कूचिंग : मलेशिया संघराज्यापैकी सारावाक राज्याची राजधानी. लोकसंख्या ७०,००० (१९७० अंदाज). सारावाक नदीच्या काठावर, समुद्रकिनाऱ्यापासून सु. २४ किमी. आत, सर जेम्स ब्रुक याने १८३९ मध्ये प्रथम यूरोपीय पद्धतीचा बंगला बांधला. थोड्याच दिवसांत तेथे भरभराट होऊन ते व्यापारी व औद्योगिक केंद्र बनले. सध्याच्या लोकसंख्येपैकी २/३ चिनी व १/५ मलायी आहेत. बाकीचे यूरोपीय, भारतीय, पाकिस्तानी, दायाक इ. आहेत. शहराचा मुख्य भाग नदीच्या दक्षिण काठावर आहे. आग्नेय आशियाच्या विविध देशांस जाणारी-येणारी जहाजे कूचिंग बंदर घेत असल्याने बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी अलीकडे तानाहपूते उपनगरात नवे बंदर बांधले गेले आहे. आधुनिक चित्रपटगृहे, बॅडमिंटन प्रेक्षागृह, गोल्फ मैदान, उद्याने, संग्रहालय, उत्तुंग इमारती, आलीशान हॉटेले, अत्याधुनिक विश्रामधामे इत्यादींमुळे कूचिंग विलासनगरी म्हणूनही विख्यात आहे.
ओक, द. ह.