गॅलिक अम्ल : एक कार्बनी संयुग रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C7H6O5 संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) C6H2(OH)3 . COOH. यास ३, ४, ५-ट्रायहायड्रॉक्सी बेंझॉइक अम्लअसेही म्हणतात.
वितळबिंदू २२०० से. (या तापमानास अपघटन म्हणजे रेणूचे तुकडे होण्याची क्रिया होते) वि. गु. १.६९४ पाणी व ईथर यांत अल्प विद्राव्य. अल्कोहॉल व ग्लिसरीन यांत विद्राव्य.
ते मायफळात (ओक वृक्षावरील) किंवा काही इतर वनस्पतींच्या (उदा., ऱ्हस सिमिॲलॅटा) मायफळासारख्या गाठीत (चिनी टॅनीन), तसेच डाळिंबाच्या मुळात, ओकाच्या सालीत, दिवी-दिवी या वनस्पतीच्या फळात व चहात स्वतंत्रपणे वा संयुगावस्थेत आढळते आणि त्यांपासून ते वेगळे काढतात. त्याकरिता या वनस्पतिज पदार्थांच्या जलीय विद्रावात ॲस्पर्जिलस नायजर या कवकाचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीचा) समावेश करतात. यापासून निर्माण होणाऱ्या एका एंझाइमाने (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाने) टॅनिनाचे जलीय विच्छेदन होऊन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होऊन) संयुगावस्थेत असलेले गॅलिक अम्ल मुक्त रूपात बाहेर पडते. टॅनिनावर उकळणाऱ्या सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करूनही हे मिळवितात. ३–५, डायब्रोमो ४–हायड्रॉक्सी बेंझॉइक अम्ल, बेरियम हायड्रॉक्साइड व पाणी यांचे मिश्रण १७५० से. ला तापविल्यानेही हे अम्ल बनते.
गॅलिक अम्ल तापविल्याने अपघटन पावते व पायरोगॅलाल (१,२,३-ट्रायहायड्रॉक्सी बेंझीन) व कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो. हे अम्ल क्षपणकारी [→ क्षपण] आहे. फेरिक क्लोराइडावर याची विक्रिया होऊन काळ्या रंगाचा अवक्षेप (न विरघळणारा साका) बनतो.
धातूवर कोरीव काम करण्यासाठी, कातडी कमावण्यासाठी, छपाईत, लिहिण्याच्या शाईत आणि औषधनिर्मितीत (उदा., बिस्मथ सबगॅलेट) याचा उपयोग होतो.
गॅलिक अम्लाच्या एका रेणूतील कार्बॉक्सी गट ( -COOH) व दुसऱ्यातील हायड्रॉक्सी गट (-OH) यांच्या संयोगाने एस्टरे बनतात. त्यांना डेपसाइडे म्हणतात.
देशपांडे, ज. र.
“