कुसर : (हिं. चमेली सं. माधवी, वासंति, नवमल्लिकालॅ. जॅस्मिनम मलबॅरिकम कुल-ओलिएसी). या मोठ्या आरोही (आधारावर चढणाऱ्या वेलीसारख्या) झुडपाचा प्रसार भारतात बहुतेक सर्वत्र जंगलात आहे. महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर व घारापूरी येथील जंगलात आढळते. खोड सु. २० सेंमी. व्यासाचे असून पाने पातळ, रुंद, अंडाकृती, लांबट व कधी हृदयाकृती असतात. फुले पांढरी व सुवासिक, पाकळ्या टोकदार व ६–१०फांद्यांच्या टोकांना खूप फुलांच्या त्रिशाखी वल्लरी मार्च–मेमध्ये येतात व फळे एप्रिल–सप्टेंबरमध्ये येतात.
पाने थोडी कडू, स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी), शक्तिवर्धक आणि दीपक (भूक वाढविणारी) असतात त्यांचा रस मिरी, लसूण इ. उत्तेजक पदार्थांबरोबर वांत्या होण्यासाठी देतात. ही वेल शोभेकरिता बागेतही लावतात.
पहा : ओलिएसी.
जमदाडे, ज. वि.
या वेलीसाठी जमीन चांगली खणून, खतवून छाट कलमे अगर बुंध्याजवळील धुमारे २-३ मी. अंतरावर लावून लागवड करतात. वेल मांडवावर किंवा जाळीवर चढवितात. या वेलीच्या पानांवर बुरशीचा त्याचप्रमाणे तांबेऱ्याचाही उपद्रव होतो. त्यासाठी बोर्डो मिश्रण फवारतात.
चौधरी, रा. मो.