ga अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ३१ अणुभार ६९·७२ आवर्त सारणीतील (मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ३ अ. ही एक विरल धातू आहे. वि. गु. ५·९०७ (तापमान २०० से.) वितळबिंदू २९·७५० से. उकळबिंदू २५३५० से. (?) वितळलेली धातू घन झाल्यावर ३ टक्के फुगते म्हणून ती लवचिक भांड्यात ठेवावी लागते. घन धातूची कठिनता १·५-२·५ [मोस मापन पद्धतीने, → कठिनता]. ही चाकूने कापली जाते रंग निळसर करडा नैसर्गिक स्थिर समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ६९ व ७१ संयुजा (संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३ विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १८, ३ पृथ्वीच्या कवचातील प्रमाण सु. ०·००१५%.
इतिहास: आवर्त सारणीची रचना करताना १८७१ साली मेंडेलेव्ह यांना असे दिसून आले की, ॲल्युमिनियमापासून इंडियमापर्यंत मूलद्रव्यांची मालिका केली, तर तीमध्ये एक मूलद्रव्य अज्ञात असावे. त्याचे गुणधर्म ॲल्युमिनियमाशी मिळतेजुळते असतील असे भविष्य त्यांनी वर्तविले होते आणि त्या मूलद्रव्यास ‘एक-ॲल्युमिनियम’ असे नाव तात्पुरते दिले होते. १८७५ मध्ये लकाक द ब्वाबोद्राँ यांनी वर्णपट वैज्ञानिक पद्धतीने हे मूलद्रव्य शोधून काढले व त्यास गॅलियम हे नाव दिले.
उपस्थिती व निष्कर्षण: जस्ताच्या धातुकापासून (कच्च्या स्वरूपातील धातूपासून) जस्त मिळविण्याच्या प्रक्रियांमध्ये जस्त आणि गॅलियम यांच्या संयुगांची मिश्रणे मिळतात, त्याचा उपयोग करून वा ॲल्युमिनियम धातू मिळविण्यासाठी बायर यांच्या पद्धतीने अशुद्ध ॲल्युमिना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत शुद्ध ॲल्युमिना वेगळी केल्यावर राहणाऱ्या शेष विद्रावापासून (यामध्ये ॲल्युमिनियम आणि गॅलियम यांची संयुगे असतात) गॅलियम काढतात.
गुणधर्म : सामान्यतः ॲल्युमिनियमासारखे उभयधर्मी (अम्लीय व क्षारकीय, म्हणजे अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थासारखे, हे दोन्ही गुणधर्म असणारे) दमट हवेत ऑक्सिजनाचा परिणाम होऊन धातूच्या पृष्ठभागावर ऑक्साइडाचा पातळ थर बनतो, पण जास्त विक्रिया होत नाही. अति-उच्च तापमानात तिचे ऑक्सिडीभवन होऊन Ga2.O3 तयार होते. उष्ण नायट्रिक अम्लाचीविक्रिया होऊन Ga(NO3)3 तयार होते. सोडियम व पोटॅशियम हायड्रॉक्साइडांची गॅलियमावर विक्रिया होते तेव्हा त्या त्या धातूची गॅलेटे बनतात आणि हायड्रोजन मुक्त होतो. हॅलोजनांची (क्लोरीन, ब्रोमीन इ. मूलद्रव्यांची) विक्रिया होऊन गॅलियमाची हॅलाइडे तयार होतात. ९००० – १,००० ० से. तापमानात गॅलियमावर अमोनियाची विक्रिया केल्यास गॅलियम नायट्राइड तयार होते.
उपयोग : गॅलियम ही धातू पुष्कळ धातूंशी सहज मिसळते व मिश्रधातू बनतात. परंतु या मिश्रधातूंमुळे मूळ धातूच्या गुणात विशेष सुधारणा होत नाही, शिवाय अशी सुधारणा इतर स्वस्त धातू मिसळूनही करता येते. उच्च तापमानास गॅलियमाच्या संपर्काने बहुतेक सर्व धातू संक्षारण (ऱ्हास) पावतात. या दोषामुळे आणि किंमतीने महाग असल्यामुळे गॅलियम ही धातू प्रयोगशाळेतील कार्याखेरीज इतर ठिकाणी विशेष वापरली जात नाही. तिचे जागतिक वार्षिक उत्पादन शे-दोनशे किग्रॅ. इतकेच आहे. गॅलियमाचे बरेचसे उपयोग प्रायोगिक स्वरूपाचे आहेत. उच्च तापमान मोजणाऱ्या तापमापकातील द्रव म्हणून या धातूचा व फ्रीडेल-क्राफ्ट प्रक्रियेत उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून गॅलियम ट्रायक्लोराइडाचा उपयोग करतात. आर्सेनाइड, फॉस्फाइड, टेल्यूराइड, सेलेनाइड इ. स्वरूपांत अर्धसंवाहक (धातू व विद्युत् निरोधक यांच्या दरम्यान विद्युत् संवाहकता असलेला पदार्थ) म्हणून गॅलियमाचा ट्रँझिस्टर, एकदिशकारक (उलटसुलट दिशेने वाहणाऱ्या म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एकाच दिशेने वाहणाऱ्या प्रवाहात रूपांतर करणारी प्रयुक्ती), प्रकाश उद्गम, ⇨ लेसर वा ⇨ मेसर द्विप्रस्थ (दोन विद्युत् अग्रे असणारी प्रयुक्ती) इ. अनेक इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींमध्ये उपयोग करण्यात येतो.
जमदाडे, ज. वि.
“