क्रप घराणे : जर्मन उद्योगपतींचे जगप्रसिद्ध घराणे. पोलाद, अवजड यंत्रे व शस्त्रसामग्री उत्पादन करणारे म्हणून या घराण्याची गेली दीडशे वर्षे ख्याती आहे. जर्मनीच्या औद्योगिक विकासाला या घराण्याने महत्त्वाचा हातभार लावला. शस्त्रसामग्रीच्या निर्मितीत क्रप घराण्याने अपार संपत्ती मिळविली. परंतु त्यामुळेच क्रप उद्योगसमूहाला युद्धकाळात मोठ्या संकटातून जावे लागले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला, तेव्हा बाँब-वर्षावात क्रप उद्योग बेचिराख झाले. तथापि युद्धोतर काळात पश्चिम जर्मनीचे पुनरुज्जीवन झाल्यावर क्रप उद्योगसमूह पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला. आज क्रप घराणे जगातील श्रीमंत घराण्यांपैकी एक आहे.
फ्रीड्रिख क्रपने (१७ जुलै १७८७–८ ऑक्टोबर १९२६ जन्म व मृत्यू एसेन येथे) १८१२ मध्ये एसेन येथे पोलादाचा छोटा कारखाना स्थापन केला. कारखान्याची भरभराट होण्यापूर्वीच तो अकाली निधन पावला. त्याच्या पश्चात क्रप घराण्यात एकामागोमाग कर्तबगार वारस जन्माला आले आणि अल्पावधीतच क्रप उद्योगसमूहाची जगातील प्रचंड उद्योगांत गणना होऊ लागली. फ्रीड्रिखचा मुलगा ॲल्फ्रेड (२६ एप्रिल १८१२ –१४ जुलै १८८७ जन्म व मृत्यू एसेन येथेच) याने छोट्या कारखान्याचा व्याप वाढविला. १८७१ मध्ये कारखान्यात सोळा हजार कामगार काम करीत होते. ॲल्फ्रेडने यांत्रिक अवजारांसाठी उच्च प्रतीच्या पोलादाचे उत्पादन सुरू केले आणि १८४७ मध्ये तीन पौंड वजनाच्या तोफांच्या उत्पादनाने युद्धसामग्री-निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले. जर्मनीने १८६६ मध्ये ऑस्ट्रियावर व १८७१ मध्ये फ्रान्सवर जे विजय मिळविले, त्यांत क्रप तोफांचा मोठाच वाटा होता. कामगारांनी संघटना उभारण्याला ॲल्फ्रेडचा तीव्र विरोध होता, परंतु कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणण्यात ॲल्फ्रेडने नेहमीच पुढाकार घेतला. त्याचा मुलगा फ्रीड्रिख ॲल्फ्रेड (१७ फेब्रुवारी १८५४–२२ नोव्हेंबर १९०२ जन्म एसेन येथे) याने खाणउद्योग, जहाजे व रेल्वेएंजिने आदी नव्या क्षेत्रांत गुंतवणूक करून क्रप उद्योगसमूहाची कीर्ती दिगंत पसरविली. तो जर्मनीतील सर्वांत श्रीमंत नागरिक बनला. त्याने संशोधनास चालना दिली कामगार वर्गासाठी वसाहती बांधल्या आणि कामगार व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी कल्याणकारी निधी निर्माण केले. याच काळात ‘क्रप भौतिकी व रसायन संशोधन संस्था’ स्थापन करण्यात आली तिला जगभर क्रोम-निकेल-लोखंड यांविषयीच्या संशोधनात्मक कार्याबद्दल अतिशय प्रसिद्धी मिळाली. तो काप्री (इटली) येथे निधन पावलात्याच्या निधनसमयी कारखान्यात ४३,००० कामगार काम करीत होते. त्याला मुलगा नव्हता. पण त्याची थोरली मुलगी बर्था (२६ मार्च १८८६–२१ सप्टेंबर १९५७ जन्म एसेन येथे) कुशाग्र बुद्धीची होती. तांत्रिक व प्रशासकीय ज्ञान तिने अल्पवयातच आत्मसात केले होते. वडिलांच्या निधनानंतर उद्योगधंद्यांचे संचालकत्व तिच्याकडे आले. १९०६ मध्ये तिने डॉ. गुस्टाफ फोन बोलेन उंट हालबाख (७ ऑगस्ट १८७०–१६ जानेवारी १९५०जन्म हेग, हॉलंड येथे) ह्या राजनैतिक मुत्सद्याशी विवाह केला. जर्मन सम्राटाच्या खास परवानगीने डॉ. गुस्टाफने ‘क्रप’हे नाव धारण केले व त्याने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. १९०३ मध्ये कारखान्याचे संयुक्त भांडवल कंपनीत रूपांतर करण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात क्रपने शस्त्रास्त्रांचे प्रंचड प्रमाणावर उत्पादन सुरू केले. त्यावेळी कारखान्यात १,१५,००० कामगार कामावर होते. क्रप उद्योगाची युद्धकाळातील तांत्रिक कौशल्याची बाब म्हणजे त्याने निर्माण केलेली ‘बिग बर्था’नावाची दूरच्या पल्ल्याची तोफ, ही होय. युद्ध संपल्यावर कंपनीने उत्पादनक्षेत्र बदलून कृषी, खाणकाम, पूलउभारणी, कागद–उत्पादन, वस्त्रोत्पादन यांसाठी आवश्यक असणारी यंत्रे निर्माण करण्याचे काम सुरू केले. १९२६ मध्ये क्रप उद्योगानेच प्रथम ‘विडिया’नावाचे सिंटर टंगस्टन कार्बाइड बनविले. त्याच्यायोगे धातु-यंत्रे व धातु-शिल्प ह्यांच्या निर्मितीमध्ये मोठी क्रांती घडून आली. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापासून गुस्टाफने हिटलरला पाठिंबा दिल्यामुळे कारखान्यांत पूर्ववत शस्त्रास्त्रांची निर्मिती होऊ लागली. या काळात कारखान्यात १,६०,००० मजूर काम करीत होते व त्यांपैकी अनेक मजूर युद्धकैदी व गुलाम होते. १९४३–४५ या काळात दोस्त राष्ट्रांनी केलेल्या सतत बाँबफेकीत क्रपचे अर्धे-अधिक कारखाने निकामी झाले. युद्ध संपल्यानंतर अमेरिकेने गुस्टाफवर युद्धगुन्हेगार म्हणून खटला भरण्याचा आग्रह धरला. केवळ वार्धक्यामुळे त्याच्यावर दया दाखविण्यात आली. तो सॉल्झबर्ग (ऑस्ट्रिया) येथे व बर्था एसेन येथे निधन पावली.
गुस्टाफचा थोरला मुलगा ॲल्फ्रीड (१ ऑगस्ट१९०७–३० जुलै १९६७जन्म-मृत्यू एसेन येथेच) उद्योगसमूहाचा संचालक म्हणून काम पहात होता. त्याच्यावरही युद्धगुन्हेगार म्हणून न्यूरेंबर्ग येथे खटला भरण्यात आला. त्याला बारा वर्षे कारावासाची शिक्षा झाली व बाँब-वर्षावातून वाचलेली क्रपची मालमत्ता जप्त करण्यात आली. तीन वर्षे शिक्षा भोगून झाल्यावर जर्मनीतील इंग्लंडच्या राजदूताने रदबदली केल्याने त्याची सुटका झाली व जप्त केलेली मालमत्ता त्याला परत देण्यात आली. सुटकेनंतर ॲल्फ्रीडने आपल्या परिश्रमाने उद्योगसमूहाचा व्याप पूर्ववत वाढविला. त्याने नवीन नवीन वस्तूंच्या उत्पादनास सुरुवात करून पूर्व यूरोपला मोठ्या प्रमाणावर त्या निर्यात करण्याचे धोरण स्वीकारले. त्यासाठी क्रप कारखान्यास बँकांकडून अधिकाधिक कर्जे काढावी लागली. कर्जाचा बोजा अखेरीस इतका वाढला की, बँकांनी १९६७ मध्ये कर्जफेडीचा तगादा लावल्याने क्रप उत्पादनसाम्राज्याची १५५ वर्षांची खासगी मालकी संपुष्टात आणून त्याचे सार्वजनिक निगमात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर लवकरच ॲल्फ्रीड क्रप निधन पावला व त्याचा मुलगा आर्ण्ट याने एक लाख पौंडाचे वर्षासन स्वीकारून कारखान्यातील आपला हिस्सा निगमास विकला. त्यानंतर गुंटर व्हागेलसँग या व्यवस्थापकाने कारखान्याची पुनर्रचना केली असून आता कारखान्यात विमाने, अंतरिक्षयानांची सामग्री व अणुजीव-उत्पादनसामग्री यांचे उत्पादन सुरू झाले आहे. निगमाचे अध्यक्षपद डॉ. हेर्मान ॲब्ज या प्रसिद्ध बँकरकडे आहे. १९७० मध्ये कारखान्याने ८०,३४० कामगारांना रोजगार दिला. पोलाद सामग्री निर्माण करणाऱ्या क्रपच्या एका दुय्यम कंपनीचे २५ टक्के भाग भांडवल इराणने १९७४ साली विकत घेतले.
गद्रे, वि. रा.
“