कोपनहेगन : डेन्मार्कची राजधानी. लोकसंख्या ५,९५,७५१ (१९७३ अंदाज). उपनगरांसह १३,८०,२०४ (१९७०). क्षेत्रफळ ८४ चौ.किमी. कोपनहेगन म्हणजे व्यापाऱ्यांचे आश्रयस्थान. हे पूर्व झीलंडवर व आमॅयर बेटाच्या उत्तर भागावर उरसुंद सामुद्रधुनीच्या काठी वसलेले असून, बाल्टिकमधील सुविख्यात नाविक केंद्र आणि स्कँडिनेव्हियातील सर्वात मोठे शहर आहे.
सुरुवातीस हे एक साधे मच्छीमार खेडे होते. बाराव्या शतकात बिशप आपसालॉनने येथे कोट बांधल्यानंतर याचे महत्त्व वाढू लागले. १४४३ मध्ये येथे राजधानी आल्यापासून कोपनहेगनचा उत्कर्ष सुरू झाला. तो आजतागायत चालू आहे. गेल्या पाचसहाशे वर्षांत कोपनहेगनवर अनेक संकटे कोसळली आहेत. तेरा ते सोळा या शतकांतील हॅन्सीऍटिक संघाची स्पर्धा व तज्जन्य लष्करी हल्ले, १६५८-५९ चा स्वीडिश सैन्याचा वेढा, १७०० मधील इंग्रज, डच व स्वीडिश आरमारांचे हल्ले, १७२८ व १७९५ चे अग्निप्रलय, १८०१ ची कोपनहेगनची लढाई व १८०७ मध्ये ब्रिटिश आरमाराने केलेला तोफांचा भडिमार आदी संकटांनी शहराचे अतोनात नुकसान झाले, तरी याचे महत्त्व कमी झाले नाही. दुसऱ्या महायुद्धात १९४० ते ४५ हे जर्मनांनी व्यापले होते तेव्हा दोस्तांनी येथील गोद्या उद्ध्वस्त केल्या होत्या.
जुन्या कोपनहेगनमध्ये वाकडे तिकडे रस्ते व अरुंद बोळ आहेत, पण नवा भाग शहर नियोजनाचा आदर्शच वाटतो. रस्ते, निवासस्थाने, उद्याने अत्यंत कल्पकतेने उभारल्याने शहराचे सौंदर्य खुलून दिसते. बहुतेक सर्व नवी रचना सोळाव्या शतकातील चौथ्या ख्रिश्चनच्या कारकिर्दीत त्याच्या प्रेरणेनेच झाल्याने, आजच्या कोपनहेगनचा निर्माता म्हणून त्याचा गौरव केला जातो.
कोपनहेगन यूरोपातील प्रमुख बंदरापैकी असून डेन्मार्कच्या आयात निर्यात व्यापाराची मोठी पेठ येथे आहे. लोखंड, यंत्रे, खाद्यपदार्थ, साखरशुद्धी, दारू गाळणे इत्यादींचे कारखाने, कापड गिरण्या आणि जहाजबांधणी, गोद्या इत्यादींमुळे औद्योगिक जीवन गजबजलेले आहे. येथून मांस आणि दुग्धपदार्थ यांची निर्यात होते. १८९४ मध्ये हे खुले बंदर झाल्यापासून याची विशेषच भरभराट झाली. येथील विद्यापीठ १४७९ पासून मौलिक शैक्षणिक कार्य करीत असून, त्याचे ग्रंथालय समृद्ध आहे. साहजिकच राजधानी म्हणूनच नव्हे, तर डेन्मार्कच्या राजकीय, औद्योगिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्र म्हणून कोपनहेगनला विशेष महत्त्व आहे.
आपसालॉनच्या किल्ल्याचे अवशेष, त्याचा अश्वारूढ पुतळा, चौथ्या ख्रिश्चनने बांधविलेले चर्च, त्याचा मनोरा व त्यातील वेधशाळा, रोझनबर्ग, राजवाडा व त्यातील हस्तिदंती सिंहासन, बरोक पध्दतीचे ‘चर्च ऑफ अवर सेव्हिअर’ हे प्रार्थनामंदिर, ॲमेलियाँबर्ग राजवाडा, राष्ट्रीय संग्रहालय, नगरभवन आणि त्यातील चौदा हजार यंत्रांचे बहूद्देशीय घड्याळ, टिव्होली करमणूक उद्यान ही आजही कोपनहेगनची आकर्षणे आहेत.
ओक, द. ह.
“