गर्भ विज्ञान : बहुतेक सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींत आणि प्राण्यांत लैंगिक ⇨ प्रजोत्पादनामध्ये नवीन संततीची सुरुवात पुं-व स्त्री-गंतुकांच्या (प्रजोत्पादक कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या) संयोगापासून बनलेल्या रंदुकापासून होते. या रंदुकाची वाढ, विभागणी व प्रभेदन (कार्यविभागणीनुसार रूपांतर) कमीअधिक काळ मातेच्या शरीरात अगर शरीराबाहेर चालू राहून शेवटी त्याची परिणती नवीन अपत्यसंभवनात होते. रंदुकापासून अपत्यापर्यंत होत जाणारा बदल गर्भावस्थेत समाविष्ट होतो कारण अपत्यपूर्व अवस्था म्हणजेच ‘गर्भ’ होय. प्राण्यामध्ये गर्भावस्थेतील प्रारंभिक (पूर्व) अवस्थेला ‘भ्रूण’ म्हणतात त्यानंतर त्याच्या वाढीतील प्रगती सुरू राहून शेवटी अपत्यस्वरूपात तो मातेपासून (किंवा मातेच्या शरीराबाहेर असलेल्या अंड्यातून) वेगळा होतो. या उत्तरावस्थेला गर्भ (फीटस) म्हणतात. वनस्पतींच्या बाबतीत असा भेद केला जात नाही. वनस्पतींच्या गर्भासंबंधीची माहिती ‘गर्भविज्ञान’ या संज्ञेत अंतर्भूत असून ती खाली तपशीलवार दिली आहे. प्राण्यांतील गर्भ व भ्रूण यांसंबंधीची माहिती ⇨भ्रूणविज्ञान या नोंदीत स्वतंत्ररीत्या दिली आहे.

शैवले व बुरशी यांसारख्या कमी दर्जाच्या (कायक) वनस्पतींपैकी (ज्यांच्या शरीराची मूळ, खोड व पाने अशी विभागणी झालेली नाही अशा वनस्पतींपैकी) काही अपवाद वगळल्यास इतर सर्व वनस्पतींत जीवनाची सुरुवात वर सांगितल्याप्रमाणे रंदुकापासून होते. रंदुकाची वाढ कायकाखेरीज इतरांत जनक वनस्पतींच्या शरीरात होते तीच गर्भावस्था होय. त्यानंतर भावी वनस्पतीची प्राथमिक, अनेककोशिक (अनेक कोशिकांची बनलेली), अल्पविकसित व अत्यंत लहान प्रतिकृती निर्माण होते. कधीकधी गर्भविकास पूर्ण होत नाही, तर कधी गर्भधारणाच होत नाही. ह्या व ह्यासारख्या अनेक समस्यांची उकल होण्यास आणी गर्भविकासाचे कृत्रिम रीत्या नियंत्रण करता येण्यास गर्भधारणेच्या पूर्वीच्या काही घटनांची माहिती (उदा., बीजुके म्हणजे अलिंगी प्रजोत्पादक सूक्ष्म कोशिका आणि गंतुकांची उत्पत्ती, परागण म्हणजे परागसिंचन, फलन इ.) आवश्यक असते. तथापि तिचा अतर्भाव गर्भविज्ञानात पूर्वी करीत नसत परंतु आता अनेक वनस्पतिविज्ञ तसा करतात.

अनेक अबीजी वनस्पतींचे प्रजोत्पादक सूक्ष्म एककोशिक (क्वचित अनेककोशिक) बीजुकांद्वारे व अलैंगिक पद्धतीने घडून येते आणि तेथेही एकापासून अनेककोशिक वनस्पती विकास पावते हा विकास काहींत जनक वनस्पतीच्या शरीराबाहेर होतो आणि गर्भाप्रमाणेच त्यावर परिस्थितीचा तसेच आनुवंशिक व अंतस्थ घटकांचा परिणाम होतो. गर्भविकासातील प्रक्रियांप्रमाणेच काही प्रक्रिया समान असतात, म्हणून गर्भ या संज्ञेची व्याप्ती वाढवून अलैंगिक प्रजोत्पादनातील सुरुवातीच्या विकासाचा विचार गर्भविज्ञानात काही गर्भवैज्ञानिक करतात. कित्येकदा विकासाचा अभ्यास गर्भावस्थेच्या काहीसा पुढेही करणे उपयुक्त ठरते. बीजुकाच्या किंवा रंदुकाच्या अंकुरणामुळे निर्माण झालेल्या वनस्पतींच्या (गंतुकधारी व बीजुकधारी पिढ्यांच्या)आद्य विकासाचा तौलनिक अभ्यासही संयुक्तिक ठरला आहे कारण त्यामुळे गर्भधारणा आणि गर्भनिर्मिती (अलैंगिक प्रजोत्पादनात, अंकुरनिर्मिती) यांच्यासंबंधीचे आपले ज्ञान आधिक व्यापक व अचूक होते.

गर्भाची सामान्य लक्षणे : शैवलापासून फुलझाडांपर्यंतच्या (आवृत बीजीपर्यंतच्या) गर्भविकासात काही महत्त्वाच्या बाबी आढळतात. अंदुकातील (फलन न झालेल्या स्त्री-गंतुकातील) वा रंदुकातील अन्नादी निर्जीव पदार्थाचे दोन विषम विभाग होतात. त्याच वेळी ती कोशिका लांबट होऊन ते विभाग परस्परांच्या विरुद्ध टोकांस गेल्याने तळ व शेंडा असे ध्रुवत्व येते. बीजुकांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे हेच आढळते. अंदुकाभोवती जनक वनस्पतीचे आवरण असल्याने हेच ध्रुवत्व त्या वनस्पतींच्या शरीरातील व्यापाराने प्रभावित होते, परंतु मुक्तपणे संचार करीत असलेल्या रंदुकातील ध्रुवत्व बाह्य परिस्थितीमुळे निश्चित होते. या वेळी शेंड्याकडे प्रथिन संश्लेषणात (जीवरासायनिक विक्रियांनी तयार होण्यात) वाढ, कोशिकांची निर्मिती व प्रभेदन सुरू होते आणि तळामध्ये तर्षणी (अर्धपार्य पटलातून जाऊ शकणाऱ्या) पदार्थाचा संचय होऊन कोशिका फुगतात. रंदुकात पहिली विभागणी त्याच्या अक्षाच्या काटकोनात होते. यानंतरच्या विकासावर आनुवंशिक घटक व बाह्य परिस्थिती यांचा प्रभाव पडून विशिष्ट भेदभावदर्शक वाढ होते आणि गर्भाला निश्चित व सुस्पष्ट आकार येतो. काही अपवाद वगळल्यास अक्षाचा विकास ध्रुवत्वाशी सुसंगत असतो. गर्भविकासाच्या प्राथमिक अवस्थेत कोशिकांच्या आकारात अग्रवर्धी क्रम असतो पुढे अक्षाचा दूरचा भाग कायमपणे गर्भावस्थेत राहून त्याच्या अंतिम टोकास सदैव वाढत राहणारे ऊतक [→ विभज्या] बनते (ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणारा कोशिकांचा समूह). गर्भाच्या तळातून घेतलेले पोषणपदार्थ शेंड्याकडे जातात व कोशिकांची संख्यावाढ होऊन प्राथमिक वाढ होते. त्यानंतर ऊतके जशी जून होतील त्या क्रमाने विशिष्ट संरचनाप्रकार बनतात.

आ. ७. गर्भकोशाचे प्रमुख प्रकार : (अ) पॉलिगोनम : (१) वंध्य गुरुबीजुके, (२) साहाय्यक कोशिका, (३) अंदुक, (४) दुय्यम प्रकल, (५) तलस्थ कोशिका (आ) इनोथेरा (इ) अ‌लियम (ई) फ्रिटिलॅरिया (उ) पेपरोमिया (ऊ) चित्रक.

(१) शैवलासारख्या साध्या कायक वनस्पतीत बीजुकांपासून होणाऱ्या अलैंगिक व रंदुकापासून होणाऱ्या लैंगिक प्रजोत्पादनात अंकुराचा किंवा गर्भाचा विकास बहुधा शरीराबाहेर पाण्यात होतो. आरंभी तळ आणि शेंडा असा फरक (ध्रुवत्व) स्पष्ट होऊन आतील आनुवंशिक घटक व बाह्य परिस्थितीचा प्रभाव यामुळे विकासाची दिशा ठरते. काही शैवलांत (उदा., कोलिओकीटी, इडोगोनियम, कारा  इ.) अंदुकांचे फलन शरीरातच झाले, तरी रंदुकापासून बीजुकनिर्मिती झाल्यावर त्यापासून अंकुरनिर्मिती व विकास शरीराबाहेर होतो. कारामध्ये मात्र रंदुकच शरीराबाहेर रुजून अंकुराच्या विकासाचा शेवट वनस्पतीत होतो ⇨शेवाळीसारख्या स्थलवासी (जमिनीवरील) व अधिक वरच्या दर्जाच्या वनस्पतीत द्विगुणित (प्रजोत्पादक कोशिकेत नेहमी असणार्‍या रंगसूत्रांच्या संख्येच्या दुप्पट रंगसूत्रे असलेल्या रंगसूत्रे म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) रंदुकाचा विकास शरीरात होऊन काहींत [→ रिक्सिया] फक्त बीजुकांनी भरलेले बीजुकाशय (ज्यामध्ये बीजुके बनतात असा पिशवीसारखा अवयव) बनते व बहुतेक इतरांत [→ फ्युनेरिया] पद, दंड व बीजुकाशय असे भाग दर्शविणारा बीजुकधारी बनतो. आरंभी शैवलाप्रमाणेच ध्रुवत्व निश्चित होऊन रंदुकाचा शेंडा अंदुककलशाच्या मुखाकडे वळतो, या प्रकाराला ‘बाह्याग्र’ म्हणतात (आ. १-५). अंदुककलशाची ग्रीवा (मान) तळापासून तुटून बीजुकाशयाच्या माथ्यावर अडकून राहते (आ. ४ व ५). तिला पिधानी म्हणतात. शैवालाच्या बाबतीत असे म्हणता येईल की, उच्च वनस्पतीत आढळणाऱ्या गर्भविकासाशी समांतरित अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आढळतात. जनक वनस्पतीपासून स्वतंत्रपणे पाण्यात विकास होत असूनही त्याच्या आणि स्थलवासींच्या गर्भविकासात साम्य आढळते.

(२) अधिक वरच्या दर्जाच्या म्हणजेच वाहिनीवंत अबीजी वनस्पतीत गर्भविकासान्ती पद, प्राथमिक मूळ, खोडाचे टोक व पहिले पान (दलिका) असे भाग आढळतात [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग]. ⇨एक्विसीटम आणि ⇨आयसॉएटिसमध्ये  शेवाळीप्रमाणे गर्भाचा शेंडा बाह्याग्र असतो. लायकोपोडियम [→ लायकोपोडिएलीझ] व काही नेचांत मात्र गर्भाचा शेंडा उलट प्रकाराने म्हणजे अंदुककलशाच्या तळाकडे वाढत राहतो  ह्याला ‘अंतराग्र’ (आ.६) म्हणतात. तसेच येथे रंदुकाच्या पहिल्या विभाजनानंतर वरच्या कोशिकेपासून तंतूसारखे इंद्रिय (आलंबक) बनते व ते खालच्या कोशिकेपासून वाढणाऱ्या गर्भाला खोलवर ढकलत राहते.

(३) बीजी वनस्पती खऱ्या अर्थाने स्थलवासी असल्याने काहींत अंशत: आणि काहींत पूर्णपणे अंदुककलशाचा ऱ्हास झाला आहे [→ आवृतबीज वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकट बीज उपविभाग सायकेडेलीझ गिंकोएलीझ कॉनिफेरेलीझ इ.] चर (चलनशील) वा अचर पुं-गंतुकाकरवी फलनाची प्रक्रिया परागनलिकेद्वारा शरीरात घडून येते. सर्वच प्रकटबीजीत गर्भाला पद नसतो, परंतु अंतराग्र प्रकारच्या विकासाबरोबरच आलंबक असतो. प्राथमिक मूळ व खोड यांची टोके आणि संख्येने कमीजास्त दलिका असे गर्भाचे भाग असतात. प्रथम अनेक गर्भ वाढीस लागले, तरी शेवटी एकच गर्भ पूर्णपणे विकास पावतो [→पाइन नीटेलीझ टॅक्सेलीझ इ.] अत्यंत प्रगत मानलेल्या फुलझाडांच्या गटांमध्ये (आवृतबीज वनस्पती उपविभागात) गर्भविकासपूर्व व त्यानंतरच्या सर्व घटना यांमध्ये फारच विविधता आढळते.

(४) फुलझाडांतील (आवृतबीजी) गर्भधारणा, गर्भविकास किंवा त्यापूर्वीच्या परागण आणि फलन इ. प्रक्रियांचा विचार करण्यापूर्वी ज्या ठिकाणी फलन घडून येते त्या इंद्रियाचा (बीजकाचा म्हणजे बीजाच्या पूर्वावस्थेचा) विचार करणे जरूर आहे, कारण अंदुक प्रकटबीजीप्रमाणे बीजकात असले तरी या वनस्पतीत रेतुके (चर पुं-गंतुके) व अंदुककलश नसतात. बीजके किंजपुटात (ज्यात बिया तयार होतात अशा फुलाच्या फुगीर भागात) लपलेली असून त्यात निर्माण झालेल्या गर्भकोशाच्या उत्पत्ती व संरचना या बाबतींत भिन्न कुलांत, वंशात किंवा जातीत भिन्नत्व आढळते. ⇨ सिलाजिनेलात व प्रकटबीजीमध्ये एका गुरूबीजुकापासून स्त्री-गंतुकधारी (गर्भकोश) निर्माण होतो जवळजवळ ७० टक्के आवृतबीजींत हाच प्रकार आढळतो. बीजकामध्ये (गुरुबीजुककोशात) प्रथमत: एका द्विगुणित जनककोशिकेचे दोनदा विभाजन होऊन चार एकगुणित गुरूबीजुकांची उभी ओळ बनते (आ.७ अ, पॉलिगोनम  पहा) व त्यातील बहुधा सर्वात खालच्यामध्ये प्रकलाचे (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे, केंद्रकाचे) तीनदा विभाजन होऊन फक्त आठ सुट्या प्रकलांचा गर्भकोश बनतो. हा पाच वेळा प्रकलविभाजन घडून येण्याचा नित्य प्रकार सोडला, तर जे काही प्रकार आढळतात, त्यांतील भेद मुख्यत: एकूण प्रकलविभाजनांची संख्या, गर्भकोशातील (गर्भाच्या पिशवीतील) प्रकलांची संख्या आणि मांडणी या गोष्टी लक्षात घेऊन पंचानन माहेश्वरी यांनी १९५० मध्ये निश्चित केले आहेत. एकूण गर्भकोशाचे तीन प्रमुख प्रकार (एकबीजुकी, द्विबीजुकी व चतुर्बीजुकी) ओळखले जातात.

(अ) एकबीजुकी प्रकाराला पॉलिगोनम  प्रकार (आ. ७ अ) म्हणतात कारण तो प्रथमत: पॉलिगोनम  नावाच्या वनस्पतीत आढळला होता [→ श्ट्रासबुर्गर, इ.१८७९]. हा गर्भकोश वर वर्णिल्याप्रमाणे बनलेला असून सर्वसामान्यपणे आढळतो. यात गर्भकोशाच्या एका टोकास एक अंदुक (३) व दोन साहाय्यक (२) कोशिका यांचा अंदुकपरिवार असून दुसऱ्या टोकास तीन तलस्थ (५) कोशिका व मध्यभागी दोन प्रकलांच्या संयोगाने बनलेला एक दुय्यम प्रकल (४) असतो. ऑनेग्रेसी अथवा शिंगाडा कुलातील वनस्पतींत गर्भकोश बनण्यापूर्वी बीजकातील गुरुबीजुकांच्या उभ्या ओळीतील सर्वांत वरच्यामध्ये प्रकलाची फक्त दोनदा विभागणी होऊन चारच प्रकल होतात व ते सर्व त्या गुरुबीजुकात वरच्या टोकास जाऊन तेथे त्यापैकी तिन्हींचा अंदुक परिवार होतो आणि एक प्रकल मध्यभागी राहतो त्याला इनोथेरा  प्रकार (आ. ७) म्हणतात.


(आ) द्विबीजुकी प्रकार कांदा, लसूण इत्यादींच्या ॲलियम वंशात आढळल्याने त्याला ॲलियम प्रकार (आ. ७ इ) म्हणतात. येथे प्रथम: बीजकात चाराऐवजी दोनच गुरुबीजुके निर्माण होऊन त्यांपैकी खालचे एकच क्रियाशील बनते व त्यापासून पॉलिगोनमप्रमाणे आठ प्रकलांचा गर्भकोश बनतो. अनेक द्विदलिकितांत (बियांत दोन डाळिंब्या असलेल्या वनस्पतींत) आणि एकदलिकितांत (बियांत एक डाळिंबी असलेल्या वनस्पतींत) हा प्रकार आढळतो.

(इ) चतुर्बीजुके प्रकारात गुरुबीजुके निर्माण होत असताना तटनिर्मिती न झाल्याने चार एकगुणित प्रकल असलेल्या एकाच गरुबीजुकापासून गर्भकोश बनतो. यात अनेक उपप्रकार आढळतात त्यांपैकी एक सामान्यपणे आढळणारा फ्रिटिलॅरिया  प्रकार होय (आ.७ ई) येथे पक्व गर्भकोशात वरच्या टोकास नित्याप्रमाणे तीन एकगुणित प्रकलांचा अंदुकपरिवार, खालच्या बाजूस तीन तलस्थ पण त्रिगुणित प्रकलांच्या कोशिका व मध्यभागी एकगुणित व एक त्रिगुणित प्रकलांच्या संयोगाने बनलेला दुय्यम प्रकल आढळतो पुढे फलनानंतर पुष्काचा (बीजातील गर्भाबाहेरच्या अन्नांशाचा) विकास पंचगुणित प्रकलापासून होतो.

यांशिवाय गर्भकोशाबाबत इतर अनेक भेद आढळतात. उदा., पेपरोमियाच्या (आ. ७ उ) गर्भकोशात एकूण १६ प्रकल असून त्यांपैकी ६ तलस्थ, १ अंदुक व एकच साहाय्यक कोशिका यात आढळतात मात्र दुय्यम प्रकल उरलेल्या आठ प्रकलांचा बनतो. ⇨ चित्रकामध्ये  (आ. ७ ऊ) साहाय्यक कोशिकाच नसतात आणि चार एकगुणित प्रकलांच्या संयोगाने दुय्यम प्रकल बनतो.

आवृतबीजीत गर्भकोशाच्या विकासात प्रथमत: पहिल्या प्रकलाची मुक्त विभागणी होते, परंतु आठ प्रकलांनंतर ती तात्पुरती थांबते पुढे फलनानंतर ती पुन्हा चालू होऊन गर्भकोश अनेक कोशिकांनी भरून जातो. गर्भकोशाची वाढ बीजकातील बाहेरच्या (परिपुष्क) ऊतकापासून अन्नपुरवठा घेऊन होते. साहाय्यक कोशिकांचे सामान्यतः फलन होत नाही, तथापि ती क्षमता त्यांच्यात प्रसुप्तावस्थेत (काही रचनात्मक व शरीरक्रियात्मक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या निष्किय अवस्थेत) असावी असे मानतात. तलस्थ कोशिकांना निश्चित असे काम नाही, तथापि त्या अन्नपुरवठा करीत असून स्त्री-गंतुकधारीप्रमाणे हळूहळू नाश पावण्याच्या मार्गात असाव्या असे म्हणतात.

गर्भकोशातील मर्यादित प्रकलांच्या संख्येवरून आवृतबीजीतील गंतुकधारी ऱ्हास पावला आहे हे स्पष्ट आहे तथापि त्याचे कार्य (गर्भपोषण करणे ) तेथेच पुढे फलनानंतर निर्माण होणाऱ्हास द्विगुणित किंवा त्रिगुणित प्रकलाच्या विभाजनाने बनलेल्या ऊतकाने (पुष्काने) केले जाते.

फलन : आवृतबीजीत परागणामुळे फुलातील किंजल्कावर (किंजदलाच्या टोकावर) पडलेले परागकण (लघुबीजुके) तेथेच रुजून व परागनलिका किंजलात (किंजदलाच्या अरुंद बहुधा दंडाकृती व तंतूसारख्या भागात) वाढत जाऊन एक पुं-गंतुक (प्रकल) गर्भकोशातील अंदुकाशी एकरूप होतो (फलन) व दुसरे पुं-गंतुक दुय्यम प्रकलाशी संयोग पावून एकूण द्विफलन घडून येते असे एस्. जी. नवाशीन यांनी १८९८ मध्ये दाखविले. दुय्यम प्रकल यापूर्वी द्विगुणित असल्याने आता तो त्रिगुणित होतो. रंदुक द्विगुणित होऊन त्यापासून गर्भविकास सुरू होतो. त्रिगुणित प्रकलाच्या पुन:पुन्हा होणाऱ्या विभाजनाने त्यानंतरच्या तटनिर्मितीने पोषक ऊतक (पुष्क) बनते व गर्भविकासाला  मदत करते. रंगसूत्रांच्या संख्येच्या संदर्भात ते गंतुकधारी किंवा बीजुकधारी पिढीत घालता येत नसून फलनाच्या उद्दीपनाने वाढत राहिलेले ते अप्रभेदित ऊतक होय. कोणत्याही कारणाने फलन टळले, तर त्याची वाढ होत नाही व शी जरूरीही भासत नाही.

कधीकधी परागाचा प्रत्यक्ष परिणाम पुष्काच्या लक्षणात दिसून येतो. त्याला ‘परप्रभाव’ म्हणतात (कोक-१८८१) व पुष्काबाहेरच्या बीजाच्या लक्षणावरच्या परिणामाला ‘उत्तर परप्रभाव’ म्हणतात. उदा., पिवळ्या पुष्काच्या मक्याचे पराग कृत्रिम रीत्या पांढऱ्या पुष्काच्या मक्याच्या किंजल्कावर टाकले असता मेंडेल यांच्या सिद्धांतानुसार त्या रंगाचा प्रभाव पुढच्या पिढीतील मक्याच्या दाण्यात दिसावा, परंतु त्याऐवजी तो परिणाम लागलीच त्याच पिढीच्या फळातील बीजात होऊन दाणे पिवळे दिसतात याउलट, पांढऱ्या पुष्काच्या मक्याचे परागकण पिवळ्याच्या किंजल्कावर टाकल्यास दाणे पिवळेच राहतात, कारण पिवळेपणा प्रभावी असतो. स्विंगल यांनी (१९२८) खजुरावरच्या प्रयोगांनी असे सिद्ध केले की, फळ पिकण्यास लागलेला अवधी व त्याचा आकार ही लक्षणे परागांतून येतात कारण पुष्क किंवा गर्भ यांतून येणाऱ्या काही संप्रेरकांचा (उत्तेजक स्रावांचा, हार्मोनांचा) परिणाम त्यावर होतो.

गर्भविकास : प्रख्यात फ्रेंच गर्भवैज्ञानिक इ. सी. आर. सोयेज यांनी आवृतबीजीतील (फूलझाडातील) गर्भविकासाचे अनेक प्रकार लक्षात घेऊन गर्भाच्या प्राथमिक अवस्था व त्यातील घटकांचा पुढे निर्माण होणाऱ्या भागाशी असलेला संबंध यावर गर्भविकासाच्या प्रकाराचे वर्गीकरण कसे अवलंबून असते हे दाखविले पुढे त्यानुसार श्‍नार्फ (१९२९) व योहान्सेन (१९४५) यांनी द्विदलिकितातील गर्भाचे पाच प्रमुख प्रकार केले. त्यामध्ये दोन कोशिका असलेल्या प्राथमिक अवस्थेच्या (आद्यगर्भाच्या  आ. ८ व १८) टोकाच्या कोशिकेचे विभाजन (उभे किंवा आडवे) व तळाच्या कोशिकेपासून आलंबक (आ) व  गर्भाचे इतर भाग बनण्यातील फरक हा तपशील महत्त्वाचा मानला. योहान्सेन (१९५०) यांनी पायपरॅड, ऑनोअँड, अँस्टरॅड, सोलॅनॅड, कॅरिओफिलॅड आणि चिनोपोडॅड अशी नावे ते प्रकार ज्या ज्या कुलातील वनस्पतीत विशेषेकरून आढळतात त्यावरून दिली.

यांपैकी ऑनोग्रॅड  प्रकार पहिल्याने अधिक तपशीलवारपणे क्रुसीफेरी अथवा मोहरी कुलातल्या शेपर्डस् पर्स (कॅप्सेला बर्सा-पॅस्टोरिस) या वनस्पतीत हॅस्टिन यांनी १८७० साली व फॅमिंट्‌झिन यांनी १८७९ मध्ये अभ्यासला. सोयेज (१९१४, १९१९) यांनी तो पुन्हा काळजीपूर्वक अभ्यासला. द्विदलिकितातील एक प्रातिनिधिक प्रकार म्हणून अनेक वर्षे त्याचे महत्त्व होते. तथापि सोयेज (१९३५) यांनी असे दाखवून दिले की, लुड्‌विजिया पॅलुस्टिस  या ऑनेग्रेसी अथवा शिंगाडा कुलातील प्रातिनिधिक जातीतील गर्भविकासाचा प्रकार अधिक साधा आणि त्या कुलात सुसंगतपणे आढळत असल्याने तो ऑनोग्रॅड प्रकार द्विदलिकितामध्ये एक प्रातिनिधिक मानावा. या सर्व प्रकारांचा तपशील स्थलाभावी येथे देणे अशक्य आहे. तथापि ऑनोग्रॅड प्रकार सोयेज यांच्या आकृतिरूपाने आ. ८-१७ मध्ये दाखविला आहे. तसेच सोयेज यांनी वर्णिलेल्या एकदलिकितातील (जुंकेसी कुलातील) लुझुला फोर्स्टेरी या जातीतील गर्भविकासही आकृतिरूपात (आ. १८-२७) दाखविला आहे. द्विदलिकितांच्या पूर्ण विकास पावलेल्या गर्भास (आ. १७-ई) आदिमूल (आद्य मूळ, उ) व आदिकोरक (आद्य कळी, ऐ) परस्परांच्या विरुद्ध टोकांस असून दोन दलिका (ए) बाजूस असतात एक दलिकिताच्या (आ. २७-ऊ) पूर्ण गर्भास एकदलिका (ए) व आदिमूल (उ) परस्परविरुद्ध टोकास व आदिकोरक (ऐ) बाजूस दिसतो. या गर्भासंबंधी एक विचारसरणी अशी आहे की, ही एक दलिका मूळच्या दोन्हींच्या संयोगाने बनलेली असावी दुसरी विचारसरणी अशी की, एक दलिका आरंभीपासूनच दबली जाऊन फक्त दुसरीच पूर्णतेस पोहोचते. गर्भविकासाच्या माहितीवरून दुसरी विचारसरणी अधिक ग्राह्य मानतात.


द्विदलिकितातील लोरँथेसी,सँटॅलेसी व बॅलॅनोफोरेसी इ. कुलांतील गर्भविकासात आणखी फरक आढळतात. काहींमध्ये रंदुक प्रथम उभे विभागते तर काहींत गर्भकोश वाकडे व लांबट असतात. कधी गर्भकोश लांब वाढून किंजलात प्रवेश करतात व तेथे परागनलिकेशी गाठ पडून फलन होते व आद्यगर्भ बनतो कधी तर एकाच बीजकातील अनेक गर्भकोश आणि त्यातील गर्भ वाढीस लागतात तथापि एकच गर्भ पूर्णत्व पावतो.

आंबा, लिंबू-वंश [→ सिट्रस], फंकिया इत्यादींत बीजकातील गर्भकोशाबाहेरच्या (द्विगुणित) ऊतकापासून (परिपुष्क, आवरणे इ. ) आगंतुक गर्भांचा विकास होऊन त्यापासून बनलेल्या नवीन वनस्पती जनक वनस्पतीसारख्याच होतात असे आढळले. या गोष्टीचा फायदा घेऊन बागाईतदारांना आपल्या गरजेप्रमाणे अगदी मूळच्या जातीसारखी अथवा इष्ट भेद दर्शविणारी वनस्पती मिळविणे शक्य झाले आहे.

फलनावाचून केव्हा केव्हा द्विगुणित अंदुकापासून गर्भनिर्मिती होते (उदा., कंपॉझिटी कुलातील अनेक वनस्पती) ह्याला ‘अनिषेकजनन’ म्हणतात. गर्भकोशातील एकगुणित अंदुके, साहाय्यक कोशिका किंवा तलस्थ कोशिका इत्यादींपासून गर्भनिर्मिती झाल्यास त्यानंतरची पिढी वांझ होते एकगुणित अंदुकापासून होणाऱ्या गर्भनिर्मितीला ‘एकगुणित अनिषेकजनन’ व इतरांपासून बनलेल्याला ‘अगंतुकजनन’ म्हणतात. पुं-गंतुकापासून गर्भनिर्मितीची उदाहरणे (पुंजनित एकगुणित) फार क्वचित आढळतात.

अलीकडे वर निर्देश केलेल्या अनेक शारीरिक तपशीलांचा उपयोग वनस्पतींचे नैसर्गिक वर्गीकरण योग्य रीतीने करण्याकडे केला जातो. उदा., कॅक्टेसी कुलाचा समावेश आता सेंट्रोस्पर्मेलीझ गणात करून पोर्चुलॅकेसी व एझोएसी कुलांशी त्याचे निकट संबंध प्रस्थापित केले आहेत तत्पूर्वी पॅसिफ्लोरेसी व कुकर्बिटेसी या कुलांजवळ त्यांचे स्थान दाखवीत. एंपेट्रेसी कुलाचेही निकट संबंध गर्भविज्ञानाद्वारे एरिकेलीझ या गणाशी असल्याचे गुनर सॅम्युएल्सन ( १९१३) यांनी दाखविले आहे.

ऑनेग्रेसी कुलातील जातीत इनोथेरा  प्रकारचा गर्भकोश, अध:स्थ किंजपुटात चार कप्पे, अक्षाला चिकटलेली अनेक बीजके आणि तडकणारे बोंड ही सर्व असतात, परंतु केवळ ट्रापा (ट्रापा बायस्पायनोजा म्हणजे शिंगाडा) या वंशातील गर्भकोश पॉलिगोनम  प्रकारचा असल्यामुळे या वंशाचा अंतर्भाव ट्रापेसी या स्वतंत्र कुलात करावा हे गर्भवैज्ञानिकांचे मत अनेक वनस्पतिशास्त्रज्ञ मान्य करतात. शिवाय या वंशातील किंजपुटात फक्त दोन कप्पे, प्रत्येकात एकच बीजक आणि अश्मगर्भी (आठळीयुक्त) एकबीजी फळ असते.

अलीकडे प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केल्याने गर्भविज्ञानाची प्रगती बरीच झालेली असून त्यात संशोधनाला बराच वाव आहे. परागणानंतर कधीकधी पराग रुजत नाहीत किंवा परागनलिका किंजलामध्ये पूर्ण वाढण्यापूर्वीच फुटते आणि कधीतर ती बीजकात पोहोचण्याअगोदर फूल गळून पडते. अशा वेळी किंजलाची लांबी कापून कमी करणे व किंजल्कावर संप्रेरक, जीवनसत्त्वे किंवा दुसऱ्या रसायनांची क्रिया घडवून वरील गोष्टी टाळणे शक्य झाले आहे अशा प्रकारच्या काही अडचणी परागच किंजपुटात घालून दूर करणे शक्य आहे. प्राण्यांच्या कृत्रिम रेतुकाधानाचा (गर्भाशयात कृत्रिम रीतीने रेतुके सोडण्याचा) प्रयोग यशस्वी झालाच आहे. इटलीतील संशोधक एम्‌. जी. बोसिओ यांनी अशा प्रयोगाने पिओनियाची जननक्षम बीजे मिळविली आहेत. सकृद्दर्शनी कोणतीही अडचण दिसत नसतानाही जननक्षम बीजे मिळत नसल्यास मात्र अपक्व गर्भ किंजपुटातून काढून कृत्रिम रीत्या संवर्धक पदार्थात वाढविणे शक्य असते. प्राण्यांमध्ये मातेवर सीझेरियन शस्त्रक्रिया करून नंतर शरीराबाहेर उबवण-यंत्रामध्ये त्याच्या गर्भाचा विकास घडवून आणतात, तेच तंत्र काळजीपूर्वक अमलात आणून जननवैज्ञानिकांनी वनस्पतींचे संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांच्यापासून झालेले) गर्भ यशस्वी रीतीने वाढविले आहेत. बीजांची ⇨प्रसुप्तावस्था बरीच लांब असल्यास गर्भ अलग करून व त्याची स्वतंत्रपणे कृत्रिम वाढ करून नवीन रोपे लवकर मिळविता येतात.

फलनानंतर बीजकाचे रूपांतर बीजात होत असताना किंजपुटात फरक होऊन त्याचे फळ बनते. फलनाभावी गर्भविकास झाला नाही, तर फळही मिळणार नाही अशी सामान्य समजूत सर्वस्वी खरी नसल्याचे आढळले आहे. कित्येक वनस्पतींत बीजनिर्मिती न होताही फळे बनल्याची उदाहरणे आहेत जर बीजे निर्माण झालीच तर ती वांझ असतात (उदा., केळे, काकडी, संत्री, द्राक्षे, अननस, चकोतरा, ॲव्होकॅडो इ.). हान्स फिटिंग (१९०९) यांनी असे दाखवून दिले की, किंजल्कावर परागातील रस चोपडूनही किंजपुटाच्या वाढीस चालना देता येते. प्रत्यक्ष फलन व बीजोत्पत्ती यांशिवाय परागाचा किंजपुटाच्या वाढीवर स्वतंत्रपणे प्रभाव पडतो. किंजपुटाला कृत्रिम रीत्या इंडॉल ॲसिटिक अम्‍लासारखे संप्रेरक लावून त्याच्या वाढीस चालना मिळते. या गोष्टींचा उपयोग व्यापारी दृष्ट्या टोमॅटो, अंजीर व अननस इ. फळांच्या बाबतीत केला जातो.

मागे उल्लेख केलेल्या एकगुणित अनिषेकजननाला कृत्रिम रीत्या चालना देऊन बीजे मिळविणे काही दृष्ट्या फायद्याचे असले, तरी तितकेच अडचणीचे असते त्या अडचणी दूर करण्यात (१) परागणानंतर ती वनस्पती अगर तिचा तो विशिष्ट भाग अतिउच्च किंवा अतिनीच तापमानात ठेवणे, (२) किंजल्कावर क्ष-किरणांनी प्रभावित किंवा परक्या वनस्पतींचे पराग ठेवणे, (३) परागणाला विलंब लावणे व (४) रासायनिक प्रक्रिया करणे इ. उपाय केले जातात तथापि या बाबतीत खात्रीचे यश अजून फारसे मिळालेले नाही. मिळाल्यास त्यापासून कृत्रिम रीत्या रंगसूत्रांची संख्या दुप्पट करून जनक वनस्पतीसारखी संतती सतत देत राहणारी शुद्ध जाती बनविता येईल. भारतातील पंचानन माहेश्वरींनी या विषयात बरेच संशोधन केले होते.

पहा : आनुवंशिकी एकांतरण,  पिढ्यांचे परागण प्रजोत्पादन फळ फूल बीज         

                                                                                                                                                                                                                                                   माहेश्वरी, पंचानन हॉर्मोने.

संदर्भ : 1. Johansen, D.A. Chronica Botanica, Waltham, Mass., 1950. 

2. Maheshwari, P. An Introduction to the Embryology of Angiosperms. New York, 1950.                                                                          

परांडेकर, शं. आ.