कोटा – ३ : राजस्थान राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २,१२,९९१ (१९७१). हे जयपूरच्या दक्षिणेस सडकेने ३५४ किमी. असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-रतलाम-दिल्ली मार्गावर मुंबईच्या उत्तरेस ९१७ किमी. आहे. कोटाहून पूर्वेकडे बीनापर्यंत ३०४ किमी. चा मध्य रेल्वेचा फाटा गेलेला आहे. चंबळ नदीच्या पूर्व तीरावर वसलेल्या या शहराचे नाव भिल्लांच्या जमातीवरून पडले. चौदाव्या शतकात या भिल्लांचा पराभव करून बूंदीच्या युवराजाने येथे राज्य स्थापन केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोटा संस्थान राजस्थानात विलीन झाले. लाडपूर, रामपूर व चौक अशा तीन भागांत शहर विभागलेले असून जुन्या चौक भागातील मथुरेश आणि नीलकंठ महादेव ही मंदिरे, राजवाडा, संग्रहालय प्रेक्षणीय आहेत. चंबळवर कोटाजवळ बंधारा बांधल्याने कोटाचा आसमंत समृद्ध झाला आहे. साहजिकच कोटा ही शेतमालाची बाजारपेठ बनली आहे. हातमागाचे कापड, मलमल, सतरंज्या, धातुकाम हे येथील जुने उद्योग. स्वातंत्र्यानंतर रशियाच्या सहकार्याने भारत सरकारने येथे यंत्रांना लागणारी उपकरणे बनविण्याचा मोठा कारखाना काढला. या सभोवती खत, रसायने आदी विविध कारखाने निघाल्यामुळे कोटा राजस्थानची औद्योगिक राजधानी बनली आहे. चंबळचा परिसर शिकारीसाठी उत्तम असल्याने कोटा येथे प्रवाशांसाठी विशेष सोयी आहेत.

शाह, र. रू.