कृंतकनाशके : पिके आणि धान्याचे साठे उद्ध्वस्त करणारे उंदीर, घुशी, खारी, बीव्हर इ. कुरतडणारे प्राणी (कृंतक) मारण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ. सशासारखे स्तनी प्राणी जरी कृंतक वर्गात येत नाहीत, तरी त्यांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी द्रव्यांनाही सामान्यतः हीच संज्ञा लावतात. हे प्राणी पिके आणि धान्याचे साठे यांचा नाश करतात, त्याचप्रमाणे कित्येक रोगांचाही ते प्रसार करतात म्हणून त्यांचा संहार करणे आवश्यक असते. विषारी गोळ्यांची आमिषे, भुकटी किंवा वायू ह्या स्वरूपात कृंतकनाशके वापरतात. ह्या पदार्थांपासून माणसांना आणि पाळीव प्राण्यांना विषबाधा होण्याचा संभव असल्यामुळे यांचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो. कृंतकांना अन्न आणि निवारा मिळाला की त्यांचा बंदोबस्त करणे कठीण जाते. म्हणून घरेदारे आणि शेतजमीन यांत त्यांना राहता येणार नाही अशी योजना, कृंतकनाशके वापरताना करणे आवश्यक असते.
रोमन लोक उंदीर-घुशी ह्यांच्या नाशासाठी हेलेबोअर (वंश हेलेबोरस) ही वनस्पती वापरत. आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड, बेरियम कार्बोनेट व फॉस्फरस हे पदार्थ कृंतकनाशके म्हणून पूर्वी वापरत असत, पण आता ते वापरत नाहीत. कुचला व रेडस्क्विल ही वनस्पतिजन्य विषे प्राचीन काळापासून उंदीरनाशासाठी वापरात आहेत.
कृंतकनाशकांचे तीन प्रमुख वर्ग पडतात : (१) तात्कालिक, (२) दीर्घकालिक व (३) वंध्यकारक.
तात्कालिक कृंतकनाशकांच्या एका मात्रेने कृंतक मरतात. प्लेगाच्या साथीसारख्या तातडीच्या वेळी जेव्हा इतर कृंतकनाशके मोठ्या प्रमाणावर पुनःपुन्हा वापरणे शक्य नसते त्यावेळी अशी कृंतकनाशके उपयोगी पडतात.
क्लथनरोधक (रक्ताची गुठळी होण्यास वा गोठण्यास विरोध करणारी) कृंतकनाशके दीर्घकालिकांच्या वर्गात येतात. त्यांच्या मात्रेची अनेकदा पुनरावृत्ती करावी लागते. सामान्यतः ती विशिष्ट प्राण्यांनाच घातक असल्यामुळे मानव व पाळीव प्राणी यांना त्यांच्यापासून तात्कालिक कृंतकनाशकांएवढा धोका नसतो. डायफॅसीन, फ्यूमारीन, पीएमपी, पिव्हल, वारफेरीन इ. व्यापारी नावांनी ओळखली जाणारी कृंतकनाशके ही याची उदाहरणे होत. ह्यांमुळे आंतरिक रक्तस्राव होऊन प्राणी मरतो. सामान्यतः उंदीर व घुशी मारण्यासाठी यांचा उपयोग करतात. झिंक फॉस्फाइड (Zn3P2), रेडस्क्विल, अँटू यांचा समावेश तात्कालिक कृंतकनाशकांत होतो. घरगुती वापरासाठी व शेतातील उंदीर व घुशी मारण्यासाठी त्यांच्या तयार गोळ्या मिळतात अगर त्या तयार करून घ्याव्या लागतात. त्यात अल्कलॉइड किंवा सल्फेट स्वरूपात स्ट्रिक्नीन हे विषारी द्रव्य असते.
कार्बन मोनॉक्साइड वायू, वायुरूप कार्बन डाय सल्फाइड व मिथिल ब्रोमाइड यांचाही उपयोग कृंतकनाशक म्हणून करतात. कॅल्शियम सायनाइडापासून, ओलाव्यामुळे हायड्रोसायानिक अम्ल हा विषारी वायू निघतो म्हणून त्याचाही कृतकनाशक म्हणून वापर करतात.
भुकटीच्या स्वरूपात स्पर्शजन्य विष म्हणून वापरली जाणारी कृंतकनाशके म्हणजे नॉर्वेजियन घुशींसाठी अँटू, घरातील उंदरांसाठी डीडीटी व शेतातील कृंतकांसाठी डायएल्ड्रीन व एंड्रीन ही होत. सोडियम फ्ल्युओरोॲसिटेट व थॅलियम सल्फेट ही शेतातील कृंतकांसाठी अत्यंत प्रभावी कृंतकनाशके आहेत. परंतु ती इतर प्राण्यांसही अत्यंत विषारी असल्यामुळे व त्यांच्या विषबाधेवर उताराही साध्य नसल्याने, त्यांचा उपयोग तज्ञांखेरीज इतरांस करता येत नाही.
वंध्यत्व आणणाऱ्या (निर्बीजीकारक) कृंतकनाशकांत इस्ट्रोजेन, लिंग हॉर्मोने (जनर्नेद्रियांची वाढ व कार्य नियंत्रित करणारे अंतःस्राव) इत्यादींचा समावेश होतो. संततिप्रतिबंधक म्हणून मानवास उपयोगी पडणाऱ्या लिंग हॉर्मोनांच्या योगाने कृंतकनाश करणे शक्य आहे. गाभण किंवा व्यालेल्या उंदरीणीस इस्ट्रोजेन दिल्यास ते रक्तप्रवाहातून गर्भात व दुधातून पिलांच्या पोटात जाते व ती वांझ निपजतात. ही कृंतकनाशके अद्याप प्रयोगावस्थेत आहेत.
विशिष्ट जातीच्या कृंतकापुरतेच प्रभावी असे आदर्श कृंतकनाशक व त्यामध्ये वापरण्याचे आमिष शोधून काढण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. आदर्श कृंतकनाशके मानव, पिके व पाळीव प्राणी यांना बिनधोक, विषबाधेने मेलेले प्राणी खाल्ले तरी द्वितीयक विषबाधा होणार नाही अशी आणि गंधहीन व रुचिहीन असावीत. एकच कृंतकनाशक दीर्घकाळ वापरल्यास, कृंतकांना त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती येते म्हणून त्यावर मात करणारी कृंतकनाशके आणि तंत्रे यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे.
जमदाडे, ज. वि.