क्रॅसुलेसी : (घायमारी कुल). फुलझाडांपैकी ⇨ रोझेलीझ  गणातील एक कुल. यामध्ये सु. ३५ वंश व १,५०० जाती आहेत त्यांचा प्रसार ऑस्ट्रेलिया व ओशिॲनिया ह्यांखेरीज सर्वत्र आहे. बहुतेक सर्व वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) क्षुपे (झुडपे) वा ⇨ओषधी आहेत. पाने साधी, क्वचित विभागलेली व मांसल पुष्पबंध (फुलोरा) बहुधा कुंठित (सर्पगती वल्लरी), क्वचित परिमंजरी [→ पुष्पबंध], फुले, नियमित, द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, परिकिंज संदले ४-५ व दीर्घस्थायी. प्रदले ४-५, क्वचित जुळलेली [→ कॉटिलेडॉन] केसरदले प्रदलाइतकी वा दुप्पट किंजदले बहुधा प्रदलाइतकी व सुटी, क्वचित तळाशी जुळलेली व प्रत्येकाच्या तळाशी खवल्यासारखा मधुरसप्रपिंड किंजपुट ऊर्ध्वस्थ [→ फूल] घोसफळ पेटिकाफळांचे बनलेले, बीजे अनेक व बारीक. या कुलामध्ये ⇨कलांचोसेडमकॉटिलेडॉन  इ. सामान्य वंश आहेत. अनेक जाती बागेत शोभेकरिता लावतात व काही औषधांत वापरतात. रुक्ष जमिनीत त्या चांगल्या वाढतात.

चौगले, द. सी.