कौकी : (हिं. खिरणी इं. ॲडम्स ॲपल लॅ. मिम्युसॉप्स कोकी कुल-सॅपोटेसी). सु. ९–१२ मी. उंचीचा हा अनेक शाखा असलेला सदापर्णी वृक्ष ब्रह्मदेश, मलेशिया, ऑस्ट्रेलियाचा उष्ण भाग तसेच होशियारपूर, मुलतान, लाहोर इ. ठिकाणी आढळतो. महाराष्ट्रात कमी पण मलबार, कोचीन व बंगाल येथे याची अधिक लागवड करतात. गोव्यामध्ये याची फळे ‘पोम’ किंवा ‘ॲडम्स ॲपल’ म्हणून ओळखतात. याची पाने साधी, गुळगुळीत, चकचकीत, विशालकोनी, एकांतरित (एकाआड एक), चिवट व खालून पांढरट असतात. पानांच्या बगलेत उन्हाळ्यात पांढरी फुले येतात. मृदुफळ पूर्ण पक्व झाल्यावर जांभळे, एकबीजी, २·५–४ सेंमी. लांब असते. बी फिकट जांभळे, त्रिकोणी आणि चपटे. फळांचा मोसम ऑगस्ट ते सप्टेंबरात असतो. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. खोडावर कापले असता चिकट डिंकासारखा रस येतो. तो हलक्या दर्जाच्या गटापर्चाकरिता उपयुक्त आहे. बियांचे चूर्ण नेत्रदाह (डोळ्याची आग), ज्वर, महारोग, चित्तभ्रम इ. दोषांवर गुणकारी आहे. पंजाबमध्ये याचे कृमिनाशक औषध बनवितात. मूळ आणि साल, पाणी व मध यांमध्ये उगाळून अतिसार किंवा संग्रहणी या रोगांवर गुणकारी पाने बेरीबेरीवर (ब१ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणाऱ्या रोगावर) आणि खोडातून येणारा चीक कानातील सुजेवर उपयुक्त आहे. फळे अहमदाबादी बोरासारखी दिसतात. वाळलेल्या फळांची सिंगापूरहून चीनला निर्यात होते. कौकीची आंबट, जांभळी व चवदार फळे खाद्य असून भूक वाढवितात. वृक्ष शोभिवंत दिसतो म्हणून बागेत लावतात. लाकूड टिकाऊ असून बियांचे तेल उपयुक्त असते.
मुजुमदार, शां. ब.