कृषिविज्ञान विद्यापीठ : कर्नाटक राज्यातील कृषिविषयक संशोधन करणारे एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ. अमेरिकेतील लँड ग्रँट महाविद्यालयाच्या धर्तीवर हे विद्यापीठ १९६३ च्या अधिनियमानुसार २१ ऑगस्ट १९६४ रोजी बंगलोरच्या हेब्बाळ या उपनगरात स्थापन करण्यात आले. त्यास राज्य सरकारने हेब्बाळ येथील कृषी व पशुवैद्यक महाविद्यालये व धारवाड येथील कृषी महाविद्यालय जोडले. सध्या त्याच्या क्षेत्रात या महाविद्यालयांव्यतिरिक्त मंगलोरचे मत्स्योद्योग व सागरी महाविद्यालय, रायचूर येथील कृषी अभियांत्रिकी संस्था तसेच ३५ शासकीय संशोधन केंद्रे व ४० संशोधन प्रकल्प यांचा समावेश होतो. विद्यापीठाचा हेतू कृषी व तदानुषंगिक निगडित असणाऱ्या वनस्पतिविज्ञान, दुग्धव्यवसाय, मत्स्योद्योग, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, भूविज्ञान, उद्यानविज्ञान, पशुवैद्यक, पशुपालन वगैरे विषयांचे अध्यापन, संशोधन व विस्तार-योजना हा असून घटक महाविद्यालयांत मूलभूत शास्त्रे, मानव्यविद्या, कृषिविज्ञान, पशुवैद्यक व मत्स्योद्योग या विषयांच्या शाखोपशाखा आहेत. विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयांतून सु, २,०३६ विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय १९७१-७२ या शैक्षणिक वर्षात केलेली असून पदव्युत्तर परीक्षेसाठी फारच थोडे विद्यार्थी येतात. असा आतापर्यंतचा विद्यापीठाचा अनुभव आहे.
विद्यापीठाने पारंपरिक अशी परीक्षापद्धती स्वीकारलेली नाही त्याऐवजी त्रिसत्र पद्धती (ट्रायमीस्टर सिस्टम) अवलंबिलेली असून प्रत्येक सत्र चौदा आठवड्यांचे असते. विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. ४८,००० ग्रंथ असून ९५९ नियतकालिके येतात. विद्यापीठाचा १९७२-७३ चा वार्षिक खर्च २९०·०० लक्ष रुपयांचा आहे. विद्यापीठाने शेतकऱ्याच्या सोईसाठी एक योजना सुरू केली असून तीद्वारे शेतकऱ्यांना मौलिक सल्ला देण्यात येतो.
देशपांडे, सु. र.