क्रेअपेलीन, एमील : (१५ फेब्रुवारी १८५६–७ ऑक्टोबर १९२६). जर्मन मानसोपचारतज्ञ. जन्म जर्मनीतील न्यूस्ट्रेलिट्झ येथे. वुर्ट्‌सबर्ग, म्यूनिक व लाइपसिक येथे वैद्यकीय शिक्षण. डॉरपेट, हायड्लबर्ग आणि म्यूनिक विद्यापीठांत तो मानसोपचाराचा प्राध्यापक होता. त्याने म्यूनिक येथे मानसोपचार संशोधन केंद्र स्थापन केले. त्याने १८८३ मध्ये लिहिलेला Compendium der Psychiatrie हा मानसोपचारविषयक ग्रंथ मौलिक असून त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

क्रेअपेलीनने वैज्ञानिक संशोधनपद्धतीचा पुरस्कार करून विविध मनोविकृतींचे व्यवस्थित वर्गीकरण केले. कार्यिक (फंक्शनल) चित्तविकृतींचे त्याने केलेले वर्गीकरण कारणानुसारी नसून लक्षणानुसारी आहे तथापि ते मौलिक स्वरूपाचे असून थोड्याफार फरकांनी आजही प्रमाणभूत मानले जाते. वर्तनोद्‌भव चित्तविकृतींचे छिन्नमानसाची चित्तविकृती व उद्दीपन-अवसादाची चित्तविकृती असे दोन प्रकार तो करतो. त्यांपैकी पहिली मुख्यत्वे वैचारिक स्वरूपाची व दुसरी मुख्यत्वे भावनिक स्वरूपाची असते.

क्रेअपेलीनने उद्दीपन-अवसाद या चित्तविकृतीचे विशेष सखोल संशोधन केले. उद्दीपन आणि अवसाद या दोन अवस्थांच्या अनेक प्रकारोपप्रकारांची दखल घेऊन अखेर त्या सर्वांचा ‘उद्दीपन-अवसाद चित्तविकृती’ नावाच्या एकाच व्यापक वर्गात त्याने अंतर्भाव केला. त्याने केलेल्या वर्गीकरणामुळे तसेच मनोविकृतींच्या निदानासाठी त्याने वापरलेल्या वस्तुनिष्ठ कसोट्यांमुळे, मनोविकृतींच्या अभ्यासातील गोंधळ दूर होऊन, त्याबाबतच्या वैज्ञानिक संशोधनास चांगली चालना मिळाली.

क्रेअपेलीनने गुन्हेगारी तसेच मद्यपान व धूम्रपान यांसंबंधीही मौलिक संशोधन केले. देहान्त शासनात तसेच फटक्यांच्या शासनासही त्याचा विरोध होता. मद्यपान व धूम्रपान ह्या व्यसनांमुळे राष्ट्रीय आरोग्य तर धोक्यात येतेच परंतु पुढील पिढ्यांवरही त्यांचे आनुवंशिक दुष्परिणाम होतात. क्रेअपेलीनचे सर्वच लेखन जर्मन भाषेत असल्यामुळे, त्याच्या कर्तृत्वाचे नीट मूल्यमापन होऊ शकले नाही. त्याच्या काही ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे झालेली आहेत. त्यांतील उल्लेखनीय भाषांतरित ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : टेक्स्ट बुक ऑफ सायकीॲट्री  (१८८३, इं. भा. १९०९), लेक्चर्स ऑन क्‍लिनिकल सायकीॲट्री (१९०१, इं. भा. १९१३), वन हंड्रेड इअर्स ऑफ सायकीॲट्री  (१९१७, इं. भा. १९६२) इत्यादी. म्यूनिक येथे तो निधन पावला.

केळशीकर , शं. हि.