खोबड्या चोर :पक्षि-वर्गातल्या टर्डिनी या उपकुलात या पक्ष्याचा समावेश होतो. सॅक्सिकोलॉयडीस फ्युलिकेटा हे याचे शास्त्रीय नाव आहे. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत हा सगळीकडे – सपाट प्रदेशात आणि डोंगराळ भागांत – आढळतो. डोंगराळ भागात सु. १,५२५ मी. उंचीपर्यंत हा दिसून येतो. हा पक्षी गावात, खेड्यापाड्यांत वा त्यांच्या भोवतालच्या रानात नेहमी असतो. निवडुंग व इतर झुडपे ज्यात वाढलेली आहेत, अशा ओसाड माळरानात राहणे याला विशेष आवडते.
याला माणसाची भीती वाटत नसल्यामुळे घराच्या छपरावर, व्हरांड्यात किंवा अंगणात हा पुष्कळदा भक्ष्य शोधण्याकरिता येतो. हा चिमणीपेक्षा थोडा मोठा असतो. नराचा रंग तकतकीत काळा असतो खांद्यावर एक पांढरा पट्टा पंख तपकिरी शेपटीच्या बुडाखाली मोठा विटकरी तांबडा डाग असतो. मादीचा रंग भुरकट तपकिरी शेपटी गडद रंगाची, जवळजवळ काळी शेपटीच्या बुडाखाली नराप्रमाणेच विटकरी तांबडा डाग असतो.
चोच बारीक, किंचित बाकदार आणि काळी शेपटी काहीशी लांब व उभारलेली असते पाय काळे. हे पक्षी नेहमी जोडप्याने हिंडत असतात.
सर्व प्रकारचे किडे आणि त्यांची अंडी हे त्यांचे भक्ष्य होय. भक्ष्य शोधीत हे जमिनीवरून थबकत थबकत चालत असतात व मधूनमधून शेपटीला झटका देतात. हे नेहमी आनंदी असतात. यांच्या स्वभावात धिटाई व शंकेखोरपणा यांचे विचित्र मिश्रण आढळते. नर थोडे मंजूळ सूर– विशेषतः विणीच्या हंगामात– काढतो, पण याला गाणारा पक्षी म्हणता येत नाही.
यांच्या विणीचा हंगाम मार्चपासून ऑगस्टपर्यंत असतो. दक्षिणेत तो याच्या आधी असतो. जमिनीवरील बिळांत, घरांच्या भिंतीतील भोकांत किंवा झाडांच्या लहानमोठ्या ढोल्यांत गवत, मुळ्या वगैरे घालून तो घरटे तयार करतो त्याला पिसांचे अस्तर असते. बहुतेक घरट्यांमध्ये सापाच्या कातीचे लहान तुकडे आढळतात. घरटे सुशोभित करण्याकरिता अथवा इतर काही उद्देशाने ते तेथे ठेवलेले असतात की काय, हे समजलेले नाही. मादी दोन किंवा तीन पांढऱ्या रंगाची अंडी घालते कधीकधी त्यात हिरवट छटा असते आणि तांबूस तपकिरी डाग असतात. घरटे तयार करणे आणि पिल्लांना भरविणे ही कामे नर आणि मादी दोघेही करतात, पण अंडी उबविण्याचे काम फक्त मादी करते.
कर्वे, ज. नी.
“