क्रासीन्यस्की, झिग्मूंट :(१९ फेब्रुवारी १८१२–२३ फेब्रुवारी १८५९). पोलिश कवी व नाटककार. जन्म पॅरिस येथे. उच्च शिक्षण वॉर्सा विद्यापीठात. वडील श्रीमंत उमराव होते. त्यांच्या रशियाधार्जिण्या विचारांमुळे त्यांना वॉर्सा सोडून स्वित्झर्लंडला यावे लागले आणि झिग्मूंटचे विद्यापीठातील शिक्षणही संपुष्टात आले. त्यानंतरचे त्याचे बरेचसे आयुष्य परदेशातच गेले. Nieboska komedia (१८३५, इं. भा. द अन्डिव्हाइन कॉमेडी, १९२४) ह्या त्याच्या पहिल्या नाटकामध्ये सामाजिक क्रांतीचे परिणामकारक चित्र उभे केले आहे. Irydion(१८३६, इं. भा. Irydion, १९२७) मध्ये त्याने पोलंडच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूपकात्मक दर्शन घडविले आहे. पोलंडच्या स्वातंत्र्याचा तो कट्टर पुरस्कर्ता होता. Przedswit(१८४३, इं. शी. द डॉन) आणि Psalmy przysclosci(१८४५, इं. शी. साम्स ऑफ द फ्यूचर) ह्यांसारख्या त्याच्या काव्यांतूनही ही भावना तीव्रतेने प्रत्ययास येते. त्याच्या प्रेमविषयक भावकविता श्रेष्ठ दर्जाच्या मानल्या जातात. पोलिश साहित्यातील स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.
मेहता, कुमुद