गया : बिहार राज्यातील पाचव्या क्रमांकाचे शहर, जिल्हाकेंद्र व हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १,७९,८८४ (१९७१). हे फल्गू नदीकाठी, पाटण्याच्या दक्षिणेस ८८ किमी. व कलकत्त्याच्या वायव्येस ४६७ किमी. आहे. दक्षिण बिहारमधील व्यापार, उद्योग आणि दळणवळण ह्यांचे हे मोठे केंद्र असले, तरी गयेच्या धार्मिक माहात्म्यामुळेच येथे दरसाल २-३ लाख लोक भेट देत असतात.
बोधगया मंदिर, गया
पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी गयासुराने येथे मोठे तप केले. त्याला प्राप्त झालेल्या वरामुळे, त्याच्या दर्शनाने वा स्पर्शाने सर्व लोक स्वर्गात जाऊ लागले व गंभीर परिस्थिती निर्माण झाली. देवांनी गयासुराचे शरीर मिळवून ही स्थिती बदलवली. तथापि गयेतील वास्तूंना तेव्हापासून पावित्र्य प्राप्त झाले. त्यामुळेच या क्षेत्री पापांचे क्षालन तर होतेच परंतु येथील ‘गयावळ’ (पंड्यासदृश) ब्राह्मणांकडून सपिंड श्राद्धकर्म केल्याने आपल्या कुलांचा उद्धार होतो, अशी प्राचीन काळापासून समजूत आहे. रामाचा व पांडवांचा गयेशी संबंध आढळतो. गौतम बुद्धाला गयेच्या ११ किमी. दक्षिणेस असलेल्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून गयेचे महत्त्व आणखी वाढले. मगध साम्राज्यातील हे महत्त्वाचे नगर होते. गयेच्या २५ किमी. उत्तरेस असलेल्या ‘बराबर’ गुहांत अशोकाचे शिलालेख मिळाले आहेत. समृद्ध परिसरातील धर्मक्षेत्र म्हणून मध्ययुगातही गयेचे महत्त्व टिकून राहिले, किंबहुना वाढले. अहिल्याबाई होळकरांनी १७८७ च्या सुमारास येथील विष्णुपद मंदिराला मोठा सभामंडप बांधला. गेल्या शतकात गयेचा साहिबगंज हा नवा भाग खूप वाढला. जुन्या गयेत प्रसिद्ध विष्णुपद मंदिराशिवाय सूर्यमंदिर, सूर्यकुंड, अक्षय्यवट, रामशिला व प्रेतशिला या टेकड्या, ४५ श्राद्धवेदी, गयेच्या आसमंतातील काळ्या पाषाणापासून घडविलेले शिल्पकाम व अनेक धर्मशाळा आहेत.
शाह, र. रू.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..