गलाँग : हिमालयाचा पायथा व पूर्वीचा आसाम यांतील एक अनुसूचित जमात. लोकसंख्या ८७९ (१९६१). कुरी व कुमुइंग हे या जमातीचे अंतर्विवाही गट आहेत. प्रत्येक गटात अनेक

गलाँग युवती

बहिर्विवाही कुळी आहेत. हे लोक वर्णाने काळे, मजबूत आणि उत्तम गिर्यारोहक असून, गलाँग ही बोलीभाषा बोलतात. तिची स्वतंत्र लिपी नाही.

अरुणाचल प्रदेशातील दक्षिणेस राहणारे गलाँग सुधारलेले आहेत पण उत्तरेकडील मागासलेले असून बेताचेच कपडे वापरतात. मुलांची लग्‍ने चौथ्या-पाचव्या वर्षीसुद्धा होतात. देज देण्याची प्रथा आहे. बहुपतिकत्वाची चाल असली, तरी सर्व पती सख्खे भाऊ असतातच असे नाही तर ते दूरचे नातेवाईकही असतात. सामायिक कुटुंबात मोठ्या भावाने लग्‍नाची बायको आणली, की ती सर्व भावांची पत्‍नी ठरते. धाकटा भाऊ वयात येईपर्यंत पुष्कळदा ही सामायिक पत्‍नी लेकुरवाळी झालेली असते. धाकट्या भावांनी दुसरी लग्‍नाची बायको आणली, तरी ती सर्व भावांची पत्‍नी होते. अशा तऱ्हेने नुसते बहुपतिकत्वच नव्हे, तर बहुपत्‍नीत्व व त्याचबरोबर समूहविवाह अस्तित्वात आहेत.

शेती हा व्यवसाय करूनही काही गलाँग कापड विणतात. घरगुती कपड्यांबरोबरच सुती चादरी विणून त्या जवळपासच्या गावात विकतात. त्यांच्यात गुलामगिरीची पद्धत आहे. गुलाम कुटुंबात घरच्यासारखे राहत असले, तरी त्यांची लग्‍ने मात्र मालकाच्या मुलामुलींबरोबर होत नाहीत. विशिष्ट आकाराची भांडी, पेले, छोट्या घंटा तसेच मिथान व डुकरांचे कळप यांचा चलनी माध्यमाप्रमाणे उपयोग करतात.

ते मृताला पश्चिमेकडे डोके करून उजव्या कुशीवर ठेवून खड्‌ड्यामध्ये समारंभपूर्वक पुरतात. त्या जागी छोटीशी झोपडी बांधून त्यात मण्यांच्या माळा, जेवणाची थाळी ठेवतात व दिवा लावतात.

लेखक : कीर्तने, सुमति