कृ. पा. कुलकर्णी

कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग : (५ जानेवारी १८९२–१२ जून १९६४). मराठी भाषाशास्त्रज्ञ व ग्रंथकार. जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे. इस्लामपूर, नासिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इ. ठिकाणी एम्.ए., बी. टी. पर्यंतचे शिक्षण. प्रारंभी काही काळ शिक्षक. पुढे अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे संस्कृतचे व मराठीचे प्राध्यापक. मुंबई येथील एका महाविद्यालयाचे ते काही काळ प्राचार्यही होते. ‘मराठी संशोधन मंडळा’चे ते संचालक होते  (१९४८–५०). तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘भाषा सल्लागार मंडळा’चे अध्यक्ष आणि शुद्धलेखन समितीचे ते कार्यवाह होते.

भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे व मराठीची भाषिक परंपरा आटोपशीरपणे मांडणारा मराठी भाषा : उद्‍गम व विकास (१९३३) आणि मराठी शब्दांची तौलनिक निरुक्ती देणारा मराठी व्युत्पत्तिकोश (१९४६) हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. त्यांशिवाय भाषाशास्त्र व मराठी भाषा (१९२५), शब्द : उद्‍गम आणि विकास (१९५३) आणि त्यांच्या निधनोत्तर डॉ. ग. मो. पाटील ह्यांनी संपादिलेले मराठी व्याकरणाचे व्याकरण (१९६९) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राजवाडे मराठी धातुकोश (१९३७) या ग्रंथाचे संपादन करून त्यास त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिली. तसेच पाठचिकित्साशास्त्रास अनुसरून मुकुंदराजाच्या विवेकसिंधूचे संपादन केले (१९५७).

पेशवे दप्तराचे ४५ खंड (१९३०–३४), ऐतिहासिक पत्रव्यवहार (१९५७) आणि महाराष्ट्रगाथा (१९६०) ह्या ग्रंथांचे ते सहसंपादक होते. संस्कृत ड्रामा अँड ड्रॅमॅटिस्ट्स (१९२६) हे त्यांचे इंग्रजी पुस्तक. जी. एफ्. म्यूरच्या द बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन  ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्‍गम आणि विकास (१९३७) ह्या नावाने केले. कृष्णाकांठची माती (१९६१) हे त्यांचे आत्मचरित्र.

१९५२ साली अमळनेर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांस लाभला होता. मुंबई येथे ते निवर्तले.                     

                                         मालशे, स. गं.