कोन, फेर्डिनांट यूलिउस : (२४ जानेवारी १८२८–२५ जून १८९८). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतीच्या सूक्ष्म रूपांसंबंधीच्या त्यांच्या कार्यामुळे लूई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांच्या बरोबरीने सूक्ष्मजीवशास्त्राच्या आद्य प्रवर्तकांत त्यांची गणना होते. ब्रेस्लौ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले उच्च शिक्षण बर्लिन विद्यापीठातून पुरे केले. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी आले आणि सरते शेवटी ते ब्रेस्लौ विद्यापीठात ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट फिजिऑलॉजी’ चे संचालक झाले.

सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाची पध्दती (१८७२, १८७५), सूक्ष्मजंतूंच्या बीजुकाचा (लाक्षणिक प्रजोत्पादक भागाचा) शोध (१८७६) आणि स्वंयभवनाच्या (आपोआप निर्माण होण्याच्या) समस्येवरील सूक्ष्मजंतू बीजुकांविषयीची त्यांची धारणा हे कोन यांच्या महत्त्वाच्या कार्यातील प्रमुख भाग होत. त्यांनी आपल्या सूक्ष्मजंतूच्या अचूक आकारवैज्ञानिक (आकार व रचना यांसंबंधीच्या ) अध्ययनावरूनच असा निष्कर्ष काढला की, सूक्ष्मजंतूंची वंश व जाती यांमध्ये मांडणी करता येईल. तथापि त्यांनी असेही निदर्शनास आणले की, फक्त आकारवैज्ञानिक अभ्यास हा वर्गीकरणाचा अपुरा पाया ठरेल. सारख्या आकाराच्या जीवाणूंची क्रियावैज्ञानिक आणि जीवरासायनिक लक्षणे ही एकमेकांपासून भिन्न असू शकतात आणि तशी ती असतातही हे सर्वप्रथम त्यांनी ओळखले. आपल्या आयुष्यभर ते त्या काळचे सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचे अग्रेसर अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. १८७६ मध्ये रॉबर्ट कॉख यांनी कोन यांच्या प्रयोगशाळेत असे दाखवून दिले की, गुरेढोरे, मेंढ्या व कधीकधी माणसांना होणारा काळपुळी (अँथ्रॅक्स) हा संसर्गजन्य रोग बॅसिलस अँथ्रॅसिस या सूक्ष्मजंतूमुळे होतो. बर्लिनमधील स्वास्थ मंडळात कॉख यांची नेमणूक कोन याच्या प्रयत्नामुळेच झाली. कोन हे एक उत्तम शिक्षक होते व विज्ञान लोकप्रिय करण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांना पुष्कळ बहुमान मिळाले व लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्यत्व हा त्यांपैकी एक होय. ते ब्रेस्लौ येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.