गझाली, अल् : (१०५८–११११). श्रेष्ठ इस्लामी धर्मशास्त्रवेत्त्यांत अल्-गझालीची गणना होते. ‘इस्लामचा सर्वश्रेष्ठ धर्मशास्त्रवेत्ता’, असेही त्याचे वर्णन करता येईल. शिवाय तो कायदेपंडित, मौलिक विचारवंत, गूढवादी साधक आणि धर्मसुधारक होता. त्याचे संपूर्ण नाव अबू हामिद मुहंमद बिन मुहंमद अल्-तूसी अल्-गझाली. जन्म इराणमधील खोरासान प्रांतातील तूस येथे झाला. तूस व जुरजान येथे त्याने आपल्या शिक्षणाला आरंभ केला आणि नयसाबूर येथे इमाम अल्-हरमय्न अल्-जुवय्नी ह्यांच्या हाताखाली ते पुरे केले. नंतर १०९१ मध्ये मध्ययुगात प्रख्यात असलेल्या बगदाद येथील निझामिया विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून गेला. काही काळानंतर त्याने प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. पण अकरा वर्षानंतर ११०६ मध्ये ते पद त्याने परत स्वीकारले. दरम्यानचा काळ दमास्कस येथे एक सूफी म्हणून त्याने दारिद्र्यात व्यतीत केला. एह्या उलूम अल्-दीन (म.शी. धर्मशास्त्राचे पुनरुज्जीवन) हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्याने ह्याच कालखंडात लिहिला. इस्लामी धर्मशास्त्रावर ह्या ग्रंथाइतका विख्यात ग्रंथ दुसरा नसेल. ह्या ग्रंथाचा प्रभाव आणि अधिकृतता ह्या बाबतीत सेंट टॉमस अक्काय्नसच्या सुमा थिऑलॉजिया ह्या ग्रंथाशीच त्याची तुलना करता येईल. निझामियाला परतल्यावर तेथेच पाच वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.
निझामिया विद्यापीठात त्याची प्रथम नेमणूक झाली. त्यानंतरचा काही काळ तो संशयवादाच्या आहारी गेला होता पण पुढे त्याला एकाएकी उपरती झाली व नंतरची अकरा वर्षे त्याने प्रवास, अभ्यास, चिंतन आणि सूफीमार्गाची साधना करण्यात घालविली. गूढवादाच्या सिद्धांताचे मर्म त्याने अशा रीतीने जाणून घेतले आणि त्याच्या योगाने इस्लामी धर्मशास्त्राच्या क्षेत्रात नवीन चैतन्य ओतले. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसाही त्या धर्मशास्त्रावर कायमचा उमटविला. निझामिया विद्यापीठात परतण्यापूर्वीच एह्या ह्या आपल्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाची रचना त्याने पुरी केली होती.
एह्या उलूम अल्-दीन हा त्याचा सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ. ह्याचे चार भाग आहेत (१) इबादात (धार्मिक विधी किंवा कर्मकांड), (२) आदात (सामाजिक रूढी), (३) मुहलिकात (दुर्गुण) आणि (४) मुंजियात (सद्गुण). मुसलमानांच्या जीवनाच्या सर्व अंगांचे मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ आहे. ‘इस्लामचा सर्वांत अधिकारी भाष्यकार’ असा गझालीचा निर्देश करण्यात येतो. धर्माचा प्रत्येक विभाग घेऊन प्रथम विधी, कर्मकांड ह्यांनी त्याचे जे बाह्यांग बनलेले असते, त्याचे व नंतर त्याचा जो आंतरिक, आध्यात्मिक अर्थ असतो, त्याचे तो विवरण करतो. ह्या ग्रंथाच्या कित्येक महत्त्वाच्या भागांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे.
संदर्भ : 1. Gardner, W. R. W. An Account of al-Ghazali’s Life andWorks, Madras, 1919.
2. Smith, Margaret, Al-Ghazali : The Mystic, London, 1944.
3. Watt, W. Montgomery,The Faith and Practice of al-Ghazali, New York, 1953.
फैजी, अ. अ. अ. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)