ख्मेर, प्रजासत्ताक : पूर्वीचे कंबोडिया. आग्नेय आशियातील एक लोकसत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ १, ८१,००० चौ. किमी. लोकसंख्या ६८,१८,२०० (१९७० अंदाज). याच्या उत्तरेस थायलंड व लाओस, पूर्वेस दक्षिण व्हिएटनाम, दक्षिणेस दक्षिण व्हिएटनाम आणि सयामचे आखात आणि पश्चिमेस सयामचे आखात व थायलंड आहेत. प्नॉमपेन ही राजधानी आणि ख्नेर (कंबोडियन) व फ्रेंच या प्रमुख भाषा आहेत. राज्यकारभारासाठी ख्मेरचे १७ प्रांत केलेले आहेत.
भूवर्णन : ख्मेरच्या मध्यभागी त्याचा सु. ७५% प्रदेश व्यापणारे अत्यंत सखल व सपाट गाळमैदान आहे. त्याचा अत्यंत सौम्य उतार वायव्येकडून आग्नेयीकडे असून ते थायलंडमधील बँकॉकच्या मैदानाशी संबद्ध आहे. त्याच्या मध्यभागी टॉनले सॅप नावाचे विस्तीर्ण परंतु उथळ सरोवर आहे. देशाची जीवनदात्री प्रमुख नदी मेकाँग ही उत्तरेकडून लाओसमधून देशात येते व दक्षिणेकडून दक्षिण व्हिएटनामध्ये जाते. तिचे अरुंद खोरे हा देशातील दुसरा सखल प्रदेश होय. बाकी हा देश बहुतेक सर्व बाजूंनी पर्वतवेष्टित आहे. ख्मेरच्या उत्तरेस त्याच्या व थायलंडच्या सीमेवर सु. ६०० मी. उंचीचा डांग्रेक पर्वत आहे. हा उत्तरेकडे थायलंडच्या कोराट पठाराच्या रूपाने सावकाश उतरता होत गेला आहे, परंतु ख्मेरच्या सीमेवर मात्र तो पूर्वपश्चिम सरळ रेषेत उभा असून दक्षिणेकडे एकदम भिंतीसारखा उभा उतरला आहे. त्याच्या पायथ्याशी लहान लहान टेकड्यांनी युक्त, टेंगणा, वालुकाश्माचा व प्राचीन गाळाचा पठारी प्रदेश असून तो हळूहळू मध्यवर्ती मैदानाशी मिळून गेला आहे. डांग्रेकच्या पूर्वेस लहान टेकड्यांमधून वाट काढून मेकाँग ख्मेरमध्ये येते. तिच्या पूर्वेचा वालुकाश्माचा पठारी प्रदेश हळूहळू व्हिएटनामच्या सरहद्दीपर्यंत चढत जातो. या प्रदेशात बेसाल्टी लाव्हाच्या थराखाली पूर्वीचा स्थलीप्राय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिणेस कार्डमम् पर्वताची रांग वायव्य-आग्नेय दिशेने व किरिरोम आणि एलेफंट पर्वतांच्या रांगा दक्षिणोत्तर गेलेल्या असून त्यांमुळे मध्यवर्ती सखल प्रदेश सयामच्या आखातापासून अलग झाला आहे. या उत्थानजन्य पर्वतप्रदेशाची सर्वसाधारण उंची ९०० मी. असून त्याचा कल नैर्ऋत्येकडे आहे. त्याचे वालुकाश्माचे थर कित्येक ठिकाणी क्षरणाने नाहीसे होऊन तेथील प्राचीन जटिल, वलीकृत खडक उघडे पडले आहेत. हा दक्षिणेकडील अरण्यमय पर्वतप्रदेश अद्याप संपूर्णतः समन्वेषित झालेला नाही. तो किनाऱ्यापासून अंतर्भागात जाण्याच्या मार्गात मोठाच अडथळा आहे. या प्रदेशातील सर्वांत उंच शिखर मौंट आरल १,८१३ मी. उंचीचे आहे. किनारी प्रदेशात अनेक छोटेखानी सखल भाग असून ते दलदलींनी युक्त आहेत. किनारा सपाट असून त्यावर अनेक उपसागर आहेत. ते गाळाने भरलेले असून येथे समुद्र उथळ आहे. काँपाँग सॉम या उपसागरास काँपाँग सॉम ही छोटीशी नदी मिळते.
देशातील प्रमुख नदी मेकाँग ही असून तिने काँपाँग सामच्या उत्तरेकडील विस्तीर्ण बेसाल्टी पठारातून आपला मार्ग काढला आहे. या नदीला उन्हाळ्यात तिबेटच्या पठारावरील बर्फ वितळून व मे ते सप्टेंबरच्या पावसाळ्यात, विशेषतः सप्टेंबरमध्ये, चीनचा युनान प्रांत व लाओसचा डोंगराळ भाग येथे मोसमी वाऱ्यांमुळे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर येतात. त्यामुळे तिच्या काठचा अरुंद सखल प्रदेश अतिशय सुपीक झाला आहे. तिच्या काठीच प्नॉमपेन ही ख्मेरची राजधानी आहे. येथूनच मेकाँगच्या द. व्हिएटनाममधील त्रिभुज प्रदेशाचा एक फाटा, बासाक हा सुरू होतो व टॉनले सॅप सरोवर मेकाँगशी जोडणारी टॉनले सॅप नदीही येथेच मेकाँगला मिळते. यामुळे वरची मेकाँग, खालची मेकाँग, बासाक आणि टॉनले सॅप यांच्या या एकत्र येण्याच्या फुलीसारख्या जागेला चतुर्भुज या अर्थाचे ‘काटू ब्रा’ असे नाव आहे. या नद्यांच्या काठी सु. १० मी. उंचीचे पूरतट– नैसर्गिक बांध– पुरांमुळे तयार झालेले आहेत. पुराचे वेळी ते पाण्याबाहेर राहतात व त्यांमधील फटींतून पाणी बाहेरच्या नद्यांवाटे सखल प्रदेशात जाते. मेकाँगच्या पूर्वेचा सखल प्रदेश समुद्रसपाटीपासून फक्त २ ते १० मी. उंच आहे परंतु पश्चिमेकडील प्रदेश सु. ४० मी. पर्यंत चढत जातो. हा प्रदेश व टॉनले सॅपचा मध्यवर्ती प्रदेश यांच्या दरम्यान सपाट माथ्याच्या छोटेखानी टेकड्यांचा प्रदेश आहे. अशा टेकड्या टॉनले सॅप सरोवराच्या प्रदेशातही आहेत. त्यांना ‘नाम’ म्हणतात. काँग, सन, स्त्रेपॉक, सी, स्टुंग सेन या ख्मेरमधील इतर काही नद्या होत. त्या मेकाँगला मिळतात.
ख्मेरचे हवामान उष्ण आहे. एप्रिलचे तपमान सु. ३०० ते ३५० से. आणि जानेवारीचे सु. २५० से. असते. ख्मेरचा मध्यभाग सापेक्षतः बराच कोरडा आहे. भोवतीच्या पर्वतांमुळे मोसमी वाऱ्यांबरोबर येणाऱ्या आवर्तास अडथळा होतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ अतिशय उष्णतेचा असतो या वेळी अनेकदा वादळेही होतात. मेमध्ये फक्त सु. ११ दिवस पाऊस येतो आणि जुलै–ऑगस्ट महिने पुन्हा कोरडेच जातात. सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये मात्र सपाटून पाऊस पडतो. त्यावेळी गडगडाटी वादळे होतात. मात्र भारतीय मोसमी पावसाप्रमाणेच येथील मोसमी पाऊसही अनिश्चित आहे. त्याचा काळ व प्रमाण दरवर्षी अनिश्चित असते. डिसेंबर-जानेवारीत थंड ईशान्य वारे येतात. ते दक्षिणेकडील पर्वतांवर थोडा पाऊस देतात. पूर्व ख्मेरच्या उंच प्रदेशात सु. २०० सेंमी. पाऊस पडतो, तर दक्षिणेकडील पर्वतांवर सु. ४०० सेंमी. पडतो. किनारी प्रदेशात पाऊस भरपूर पडतो. सरोवरांचा मध्यवर्ती सखल प्रदेश नद्यांच्या पुरामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच अंशी पाण्याखाली असतो. तिबेटमधील वितळणाऱ्या बर्फामुळे व चीन आणि लाओसमधील जोरदार पावसामुळे मेकाँगला पूर येतात परंतु तिचे पाणी सावकाश चढत गेल्यामुळे नुकसान होत नाही. प्नॉमपेन येथे सप्टेंबरपर्यंत पाण्याची पातळी सु. ८-९ मी. वाढते. जूनच्या मध्यापासून मेकाँगच्या पुरामुळे टॉनले सॅप नदी मेकाँगकडे वाहण्याऐवजी उलट दिशेने टॉनले सॅप सरोवराकडे वाहू लागते. ती ऑक्टोबरपर्यंत तशी वाहते. यामुळे टॉनले सॅप सरोवराची व त्या भागातील इतर सरोवरांची पातळी वाढते फार मोठा प्रदेश जलमय होतो व जंगलप्रदेशातही पाणी शिरून झाडांचे फक्त शेंडेच तेवढे पाण्याबाहेर दिसतात. एकूण सु. १०,४०० चौ. किमी. प्रदेश जलमय होतो व सप्टेंबरच्या मध्यास पाण्याखालील एकूण प्रदेशाचा विस्तार २०,००० चौ. किमी. पेक्षा जास्त होतो. पूरतटांवर, टेकड्यांवर व डोंगरपायथ्याच्या उतारांवर वसलेली खेडी मात्र सुरक्षित राहतात. ऑक्टोबर मध्यापासून पूर ओसरू लागतात, टॉनले सॅप नदी पूर्ववत मेकाँगकडे वाहू लागते. सरोवरे रिकामी होतात व नोव्हेंबरमधील पौर्णिमेला पाणी ओसरल्याचा उत्सव साजरा केला जातो. टॉनले सॅप सरोवराची खोली पुराचे वेळी १० ते १४ मी. असते ती, पुन्हा १ ते ३ मी. होते.
पुराच्या पाण्याचा हा चढउतार ख्मेरमधील एक मोठे भौगोलिक वैशिष्ट्य आहे व त्याचा तेथील आर्थिक जीवनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. पुराबरोबर दरवर्षी नवीन गाळ येऊन तो जमिनीवर पसरतो. त्यातील चुन्याच्या अंशामुळे जमीन समृद्ध होते. विशेषतः मेकाँगच्या खोऱ्यातील जमीन यामुळे चांगली सुपीक बनलेली आहे, तर टॉनले सॅप सरोवर प्रदेशात पाणी ओसरल्यावर मच्छीमारीचा मोठा व्यवसाय चालतो. गोड्या पाण्यातील मच्छीमारीचे हे जगातील सर्वांत मोठे क्षेत्र आहे.
ख्मेरचा सु. निम्मा भूप्रदेश अरण्यव्याप्त आहे. या अरण्यांचा अद्याप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेलेला नाही. त्यांत बांबू व वेत पुष्कळ असले तरी इतर मौल्यवान लाकूड बरेच मिळण्याजोगे आहे. शिवाय राळ, लाकडाचे तेल, काही झाडांच्या साली आणि वेलदोडे व इतर औषधी वनस्पती मिळतात. ही उष्ण कटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्ये होत. ताड, नारळ, केळी, रबर, मुसुंबी, मिरी इ. अनेक उपयुक्त झाडे येथे होतात. हत्ती, रानबैल, चित्ता, बिबळ्या वाघ, अस्वले व इतर असंख्य लहानमोठे प्राणी या देशात आहेत. हेरॉन, बगळा, ग्राउस, महोका, मोर, पेलिकन, करढोक, ईग्रेट, रानबदक हे येथील प्रमुख पक्षी होत.
इतिहास व राजकीय स्थिती : येथील राज्याची सर्वांत जुनी नोंद पहिल्या शतकातील फुनान या चिनी नावाने आढळते. या राज्यात थायलंड, मलाया, कोचीन चायना (दक्षिण व्हिएटनाम) व लाओस यांच्या काही प्रदेशांचा समावेश होता. या राज्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि शासकीय स्फूर्ती भारताकडून मिळालेली होती. त्या काळी पुष्कळ भारतीय लोक मलॅका सामुद्रधुनीतून, क्रा संयोगभूमी ओलांडून किंवा यवद्वीप (जावा) मार्गे येथे येत असत. त्यांपैकी एका ब्राह्मणाचा येथील एका स्थानिक प्रमुखाच्या कन्येशी विवाह झाल्यामुळे हे राज्य स्थापन झाले अशी दंतकथा आहे. या राज्याचा चीन आणि भारत यांच्याशी मोठा व्यापार चालत असे. सहाव्या शतकात त्याच्या जागी चेन-ला हे ख्मेरांचे राज्य आले. दुसरा जयवर्मन् (८०२–५०) याने अंकोरच्या परिसरात राजधानी नेली. त्याने आणि त्याच्यामागून आलेल्या राजांनी या भागात अनेक भव्य शिल्पे व स्मारके उभारली. दुसरा सूर्यवर्मन् (१११३–४५) याच्या काळात या राज्याच्या वैभवाचा कळस झाला. त्यानेच अंकोरवात येथील सुप्रसिद्ध वास्तू उभारल्या. त्यांचे अवशेष हे त्या भागात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे आकर्षण आहे [→ अंकोर अंकोरवात]. अंतर्गत अस्थिरता, दुबळे राजे व बौद्ध धर्माचा प्रसार यांमुळे हे राज्य कमकुवत होऊ लागले होते. तथापि सातवा जयवर्मन् (११८१–१२१८) याने राज्याच्या सीमा सर्वांत अधिक विस्तारल्या. तथापि थाई व चाम यांच्या प्राबल्यामुळे गोंगोलांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे ख्मेरांचे राज्य तेराव्या व चौदाव्या शतकांत पार खिळखिळे झाले. थाईंनी अंकोर १३६९, १३८८ व १४३१ मध्ये सर केले तेव्हा राजधानी प्नॉमपेनला हलवावी लागली. विशिष्ट पाणीपुरवठापद्धतीवर होणाऱ्या तांदळाच्या उत्पादनावर आधारलेली सुबत्ता व सामर्थ्य, ती पद्धत नष्ट झाल्यामुळे खालावली आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस थाई व व्हिएटनामी या दोन्ही सत्तांचे वर्चस्व मान्य करीत, ख्मेर राज्य कसेबसे जीव धरून राहिले. १८४० च्या राष्ट्रीय उठावामुळे कंबोडिया हा व्हिएटनामचा केवळ एक प्रांत म्हणून राहण्याचे दुर्भाग्य टळले.
सोळाव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगाल व स्पेन यांनी येथे आपले नियंत्रण जारी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो साधला नव्हता. १८६२ मध्ये फ्रेंचांनी दक्षिण व्हिएटनाममध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले व सयामचा दावा दुर्लक्षून कंबोडियातही आपली सत्ता प्रस्थापित केली. १८६३ मध्ये फ्रेंचांनी राजा पहिला नरोदम (१८५९–१९०४) यास आपले संरक्षण मान्य करावयास लावले. १७९४ पासून सयामने व्यापलेल्या कंबोडियाच्या बटांबांग आणि सीएम रीप या प्रदेशांवरील सयामी सत्तेस फ्रेंचांनी मान्यता देताच सयामनेही १८६७ मध्ये कंबोडियातील फ्रेंच सत्तेस मान्यता दिली. गादीवर कोणी बसावे या वादाचा फायदा घेऊन फ्रेंचांनी आपले वर्चस्व वाढविले. १८६६ व १८८५ मध्ये झालेले उठाव त्यांनी मोडून काढले. १८६६ मध्ये राजधानी कायमची प्नॉमपेनला आली आणि १८८७ मध्ये कंबोडिया फ्रेंच गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली आला. नरोदमच्या मृत्यूनंतर १९०४ मध्ये त्याच्या मुलाऐवजी सिसोवाथ या त्याच्या भावाला फ्रेंचांनी गादीवर बसविले. १९२७ मध्ये त्याचा मुलगा मानिव्हाँग राजा झाला. त्याच्यानंतर त्याचा नातू नरोदम सिहनूक १९४१ मध्ये गादीवर आला. दरम्यान फ्रेंच व कंबोडियन दडपणांमुळे १९०७ मध्ये सयामला कंबोडियाचे बळकावलेले प्रांत परत करावे लागले. १९४१ मध्ये जपानने ते पुन्हा सयामला दिले परंतु १९४६ मध्ये ते पुन्हा कंबोडियाला मिळाले.
दुसऱ्या महायुद्धानंतर कंबोडिया फ्रेंच संरक्षणाखाली राहण्यास तयार नव्हता. फ्रेंच व जपानी सत्तांखाली तेथील राजसत्ता टिकून होती. तिला १९४७ मध्ये सांविधानिक राजसत्तेचे स्वरूप मिळाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ख्मेर इसाराक (स्वतंत्र कंबोडिया) नावाचा पक्ष स्थापन झाला होता. त्याने राजसत्तेला बाध न आणता क्रांतीशिवाय फ्रेंच वर्चस्वाला विरोध करण्याचे धोरण अवलंबिले. व्हिएटनामच्या प्रश्नात गुंतलेल्या फ्रेंचांनी व्हिएटनामला १९४९ मध्ये फ्रेंच संघांतर्गत स्वातंत्र्य दिले, तेव्हा कंबोडियालाही आपोआपच ते प्राप्त झाले. पुढे १९५० मध्ये उ. व्हिएटनामच्या व्हिएटमिन्ह कम्युनिस्टांच्या हालचाली कंबोडियात वाढल्या. व्हिएटनाममधील गनिमी युद्ध कंबोडियातही आले, तेव्हा मग १९५४ मध्ये जिनीव्हा परिषदेत फ्रेंच व व्हिएटमिन्ह दोघांनीही कंबोडियातून निघून जावे असे ठरले व ८ सप्टेंबर १९५४ रोजी आग्नेय आशिया सामुदायिक संरक्षण तहाने कंबोडियाच्या सरहद्दी ठरल्या. कॅनेडियन, पोलिश प्रतिनिधी व भारतीय अध्यक्ष असलेले आंतरराष्ट्रीय नियंत्रण मंडळ अजूनही अस्तित्वात आहे.
मार्च १९५५ मध्ये नरोदम सिहनूक याने आपल्या वडिलांसाठी गादी सोडली व सार्वत्रिक निवडणुकीत फक्त या पक्षाचेच लोक निवडून आले व सप्टेंबर १९५५ मध्ये नरोदम सिहनूक मुख्य प्रधान झाला. त्याने फ्रेंच संघाचा संबंध अजिबात तोडला व कंबोडिया पूर्णतः स्वतंत्र झाला. सिहनूकने परराष्ट्रसंबंधात तटस्थतेचे धोरण ठेवले. १९६० मध्ये राजा नरोदम सुरामरित मृत्यू पावल्यावर नरोदम सिहनूक राष्ट्रप्रमुख झाला परंतु तो राजा म्हणून गादीवर बसला नाही. ती रिकामीच राहिली. पंचवार्षिक योजनेसाठी अमेरिका, रशिया, चीन, चेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स व जपान यांची मदत मिळविण्यात आली. तथापि सरहद्दीवरील तंटे आणि वाद यांमुळे थायलंड व द. व्हिएटनाम यांजबरोबरचे कंबोडियाचे संबंध बिघडू लागले. त्या देशांनी कंबोडियात गुप्त कम्युनिस्ट हालचाली चालू असल्याचा आरोप केला. १९५४ च्या तहान्वये आपली प्रादेशिक एकता आणि तटस्थता कायम रहावी म्हणून कंबोडियाने एक परिषद बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला. १९६३ मध्ये कंबोडियात बंडाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून नरोदम सिहनूकने अमेरिकेकडून आर्थिक, सैनिकी किंवा सांस्कृतिक साहाय्य घेण्याचे बंद केले. १९६५ मध्ये अमेरिकेशी राजकीय संबंध तोडण्यात आले. अमेरिकेने व्हिएटनाम युद्ध जरूर तर कंबोडियातही न्यावे लागेल असे जाहीर केले. १९६४ ते १९६७ या काळात कंबोडियाचे फ्रान्स व चीन यांच्याशी मात्र संबंध सुधारले होते. जानेवारी १९६८ मध्ये पेन-नौथ याचे नवीन मंत्रिमंडळ आले. त्यात सेनाप्रमुख जनरल लॉन नॉल हा संरक्षणमंत्री होता. शेजारच्या व्हिएटनामयुद्धाचे परिणाम कंबोडियावर होणे अपरिहार्य होते. त्याची तटस्थता सतत धोक्यातच होती. यामुळे राजकीय परिस्थिती फारच अडचणीची झाली होती. ऑगस्ट १९६९ मध्ये जनरल लॉन नॉल याचे सरकार अधिकारावर आले, ते सिहनूकऐवजी स्वतःकडे महत्त्वाचा कारभार घेण्याच्या अटीवरच. त्याने अधिक राष्ट्रीयीकरण न करण्याची घोषणा केली. सिहनूकवर त्याने १९६६-६७ मध्ये कडक टीका केलेली होती. त्याला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळून सिहनूकचे महत्त्व कमी होऊ लागले. अमेरिकेने व्हिएटनाम युद्धाचा भाग म्हणून आपले व दक्षिण व्हिएटनामचे सैन्य कंबोडियात आणून व्हिएटकाँगचा प्रतिकार सुरू ठेवला. तेव्हा सिहनूक मॉस्को, पीकिंगकडे गेला असता मार्च १९७० मध्ये लोकसभेने व रॉयल कौन्सिलने त्याला पदच्युत केले. पीकिंगहून त्याविरुद्ध घोषणा करून सिहनूकने मे १९७० मध्ये चीनमधून आपले सरकार स्थापन केल्याचे जाहीर केले. त्याला चीन, उ. कोरिया, अल्बेनिया, रूमानिया, क्यूबा, सिरिया, उ. व्हिएटनाम, द. व्हिएटनामचे तात्पुरते सरकार, यूगोस्लाव्हिया, इराक, अल्जीरिया, ईजिप्त, सूदान, लिबिया यांनी मान्यता दिली. रशियाने सिहनूकला अभिनंदनपर पत्र पाठविले परंतु रीतसर मान्यता दिली नाही. द. येमेन, मॉरिटेनिया, काँगो (ब्रॅझाव्हिल) आणि गिनी यांनीही मान्यता दिल्याचे सिहनूकने सांगितले व अमेरिकेने कंबोडियात ढवळाढवळ केली नसती, तर आपलेच सरकार प्नॉमपेनमध्ये राहिले असते असा दावा केला. जुलै १९७० मध्ये अमेरिकेने आपले सर्व सैन्य कंबोडियातून काढून घेतले. कंबोडियातील काही लोकांचा सिहनूकला पाठिंबा होता. सिहनूकवर अखेर राष्ट्रदोहाचा आरोप ठेवून प्नॉमपेनमध्ये खटला भरण्यात आला आणि त्याच्या अनुपस्थितीत ५ जुलै १९७१ रोजी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आवली. व्हिएटनामधील युद्धपरिस्थिती व कंबोडियातील अस्थिर राजकीय परिस्थिती अद्याप संपुष्टात आलेली नाही. प्नॉमपेनमध्ये जनरल लॉन नॉलचे सरकार होते. ९ ऑक्टोबर १९७० रोजी कंबोडियात प्रजासत्ताक स्थापन झाल्याचे जाहीर करण्यात आले. राजा व सरदार यांचे सर्व हक्क नष्ट करण्यात आले. चेंग हेंग हा राष्ट्रप्रमुख नवीन राष्ट्रप्रमुखाच्या निवडीपर्यंत राहावा असे ठरले. ज. लॉन नॉल मुख्यप्रधान होता. या समारंभाला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, सिंगापूर, द. कोरिया, द. व्हिएटनाम, थायलंड, राष्ट्रीय चीन यांचे प्रतिनिधी हजर होते. सोव्हिएट, चेकोस्लोव्हाक, पोलिश, पूर्व जर्मन वकील व फ्रेंच आणि भारतीय प्रतिनिधी (त्यांनी प्रिन्स सिहनूकला राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिलेली असल्यामुळे) हे हजर नव्हते. सिहनूकने १० ऑक्टोबरला या प्रजासत्ताकाच्या स्थापनेविरुद्ध पत्रक काढले. चीनने त्या पत्रकाला पाठिंबा दिला. ऑक्टोबर १९७१ मध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करून लॉन नॉलने नवीन सरकार बनविले. तथापि प्रिन्स सिहनूकच्या पाठिराख्यांनी देशात बंडाळी चालू ठेवली. १९७५ एप्रिल-मे मध्ये सिहनूकचे सैन्य विजयी ठरून लॉन नॉलचे सरकार कोसळले.
ख्मेर संयुक्त राष्ट्रांचा आणि सीटोचा सदस्य असून ख्मेरमध्ये सु. ४९,००० सैनिक व अधिकारी आहेत. हवाईदलात १,७५०, आरमारात १,३०० आणि सैन्यात सु. ३४,००० सैनिक आहेत. पाच न्यायमूर्तींचे उच्च न्यायालय येथे असून त्याच्याखाली खास कायद्यान्वये चालणारी न्यायव्यवस्था आहे.
आर्थिक स्थिती : आर्थिक विकासाचा वेग वाढावा म्हणून कंबोडियाने १९५५ पासून समाजवादी धोरण ठेवून राष्ट्रीयीकरणाचा अवलंब बऱ्याच अंशी केला आहे. बँका, आयात-निर्यात व्यापार, वस्तूंचे वाटप, उत्पादन गोळा करणे, पंचवार्षिक योजना आखणे इ. गोष्टी आता सरकारी क्षेत्रात आहेत. शेती, मासेमारी व जंगली उत्पादने हे ख्मेरमधील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. औद्योगिक विकास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. देशाच्या सु. १७८ लक्ष हे. जमिनीपैकी सु. ८१ लक्ष हे. लागवडीयोग्य आहे परंतु प्रत्यक्ष लागवडीखाली फक्त सु. १६ लक्ष हे. आहे. सु. ८१ लक्ष हे. क्षेत्र अरण्यांखाली आहे. लागवडीखालील जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमीन भातशेतीची आहे. जमीनधारणा लहान तुकड्यांची असून शेती मुख्यतः निर्वाह शेतीच आहे. दरसाल सु. १२ लक्ष हे. जमिनीत सु. २२·५ लक्ष मे. टन तांदळाचे उत्पादन होते. यापैकी सु. ४०% तांदूळ निर्यात होऊ शकतो. मेकाँगचा सखल प्रदेश, टॉनले सॅपचा सखल प्रदेश व त्यातील अरण्यप्रदेश व बटांबांगभोवतीचा प्रदेश हा भात पिकविणारा प्रदेश होय. भातशेतीची पद्धत पुरातन आहे. जमीन, हवामान आणि शेतकऱ्यांची आवड यांप्रमाणे निरनिराळ्या जाती उत्पन्न केल्या जातात परंतु गिरण्यांतून सडताना दाण्यांची फूट फार होते. तेथील जमीन फारशी सुपीक नसल्यामुळे उत्पादनाचे प्रमाण कमी असून तांदूळ हे एकच पीक बहुधा होते. शेतकरी बहुधा साखरताडीची झाडे लावतो. ती १२–१५ मी. उंच वाढतात. त्यांपासून मद्य व साखर मिळते. मेकाँग खोऱ्याच्या पश्चिम भागात ही लागवड मुख्यतः होते व दरसाल सु. तीस हजार टन साखर मिळते. टॉनले सॅप सरोवराकडे जाणाऱ्या नद्यांकाठी नारळ, सुपारी, लिंबूजातीची फळे यांच्या बागा आहेत. पूरतटांवरील जमीन मात्र चांगली सुपीक आहे. तिला ‘चामकार’ म्हणतात. प्रमुख नद्यांकाठी ही जमीन सु. २८३ हजार हे. असून तेथे वर्षातून दोन पिके निघतात. जमिनीचा पोत उत्तम असल्यामुळे कोरड्या ऋतूत केशाकर्षणाने पाणी वर येते. भाताशिवाय तंबाखू, मका, घेवडा, सोयाबीन, तीळ, भुईमूग, ताग, नीळ, भाजीपाला इ. पिके होतात. पूरतटाच्या माथ्यावर वस्ती असून कापोक, सुपारी, केळी, तुती, ऊस इ. पिके होतात.
बाजाराच्या परिस्थितीप्रमाणे नगदी पिके काढली जातात. १९४५ पासून कापसाऐवजी तंबाखू, कापोक आणि तीळ यांचे उत्पादन वाढले आहे. रबर आणि मिरी ही महत्त्वाची नगदी पिके मळ्यांतून होतात. दक्षिणेकडील कांपोट विभागात बिनपावसाचे दिवस थोडे असल्यामुळे तेथे मिरी होते. ख्मेर मिऱ्यांस जगाच्या बाजारात चांगली किंमत येते तथापि पिकावरील रोग व अन्य कारणांमुळे अलीकडे मिऱ्यांचे उत्पादन फार घटले आहे. रबराचे मळे मात्र वाढत आहेत. रबराची लागवड १९२१ पासून सुरू झाली आणि काँपाँग चाम व रतनाकिरी हे विभाग त्यासाठी विशेष उपयुक्त ठरले. अरण्ये तोडून तेथे शास्त्रोक्त पद्धतीने रबराचे उत्पादन होते. हेक्टरी सु. १,३०० किग्रॅ. हे येथील उत्पादन सर्व जगात अधिक उत्पादनापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. १९६० मधील ४०,४७५ टनांचे सर्व उत्पादन निर्यात झाले. रबराचे मळे परकीयांच्या, मुख्यतः फ्रेंचांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. प्रामुख्याने अनारोग्यकारक भागात मळे असल्यामुळे सुरुवातीस कामगार मिळत नसत. आरोग्याच्या सोयी करून गावे वसविल्यावर आता सु. १३,००० कामगारांपैकी निम्म्याहून अधिक खुद्द ख्मेर व चाम आहेत.
कंबोडियात १९६७ अखेर सु. १८,१५,००० गुरे व ८,५६,००० म्हशी होत्या तथापि यांचा उपयोग मुख्यतः कष्टाच्या कामांसाठी होतो. मांस किंवा दूध यांच्या उत्पादनास महत्त्व नाही. ख्मेरमधील बहुतेक लोक बौद्ध धर्मीय असून त्यांत मांसाशन निषिद्ध आहे. त्यांचे मुख्य अन्न भात व मासे हे असते. काही लोक कोंबड्या व बदके पाळतात. डुकरांची संख्या १९६७ अखेर १०,७८,००० होती मासेमारी हा येथील शेतीइतकाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. तो सुसंघटित असून वर्षास सु. १ लक्ष टन मासे पकडले जातात. बहुधा प्रत्येक शेतकरी आपल्या कुटुंबासह मासे पकडण्याचे कामही करतो. उत्पादनाचा सु. ६०–७० टक्के भाग सरोवराच्या प्रदेशात मिळतो. खाण्यासाठी व विकण्यासाठी खपलेली ताजी मासळी सोडून बाकीची धुरी देऊन किंवा वाळवून ठेवतात. येथे सु. १७४ प्रकारची गोड्या पाण्यातील मासळी मिळते. पुराच्या वेळी मासे सरोवरांकडे जातात. तेथील अरण्य भागात पुराचे पाणी शिरते. तेथे माशांना प्लँक्टन भरपूर मिळते व उत्पादनास अनुकूल परिस्थिती असते. पूर ओसरू लागले म्हणजे मासे पुन्हा नद्यांकडे जाऊ लागतात तथापि मातीच्या बांधामुळे टॉनले सॅप सरोवर हेच एक जणूकाही प्रचंड जाळे बनते व तेथे जानेवारी ते मेपर्यंत भरपूर मासळी मिळते. या १६,२५० चौ. किमी. प्रदेशात दर चौ. किमी. मध्ये सु. ६ टन मासे मिळतात. येथे निदान ३०,००० लोकांस मासेमारीचे काम मिळते. त्यांपैकी बरेच व्हिएटनामी आहेत. १९४५ नंतर या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पूर वाढत असता मासे मारू नयेत असा निर्बंध आहे कारण त्या वेळी माशांच्या माद्या अंडी घालण्यासाठी सरोवरांकडे जात असतात. हे निर्बंध मोडून मन मानेल तसे मासे पकडल्यामुळे अलीकडे मासे लहान आणि कमी मिळू लागले आहेत. सागरी मासेमारीचे उत्पन्न सु. ५० हजार मे. टन आहे.
अरण्यांपासून काही उत्पन्ने मिळतात. परंतु वनसंरक्षणाकडे लक्ष दिले जात नाही. येथे काही उत्तम इमारती लाकूड मिळण्याजोगे आहे. बांबू व वेत सर्वत्र आहेत.
ख्मेरमधील उद्योगधंदे अलीकडेच सुरू झालेले आहेत. मोटारवाहनांच्या भागजुळणीचा कारखाना, सिगारेटचे कारखाने, एक आधुनिक काडेपेटी कारखाना, काही धातुकामाचे कारखाने यांशिवाय शासकीय क्षेत्रात एक आसवनी, एक लाकूड कापण्याची गिरणी, कापड, प्लायवुड, कागद, सिमेंट, साखरेच्या गोण्या, टायर, मातीची भांडी, काचसामान यांचे कारखाने, कापूस पिंजण्याची व भात सडण्याची गिरणी इ. लहानमोठे उद्योग आहेत. कौले, काडतुसे आणि कापड यांचे कारखाने उभारले जात आहेत. द. किनाऱ्यावरील मुद्दाम विकसित केलेले बंदर काँपाँग सॉम (सिहनूकव्हिल) येथील तेलशुद्धीकरण कारखाना १९६९ मध्ये सुरू झाला. कापड, प्लायवुड, काच, सिमेंट व कागद या धंद्यांस कम्युनिस्ट चीनचे टायर, ट्रँक्टर, साखर कारखाना यांस चेकोस्लोव्हाकियाचे काँपाँग सॉम बंदरासाठी फ्रान्सचे आणि प्नॉमपेन-काँपाँग सॉम महामार्गासाठी अमेरिकेने आर्थिक साहाय्य दिलेले आहे. रशिया आणि यूगोस्लाव्हिया जलविद्युत् प्रकल्पास साहाय्य करीत आहेत.
१९६६ मध्ये फॉस्फेटचा कारखाना सुरू झाला आहे. फॉस्फेटचा साठा सु. ७,००,००० टन असावा. उच्च दर्जाचे लोखंड उ. ख्मेरमध्ये आहे परंतु दळणवळणाच्या गैरसोयींमुळे त्याचा अद्याप उपयोग होत नाही. थोडे सोने व झिर्कॉन प्राथमिक पद्धतीने काढले जाते.
निर्यात व्यापारात तांदूळ, रबर व मका हे प्रमुख पदार्थ आहेत. त्याखालोखाल गुरे तसेच लाकूड व मिरी वगैरे इतर पदार्थ असतात. १९६७ मध्ये एकूण निर्यात २१०·७ कोटी रिएलची झाली. त्यात २५ % रबर, ४२% तांदूळ व ५% मका होता. हाँगकाँग १९%, फ्रँक चलनाचे देश आणि फ्रान्स ९%, कम्युनिस्ट चीन ८%, सिंगापूर १०%, द. व्हिएटनाम ६%, जपान ३·५% ही प्रमुख गिऱ्हाइके होती. आयात व्यापारात शेतीचे व खाद्यपदार्थ, खनिजांपासून बनविलेले पदार्थ, कापड, औषधे, धातू व धातुमाल हे प्रमुख असून १९६७ मध्ये एकूण ३३६·५ कोटी रिएल किंमतीची आयात झाली. तीत फ्रान्स व फ्रँक चलनाचे देश २९%, जपान १६%, कम्युनिस्ट चीन ९%, सिंगापूर ९% व पश्चिम जर्मनी ३·५%, ग्रेट ब्रिटन ४·९%, अमेरिका ३·४% अशी मुख्यतः आयात होती.
ख्मेरमधील सर्व खाजगी व परदेशी बँका जून १९६४ अखेर बंद करण्यात आल्या. ख्मेरची राष्ट्रीय बँक १९५५ मध्ये स्थापन झाली आहे. दोन सरकारी व्यापारी बँका येथे असून त्या बँकिंगचे औद्योगिक आणि व्यापारी व्यवहार पाहतात.
रिएल हे मूलभूत चलन असून एका रिएलचे १०० सेन होतात. १०, २० वा ५० सेनची नाणी व १, ५, १०, २०, ५०, १०० व ५०० रिएलच्या नोटा असतात. अधिकृत विनिमय दर १ पौंड स्टर्लिंग = ८४ रिएल व १ अमेरिकन डॉलर = ३५ रिएल असा आहे. जून १९६८ अखेर देशाजवळ सोने व परदेशी चलन मिळून २७२·६ कोटी रिएलचे व १९६८ अखेर चलनी नोटा ६०४·७ कोटी रिएलच्या होत्या.
वाहतूक व दळणवळण : ख्मेर येथे १९६७ मध्ये १०,८२६ किमी. सडका असून त्यांपैकी २,५०० किमी. डामरी सडका होत्या. प्रवासी मोटारी २१,७०० व मालमोटारी १०,६०० होत्या. १९६८ मध्ये एकूण लोहमार्ग १,३७० किमी. होते. त्यांपैकी ३८५ किमी. प्नॉमपेन ते बटांबांगमार्गे थायलंडच्या सीमेवरील पॉइपेटपर्यंत १३४० पर्यंत पुरा झाला होता. प्नॉमपेन ते काँपाँग सॉम २७० किमी. पैकी प्नॉमपेन ते टाकेओ ७५ किमी. व टाकेओ ते कांपोट ९२ किमी. व कांपोट ते काँपाँग सॉम बाकीचे अंतर आहे. मेकाँग नदीवरील मुख्य जलमार्ग व टॉनले सॅप नदी आणि सरोवर यांवरील जलमार्ग मिळून एकूण सु. १,४०० किमी. जलमार्ग उपलब्ध आहेत. सयामच्या आखातावरील काँपाँग सॉम हे प्रमुख बंदर मुद्दाम विकसित केले असून ते सडकेनेही प्नॉमपेनला जोडलेले आहे. तेथे १०,००० टनी बोटी येऊ शकतात. प्नॉमपेन हे मेकाँगवरील बंदर असून येथपर्यंत ४,००० टनी बोटी जातात. रॉयल एअर कंबोजची हवाई वाहतूक सायगाव, सीएम रीप, हाँगकाँग, कँटन, सिंगापूर यांच्याशी मुख्यतः चालते. शिवाय अनेक परदेशी विमान कंपन्यांची विमाने प्नॉमपेनपासून १० किमी. वरील पॉचेंटाँग विमानतळावरून जगातील प्रमुख शहरांपर्यंत जा-ये करतात. जानेवारी १९६८ मध्ये देशात ६,३२५ दूरध्वनियंत्रे, १० लक्ष रेडिओ आणि २०,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती. प्नॉमपेन येथील नभोवाणी केंद्रावरून फ्रेंच, इंग्रजी, ख्मेर, थाई, चिनी, लाओशियन आणि व्हिएटनामी भाषांतून कार्यक्रम प्रसारित होतात. १९६८ मध्ये देशात ५८ डाकघरे होती. प्नॉमपेन, हाँगकाँग, पॅरिस, टोकिओ व शांघाय यांच्याशी तडक दूरध्वनिसंपर्क आणि हाँगकाँग, ओसाका, पॅरिस, सायगाव व शांघाय याच्याशी टेलिटाइप संपर्क आहे. प्नॉमपेन आंतरराष्ट्रीय टेलेक्स पद्धतीत गोवलेले असून तेथून सिंगापूरशी तडक दूरध्वनी व तारायंत्रसंपर्क साधता येतो.
लोक व समाजजीवन : ख्मेरमधील ६३ लक्ष लोकांपैकी सु. ८५% लोक मूळचे कंबोडियन-ख्मेर आहेत. ते मूळचे सध्याच्या थायलंडमधील कोराट पठारावरून इ. स. पू. दुसऱ्या शतकापूर्वी मेकाँगच्या सुपीक खोऱ्यात उतरले. भारतीय आप्रवासी दोन हजार वर्षांपूर्वीच येथे सतत येत राहिले व त्यामुळे त्यांची छाप येथील लोकांवर अधिक बसली. आठव्या शतकात जावातून भारतीय व मलायी लोकांची येथे स्वारीही झाली होती. दहाव्या ते पंधराव्या शतकांपर्यंत थाई, सतराव्या शतकात व्हिएटनामी आणि सतराव्या व एकोणिसाव्या शतकांत चिनी लोकही येथे येऊन राहिले. मूळच्या लोकांचे इतर वंशांच्या लोकांशी– विशेषतः चिनी लोकांशी– मिश्रण झालेले आहे. ते सरासरी १५२ सेंमी. उंच, बळकट, उजळ वर्णी, उंच कपाळाचे, बसक्या नाकाचे, लांबट डोळ्यांचे व सरळ किंवा कुरळ्या केसांचे असतात. ते ख्मेर भाषा बोलतात त्यांची लिपी मूळ भारतीय आहे आणि ते हीनयान बौद्ध धर्म पंथीय आहेत. वृत्तीने ते फार धार्मिक असून देशात सु. ६५,००० भिक्षू आहेत. मुस्लिम गटांपैकी सु. ९०,००० चाममल असून ते प्नॉमपेन व क्रेत्ये यांच्या दरम्यान मेकाँगच्या पूरतटांवर आणि प्नॉमपेन व काँपाँग श्नांग यांच्या दरम्यान टॉनले सॅपच्या तीरांवर इतरांपासून अलग राहतात. ख्मेरमध्ये सु. ४ लक्ष व्हिएटनामी लोक असून ते दक्षिण व्हिएटनाममधून आलेले आहेत. ते प्नॉमपेनमध्ये व बानामच्या दक्षिणेस मेकाँगच्या काठी राहतात. ते मासेमारी करतात किंवा रबराच्या मळ्यांत काम करतात. सु. ४ लक्ष ३५ हजार चिनी असून ते प्नॉमपेनमध्ये किंवा ख्मेरच्या खेड्यापाड्यांतून व्यापारी म्हणून राहतात. काही मिऱ्यांच्या मळ्यांत काम करतात. येथे सु. ६,००० यूरोपीय मुख्यतः फ्रेंच असून डोंगराळ भागात ख्मेर, लाओशियन किंवा व्हिएटनामी लोकांची छाप पडलेले अनेक गट एकमेकांपासून दूर दूर राहतात. ते मलायी-पॉलिनीशियन आणि ऑस्ट्रोएशियन असून त्यांची संख्या सु. ५०,००० आहे. मूळच्या प्राथमिक टोळ्या ख्मेर लोयू म्हणून ओळखल्या जातात त्यांत जराई, ऱ्हाडे, स्टिएंग, कुई, पिअर, साओक यांचा समावेश होतो. ख्मेरच्या लोकवस्तीचा विशेष म्हणजे सखल भागातील लोकवस्ती ही विरळ व विषम आहे. एकूण लोकवस्तीची घनता दर चौ. किमी. ३० पेक्षा कमी आहे. सु. ६६% प्रदेशात लोकवस्ती जवळ जवळ नाहीच. टॉनले सॅप मैदानात लोकवस्ती दर चौ. किमी. ३० पेक्षा थोडीच अधिक आहे. नद्यांकाठी लहान लहान वस्त्या असतात. मेकाँग खोऱ्याच्या पूर्वेस लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. सु. ७० आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तीर दर चौ. किमी. १०० तर मेकाँग व बासाक नद्यांकाठी ती दर चौ. किमी. २०० आहे. थाई लोकांच्या हल्ल्यामुळे टॉनले सॅप मैदानातील लोकसंख्या फार कमी झालेली आहे. देशातील ४ टक्क्यांहून कमी लोक ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. २० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक ५४·५% आहेत. प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच मुले असतात. मृत्यूचे प्रमाण हजारी २२ असूनही लोकसंख्या दरवर्षी २·२% वाढत आहे. सरासरी आयुर्मर्यादा फक्त ४४ वर्षे आहे. ख्मेरच्या कमी लोकसंख्येमुळे शेजारील देशांच्या आक्रमणाची भीती त्याला सततची आहे.
ऐशी टक्के लोक शेतकरी आहेत. ते मुख्यतः भात पिकवितात. बहुतेक शेतकऱ्याची स्वतःची जमीन १ ते ४ हे. इतकी भातशेतीची किंवा अर्धा ते एक हे. पर्यंत चामकारची पूरतटावरची असते. दुसऱ्याच्या जमिनी कसणारे लोक बटांबांगच्या परिसरात व पूरतटांवर आढळतात. लहान शेतकरी हा सावकारांवर– बहुधा चिनी– अवलंबून असतो. सावकार त्याला बी-बियाणे, कापडचोपड, दागदागिने, मीठ, अवजारे इ. पुरवितो व एका हंगामाच्या सुगीच्या वेळी १००% व्याज आकारतो. मेकाँग व बारूक नद्यांकाठी स्त्रिया घरगुती कापड विणतात. रेशमी कापड विणण्याचा व्यवसाय टाकेओ विभागात चालतो. लोकांची वस्ती नद्यांकाठी पुरापासून बचाव व्हावा म्हणून खांबांच्या आधारावर उभारलेल्या घरांच्या रांगांत असते. घराभोवती फळझाडे लावलेली असतात. गावात बहुधा तळ्याकाठी छायेत वर टोके वळविलेल्या छपरांचा पॅगोडा असतो. तेथे उत्सव होतात, लोक जमतात व प्रत्येकजण काही काळ तेथे शिक्षण घेतो.
शिक्षण : फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर ख्मेरमध्ये शिक्षणाची पुष्कळच प्रगती झाली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा ५·३% भाग शिक्षणावर खर्च होतो. १९५५ ते १९६५ च्या दरम्यान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तिपटीने व माध्यमिक शाळेतील १४·१५ पटीने वाढली. या काळात प्नॉमपेन, टाकेओ व काँपाँग चाम येथे विद्यापीठे स्थापन झाली व बटांबांग येथेही आता विद्यापीठ आहे. १९६५ च्या कायद्याने १० ते ५० वर्षे वयाच्या सर्व लोकांस वाचता आलेच पाहिजे असे ठरविले आहे आणि देशात ८०% साक्षरता आहे असा तेथील सरकारचा दावा आहे. १९७०-७१ मध्ये १,४९० प्राथमिक शाळांतून ३,३७,२९० विद्यार्थी व ९५ माध्यमिक शाळांतून ८१,६११ विद्यार्थी, ७८ तांत्रिक आणि व्यावसायिक शाळांतून २०३ शिक्षक व ३,०३९ विद्यार्थी आणि उच्च शिक्षणाच्या ४७ संस्थांतून १,६०३ शिक्षक व १०,७९३ विद्यार्थी होते. पाच विद्यापीठांत एकूण ७,०३२ विद्यार्थी होते. १९६७ मध्ये कंबोडियातील सर्व वृत्तपत्रे सरकारी हुकमाने बंद करण्यात आली. सरकारने रीअस्म, सांगकुम, कँबोज व कंपूशिया ही अनुक्रमे ख्मेर, फ्रेंच, चिनी आणि व्हिएटनामी भाषांतील वृत्तपत्रे काढलेली आहेत.
कला व क्रीडा : ख्मेर साम्राज्याच्या काळातील अप्रतिम शिल्पे व वास्तुशिल्प यांचा सांस्कृतिक वारसा ख्मेरला लाभलेला आहे. अंकोर परिसरातील ६०० चौ. किमी. प्रदेशात नवव्या ते तेराव्या शतकांतील ख्मेर राजांनी उभारलेली देवालये, राजधान्या आणि राजप्रासाद यांचे शेकडो अवशेष हे आजही हौशी प्रवाशांचे एक मोठेच आकर्षण आहे. येथील कलेवर भारतीय कलेची मोठीच छाप पडलेली दिसून येते. देशाची पूर्वसीमा ही सामान्यतः भारतीय व चिनी संस्कृतींमधीलही मर्यादाच आहे असे दिसते [→ ख्मेर संस्कृति बृहद्भारत अंकोर अंकोरवात]. बौद्ध धर्माचा व त्यातील आदेशांचाही प्रभाव सामान्य जनमानसावर मोठा आहे. ख्मेरमधील संगीत, नृत्य व घरगुती कलाही चांगल्या विकसित आहेत.
देशात सुसंघटित खेळ असे नाहीत. कोंबड्यांच्या आणि क्रिकेट कीटकांच्या झुंजी लोकप्रिय आहेत. मनोरंजनाचे आधुनिक प्रकार व खेळ अलीकडेच सुरू होत आहेत.
महत्त्वाची स्थळे : संरक्षणाची अस्थिर परिस्थिती व आधुनिक उद्योगधंदे यांमुळे अलीकडे शहरांची वाढ होत आहे. प्नॉमपेन ही राजधानी, उद्योगधंद्याचे केंद्र व मेकाँग नदीवरील बंदर असून तेथील लोकवस्ती १९६२ मध्ये चार लाखांहून अधिक होती. बटांबांग हे पश्चिमेकडील भातशेतीच्या भागातील थाई सरहद्दीजवळचे ६०,००० वस्तीचे शहर आहे. काँपाँग चाम हे २८,५३४ वस्तीचे शहर रबराच्या मळ्यांच्या प्रदेशात आहे. सीएम रीप हे १०, २३० वस्तीचे गाव अंकोर अवशेषांच्या जवळ आहे. काँपाँग सॉमची वस्ती ६,५७८ असून ते सयामच्या आखातावर मुद्दाम विकसित केलेले देशाचे प्रमुख बंदर आहे. यांशिवाय कांपोट, क्रेत्ये, काँपाँग श्नांग, काँपाँग टॉम, पॉइपेट, पुर्साट इ. इतर शहरे आहेत. (चित्रपत्र ३९).
कुमठेकर, ज. ब.
“