गजेंद्रगडकर, प्रल्हाद बाळाचार्य : (१६ मार्च १९०१ – ). भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती, विधिवेत्ते व एक श्रेष्ठ विचारवंत. जन्म व प्राथमिक शिक्षण सातारा येथे. १९१८ मध्ये विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक. धारवाड येथील महाविद्यालयातील पहिली दोन वर्षे सोडली, तर बाकीचे उच्च शिक्षण पुण्यास झाले. शैक्षणिक जीवनात अत्यंत बुद्धिवान विद्यार्थी म्हणून ते चमकले. १९२५ साली त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव शालिनीबाई. १९२६ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरूवात केली व हिंदू लॉ या त्रैमासिकाचे संपादन केले. १९४५ साली ते त्या वेळच्या मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश झाले. १९५३ मध्ये पुण्याला आणि १९५४ मध्ये जळगावला झालेल्या अखिल महाराष्ट्र सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९५५ साली त्यांनी प्रख्यात बँक निवाडा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९५७ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १ फेब्रवारी १९६४ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली. १९६६ साली ते या पदावरून निवृत्त झाले. १९६६–१९७० या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. महागाई भत्ता आयोग (१९६६–६७), जम्मू आणि काश्मीर चौकशी आयोग (१९६७–६८), राष्ट्रीय श्रम आयोग (१९६७–६९) या आयोगांचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठ चौकशी समितीचे (१९६८–६९) अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. विधिआयोग, मुबईची एशियाटिक सोसायटी, रामकृष्ण मिशन आश्रम, स्वस्तिक लीग, इन्स्टिट्यूशन ऑफ पब्लिक अंडरटेकिंग्ज इत्यादींचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. इंटरनॅशनल सेंटर, न्यू दिल्ली या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. विद्यापीठ अनुदान मंडळाचे आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचेही ते सभासद राहीले आहेत. १९६९ साली त्यांना सर जहांगीर घँडी औद्योगिक शांतता पदकाचा बहुमान मिळाला. १९७२ साली त्यांना पद्मविभूषणाचा किताब देऊन राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. विचारप्रवर्तक स्वरूपाचे बरेच लेखन त्यांनी केले आहे. एक उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके अशी : लॉ, लिबर्टी अँड सोशल जस्टिस (१९६५) काश्मीर–रिट्रॉस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट (१९६७) जवाहरलाल नेहरू-ए ग्लिम्प्स ऑफ द मॅन अँड हिज टीचिंग्ज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया-इट्स फिलॉसॉफी अँड बेसिक पॉस्च्यूलेट्स (१९६९) सेक्युलॅरिझम अँड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन.
खोडवे, अच्युत
“