कूस्को: पेरू देशातील दक्षिणेकडील जिल्ह्याचे केंद्र आणि प्रसिद्ध ऐतिहासिक शहर. लोकसंख्या १,०८,९०० (१९७० अंदाज). हे लीमाच्या ५८४ किमी. आग्‍नेयीस, समुद्रसपाटीपासून ३,४१४ मी. उंचीवरील कूस्को खोऱ्‍यात वसले असून सर्व बाजूंनी पर्वतवेष्टित आहे. इंका साम्राज्याचा संस्थापक मांको कापाक याने बाराव्या शतकात हे वसविले, अशी आख्यायिका आहे. इंका राजवटीत कूस्को वैभवशिखरावर होते. पिरॅमिड व तत्सम भूमितीय आकाराच्या वास्तू, सोन्यामोत्यांनी मढविलेले वाडे, सूर्य, चंद्र, तारे इत्यादींची मंदिरे ही इंकाकालीन कुस्कोची वैशिष्ट्ये असून तेथील सूर्यमंदिर विशेषच सालंकृत होते. इंका साम्राज्य नष्ट करणारा स्पॅनिश सेनापती फ्रांथीस्को पिझारो याने १५३४ साली शहराची लूट करून इंका इमारती उद्‌ध्वस्त केल्या. तेथीलच दगडदरवाजे वापरून त्याने नवे स्पॅनिश शहर उभारले. अद्यापही इंका काळातील भिंतींचे अवशेष कुस्कोच्या पायात पहावयास मिळतात. प्रसिद्ध सांतो दोभिंगो मठ सूर्यमंदिराच्या भक्कम भिंतीवरच बांधलेला आहे. याशिवाय येथे अनेक प्रेक्षणीय स्पॅनिश चर्च आहेत. वसाहतकाळात हे धार्मिक केंद्र होते तसेच चित्रकला, वास्तुकला, दागिने, आलंकारिक लाकूडकाम व इतर कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध होते. १९५० साली मोठा भूकंप होऊन कूस्को उद्‌ध्वस्त झाले होते  पण बहुतेक ऐतिहासिक वास्तु पुन्हा उभारल्या आहेत. शहरात बहुसंख्य इंडियन आहेत. येथे विद्यापीठ असून शिक्षणाचे हे केंद्र आहे. आसमंतातील शेतमालाची ही बाजारपेठ असून येथे लोकरगिरण्या, खतकारखाना, कातडीकाम, अन्नपदार्थ, मद्य इत्यादींचे उद्योग आहेत. येथून तितिकाका सरोवरास रेल व राजमार्ग असून साकसावामान किल्ला, माचू-पिकचू आदी इंकांची भग्‍नावशेष असलेली स्थळे कूस्कोजवळ आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.