गवा : यालाच गवियादेखील म्हणतात. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. हा समपादांगुलीय (ज्यांच्या बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या) गणाच्या गोकुलातील प्राणी असून भारतीय जातीचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस आहे.
गवा उष्ण प्रदेशातील प्राणी आहे. सबंध भारतातील डोंगरावरील अरण्यांत आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत गवे आढळतात. ७५० ते १,८३० मी. वा त्यापेक्षा थोड्या जास्त उंचीवर ते राहतात. ते काही ऋतूंत चरण्याकरिता कमी उंचीच्या प्रदेशात जरी येत असले, तरी स्वाभाविकतः ते डोंगरी प्राणीच आहेत. त्यांच्या जीवनाला अरण्याची आवश्यकता असते.
पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या नराची लांबी (डोक्यासकट) ३ मी ., शेपटीची सु. ९० सेंमी. आणि खांद्यापासची उंची २·२ मी. असते. साधारणतः मादीची लांबी २ मी., शेपटी ६० सेंमी. आणि खांद्यापाशी उंची १·८ मी. असते. गव्याच्या खांद्यावर एक मांसल उंचवटा असून तो पाठीच्या मध्यापर्यंत गेलेला असतो. त्याची शिंगे गाई-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात. शिंगे जन्मभर कायम असून मृगशृंगांप्रमाणे दर वर्षी गळून पडत नाहीत. शिंगांचा विस्तार सरासरी ८५ सेंमी. असतो. मादीची शिंगे नराच्यापेक्षा लहान व कमी कणखर असतात. त्याचा विस्तारही कमी असतो. कपाळ भस्मी रंगाचे व पाय बळकट व त्यांचा खालचा अर्धा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. डोळे तपकिरी रंगाचे असतात. घ्राणेंद्रिय अतिशय तीष्ण असते वासावरून त्यांना एकमेकांचा पत्ता काढता येतो. ते दोन प्रकारचे आवाज काढतात– एकाला डुरकणे व दुसऱ्याला हंबरणे म्हणता येईल. त्यांचे खूर लहान व रुंद नसल्यामुळे कठीण व खडकाळ जमिनीवर चालण्याकरिता त्यांचा फार उपयोग होतो. सुळक्यासारखी चढण ते झपाट्याने सहज चढून जातात.
पिल्लांचा रंग सोनेरी पिवळा असतो, पण लवकरच तो करडा आणि नंतर फिक्कट तपकिरी होतो. तरुण नरांचा आणि माद्यांचा रंग तांबूस तपकिरी असतो. वयस्क नर काळ्या रंगाचे असून त्यांच्या अंगावर केस नसतात. भारतातील सर्व गव्यांमध्ये दक्षिण भारतातील डोंगरांच्या रांगातील आणि आसाममधील गवे उत्कृष्ट असतात.
गव्यांचे सामान्यतः १०–१२ जणांचे लहान कौटुंबिक कळप असतात. पुष्कळदा निरनिराळ्या कारणांमुळे असे लहान कळप एक होऊन मोठे कळप बनतात. प्रौढ नर एकेकटे किंवा इतर प्रौढ नरांबरोबर भटकत असतात. गवत यांचे मुख्य खाद्य होय, पण ते पानेही खातात. सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरिता ते बाहेर पडतात. दुपारच्या उन्हाच्या वेळी मात्र अरण्यातील एखाद्या एकांतस्थळी सावलीत ते रवंथ करीत पडून राहतात. गवे पिकांमध्ये कधी शिरत नाहीत आणि सहसा मनुष्यवस्तीजवळही कधी येत नाहीत. हिवाळ्यात डोंगरांवरील गवताळ पठारांवर ते चरतात, पण उन्हाळा वाढत जाऊन अन्न व पाणी यांचा तुटवडा भासू लागला म्हणजे ते खाली उतरून पाण्याच्या प्रवाहांच्या काठांवरील गवताळ जागेत चरण्याकरिता येतात.
गवा आणि हत्ती यांचे साहचर्य पुष्कळदा आढळून येत, हे दोन्ही प्राणी एके ठिकाणी चरताना दिसतात.
इतर पुष्कळ प्राण्यांप्रमाणेच गवे ज्या ठिकाणी विशेष लवणयुक्त जमीन असेल त्या ठिकाणी मधूनमधून जाऊन ती चाटतात. या लवणांचा रेचकासारखा उपयोग होऊन जंतांसारख्या आतड्यातील परजीवी प्राण्यांपासून ते मुक्त होतात असा समज आहे.
गवा स्वभावाने भित्रा असतो व विशेषसा जागरूकही नसतो. पण त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला, तर चिडून तो भयंकर क्रूर बनतो. बुजल्यावर तो दाट अरण्यात मार्गातील झाडे काडकाड मोडत वेगाने पळत जातो.
गव्यांना माणसाळविण्याचे आजवर पुष्कळ प्रयत्न झाले आहेत, पण अद्याप त्यात यश आलेले नाही.
प्रजोत्पादनाचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत पुढेमागे होतो, परंतु मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत हे प्राणी माजावर येतात. इतर वेळी प्रौढ नरांमध्ये आढळणारा स्नेहभाव प्रजोत्पादनाच्या काळात संपुष्टात येतो. एकेकटे भटकणारे नर कळपात दाखल होतात आणि माद्यांचा ताबा मिळविण्याकरिता इतर प्रौढ नरांशी त्यांची लढाई जुंपते. विजयी गवा इतर प्रौढ नरांना कळपातून हाकलून देतो आणि एका विवक्षित क्षेत्रावर तो आपल्या कळपाचा हक्क प्रस्थापित करतो. या क्षेत्रावर इतर कळपांनी अतिक्रमण केले, तर ते त्याला खपत नाही.
गर्भावधी किती असतो याची नक्की माहिती नाही, पण पावसाळ्याच्या अखेरीला सप्टेंबर महिन्यात बहुसंख्य पिल्ले जन्मतात असे दिसून येते. मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. पिल्लाच्या जन्माच्या वेळी मादी कळपापासून वेगळी होते आणि त्याला बरोबर घेऊन एकटीच चरत असते. थोड्याच दिवसांत ती पिल्लासह पुन्हा कळपाला येऊन मिळते. प्रजोत्पादनाचा काळ संपताच नर कळप सोडून जातो व एकटा किंवा इतर नरांबरोबर भटकू लागतो.
आसाममध्ये पाळीव गाई आणि गवे यांचा संकर मुद्याम घडवून आणतात, यांच्यापासून निपजणारी संकर-संतती जास्त चांगली असते.
गव्याच्या आणकी दोन मुख्य जाती आहेत, त्यांपैकी एक यूरोपातील आणि दुसरी अमेरिकेतील आहे. यूरोपीय गव्याचे शास्त्रीय नाव बायसन बोनेसस आणि अमेरिकी गव्याचे बायसन बायसन आहे.
यूरोपीय गवा रानटी स्थितीत नामशेष झालेला आहे. वेगवेगळ्या प्राणिसंग्रहोद्यानांत ४५ प्राणी काय ते शिल्लक आहेत. यांच्यापासून गव्याच्या या जातीची प्रजा वाढविण्याचे कार्य सुरू करण्यात आले आणि त्यामुळे त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.
अमेरिकी गवा एके काळी फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत सगळीकडे आढळत असे, पण श्वेतवर्णियांच्या आगमनानंतर यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. या प्राण्यांच्या काळ्या जिभा हा श्वेतवर्णियांचा खाण्याचा एक आवडता पदार्थ होता त्यामुळे यांच्या काळ्या जिभांकरिता आणि चामड्यांकरिता श्वेतवर्णियांनी यांचा फार मोठ्या प्रमाणावर संहार केला. याचा परिणाम असा झाला की, अमेरिकी गवा आज फक्त राखीव जंगलात शिल्लक राहिलेला आहे. कायद्याचे संरक्षण मिळाल्यामुळे आता त्यांची संख्या वाढत आहे.
भट, नलिनी
“